धाराशिव लाईव्हचा निर्भीड प्रवास: ३५ वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव

 


गेल्या ३५ वर्षांत पत्रकारितेच्या क्षेत्रात मी अनेक चढउतार पाहिले. या प्रवासात माध्यमात खूप बदल झाले. सुरुवातीला फक्त प्रिंट मीडियाचा जमाना होता, नंतर टीव्ही माध्यम उदयास आले, आणि आता डिजिटल मीडियाने एक नवा अध्याय लिहिला आहे. या सर्व बदलांचा मी साक्षीदार आहे आणि त्यांच्या विविध पैलूंचा अनुभव घेतला आहे.


धाराशिव जिल्ह्यात प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, १३ वर्षांपूर्वी मी स्वतःचे डिजिटल चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातूनच 'धाराशिव लाईव्ह' या डिजिटल चॅनलचा जन्म झाला. आज धाराशिव लाईव्ह केवळ धाराशिव जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, तर जगभरात लाखो वाचकांच्या संपर्कात आहे. वेबसाइट, यूट्यूब चॅनल, आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून धाराशिव लाईव्हने एक मजबूत डिजिटल उपस्थिती निर्माण केली आहे. या लोकप्रियतेमुळे धाराशिव लाईव्ह आज धाराशिव जिल्ह्यातील नंबर १ डिजिटल चॅनल बनले आहे.


धाराशिव लाईव्हवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या नेहमीच आगळ्यावेगळ्या असतात. त्यात कोणत्याही प्रकारची कॉपीपेस्ट नाही. माझ्या लिखाणाची शैली बेधडक, निर्भीड आणि आक्रमक आहे. कोणताही बडा राजकीय नेता असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी, चुकीला माफी नाही, ही माझी कामाची नीती आहे. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध आहे. त्यामुळेच मी भ्रष्ट किंवा लाचार पत्रकारांच्या विरोधातही बातम्या देतो.


आठ वर्षांपूर्वी मला धाराशिव सोडून पुण्यात स्थलांतर करावे लागले. परंतु, धाराशिवशी माझे नाते कधीच तुटले नाही. धाराशिव हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. पुण्यात राहूनही मी धाराशिव लाईव्हचे काम चालवतो. माझा नियमित दौरा २५ दिवस पुण्यात आणि ५ दिवस धाराशिवमध्ये असतो. काही लोक मला विचारतात, "आम्हाला धाराशिवमध्ये राहूनही बातम्या कळत नाहीत, मग तुम्हाला पुण्यात राहून कशा कळतात?" यावर माझे एकच उत्तर असते - सोर्स. मी कधीच माझ्या सोर्सचे नाव उघड करत नाही, आणि बातमी दाबण्याचा विचारही करत नाही.


विशेषत: पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध आलेल्या बातम्यांबाबत लोकांचा मोठा प्रतिसाद असतो. मी कधीच गोरगरीबांवर होणारा अन्याय खपवून घेत नाही. त्यांच्या समस्या घेऊन लढण्याचा माझा ध्यास आहे. या लढ्यामुळे माझ्यावर आजवर चार खोट्या खटल्यांचा सामना करