माझी पत्रकारिता: धाराशिव ते पुणे ...


वर्ष होतं २०११. दोन दशके इतर वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आली होती. मी माझी स्वतःची डिजिटल वाहिनी 'धाराशिव लाइव्ह' सुरू केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात माझी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं स्वप्न सत्यात उतरत होतं. मी ठरवलं होतं की आता इतर कोणत्याही संस्थेत काम करायचं नाही.


पण २०१६ मध्ये, डॉ. अनिल फळे यांच्या आग्रहाखातर मी दैनिक गावकरी या वृत्तपत्राचा धाराशिव विशेष प्रतिनिधी म्हणून अर्धवेळ काम करायला सुरुवात केली. सुधीर पवार, अजित तांबोळी, अनंत साखरे आणि मी अशी आमची एक छोटीशी टीम होती. गावकरीने काहीच दिवसांत जिल्ह्यात आपलं स्थान निर्माण केलं आणि आमचं धाराशिवचं स्वतंत्र पान खूप लोकप्रिय झालं.

सप्टेंबर महिन्यात, गणेशोत्सवानंतर एका बातमीमुळे काही लोकांचा राग अनावर झाला. परिणामी, ६ सप्टेंबरला काही समाजकंटकांनी आमच्या कार्यालयावर हल्ला केला. अनंत साखरे त्या दिवशी बाहेर असल्याने मी, सुधीर आणि अजित तिघेच आत अडकलो. सुदैवाने आम्ही वेळीच दरवाजा बंद केला आणि पोलिसांना बोलावलं.

पण जेव्हा पोलीस आले तेव्हा परिस्थिती आणखीच बिकट झाली. पोलिसांनी हल्लेखोरांवर किरकोळ गुन्हे दाखल करून आमच्यावरच गंभीर आरोप लावले. यामागे एका पत्रकाराची सूडबुद्धी होती, हे नंतर कळलं. गावकरीचे डॉ. अनिल फळे आणि दिनेश हारे यांनी माझी खंबीरपणे साथ दिली. पंधरा दिवसांनी मला जामीन मिळाला, पण धाराशिव सोडून पुण्याला यावं लागलं.

पुण्यात येऊन मी खचून गेलो नव्हतो. उलट, पुढची दोन वर्षे पुण्यात राहून मी खूप काही शिकलो आणि अनुभवले. धाराशिव लाइव्ह सोबत पुणे लाइव्ह सुरू केलं, कुटुंबाला वेळ दिला आणि पत्रकारितेवर व्याख्यानं दिली. दोन वर्षांनी माझी या खटल्यातून निर्दोष सुटका झाली, पण मी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला.

आज पुण्यात राहून मला आठ वर्षे झाली आहेत. या काळात मी खूप काही शिकलो, अनुभवले. पत्रकारितेतील माझं वर्चस्व वाढत असताना काही षड्यंत्रंही माझ्याविरुद्ध झाली. पण या सगळ्यातून मी अधिक मजबूत होत गेलो. आज मी आनंदी आहे, सुखी आहे. माझ्या वाट्याला आलेल्या वाईट प्रसंगांनी मला आयुष्यात खूप काही शिकवलं आहे.

आयुष्य कधी सरळ रेषेत जात नाही. त्यात चढ-उतार येत राहतात. पण या चढ-उतारांना सामोरं जाण्याची हिंमत असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो, हे मला माझ्या आयुष्यातून शिकायला मिळालं आहे.

- सुनील ढेपे

पुस्तकांच्या सोबतीने वाटचाल


आजच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात आपण ज्ञानाच्या अफाट साठ्यापर्यंत क्षणार्धात पोहोचू शकतो. मात्र, माझे बालपण आणि तारुण्य हे अशा काळात घडले जेव्हा ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणजे पुस्तके होती. पुस्तकांचे हेच वेड मला आजच्या काळातही उपयोगी पडत आहे.


लहानपणापासूनच माझे पुस्तकांशी अतूट नाते जुळले होते. आमच्या गावच्या श्री खंडोबा मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांचे पठण केले जात असे. मी विद्यार्थी असताना या पठणात सहभागी होत असे. माझे आजोबा मला या ग्रंथांचा अर्थ समजावून सांगत असत. त्यामुळे रामायण, महाभारत, नवनाथ यासारख्या धार्मिक ग्रंथांची ओळख मला लहानपणीच झाली.


पुढे बारावी झाल्यानंतर मी पत्रकारितेत प्रवेश घेतला. या क्षेत्रात येऊन पुस्तकांची माझी आवड आणखीनच वाढली. आमच्या अणदूर गावात वाचनालय नव्हते, त्यामुळे मी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग गावात सायकलने जाऊन पुस्तके आणत असे.


या काळात मी अण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा', 'संघर्ष', 'आघात' आदी सर्व पुस्तके वाचून काढली. शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय', 'छावा', 'युगंधर', 'लढत' ही पुस्तकेही मी वाचली. याशिवाय वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, वसंत सबनीस, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या लेखकांची पुस्तकेही माझ्या वाचनात होती. या वाचनामुळे माझ्या ज्ञानात प्रचंड भर पडली. मला पुस्तकांचे इतके वेड होते की मी एक पुस्तक दोन-तीन दिवसांतच वाचून काढत असे.


आजच्या इंटरनेटच्या युगातही पुस्तकांच्या वाचनाने मला दिलेले ज्ञान उपयोगी पडत आहे. इंटरनेटवरील माहिती पडताळून पाहण्यासाठी, संदर्भासाठी मला पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे पुस्तकांचे वाचन ही माझी आवडच नाही तर गरजही बनली आहे.


पुस्तके ही केवळ कागदावर छापलेली अक्षरे नसून ती आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवतात, आपली विचार करण्याची क्षमता वाढवतात. त्यामुळे पुस्तकांचे वाचन ही सवय आपण सर्वांनी जोपासली पाहिजे.

- सुनील ढेपे 


चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय


एक पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात सोलापूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक केसरीचा  अणदूर येथील बातमीदार म्हणून केली. अनेक सामाजिक विषयांवर बातम्या लिहिताना, एका अत्यंत क्रूर आणि अमानुष प्रथेची माहिती मला मिळाली. आमच्या गावापासून जवळच असलेल्या चिवरी गावात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मी देवीच्या यात्रेत हजारो कोंबड्या, बकरे आणि रेड्यांचा बळी दिला जात असे.


देवीला पुरण-पोळीचा नैवेध असतानाही, दैत्याच्या नावाखाली हा पशुसंहार केला जात असे. या अंधश्रद्धेमुळे होणारी पशुहत्या पाहून माझे मन विषण्ण झाले. मी याविषयी दैनिक केसरीमध्ये १९८९ मध्ये "चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार?" या शीर्षकाखाली एक सविस्तर लेख लिहिला.


माझा लेख प्रकाशित होताच, त्याचे दूरगामी परिणाम दिसून आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते धाराशिवला आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पशुहत्येवर बंदी आणण्याची मागणी केली.


चिवरीच्या यात्रेबाबत आणखी एक अंधश्रद्धा होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी रात्री येथे भुतांची यात्रा भरते असा समज होता. या अंधश्रद्धेला तिलांजली देण्यासाठी, मी माझ्या मित्रांसह मिळून नवयुवक तरुण मंडळ स्थापन केले. आम्ही २०-२५ कार्यकर्ते मिळून बुधवारी रात्री मंदिरात मुक्काम केला. सकाळी अणदूरला परतताना काही समाजकंटकांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही पळ काढला, पण त्यांनी आमच्या मोटारसायकली जाळून टाकल्या.


अखेर, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, शासनाने चिवरीच्या यात्रेतील पशुहत्येवर बंदी घातली. या निर्णयाने आम्हाला खूप समाधान मिळाले. आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.


चिवरीच्या यात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला दैनिक लोकमतचा आणि मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार मला अनुक्रमे तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते नागपुरात आणि विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंत श्रीधर टिळक यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रदान करण्यात आले. त्यावेळी खासगी न्यूज चॅनल नव्हते पण  पुरस्कार वितरण समारंभाची  बातमी दूरदर्शनच्या मराठी बातम्यामध्ये दाखवण्यात आली होती. 


या पुरस्कारांमुळे केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले. एक पत्रकार म्हणून माझ्या लेखणीतून एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मी यशस्वी झालो होतो, याचा मला अभिमान आहे.


-  सुनील ढेपे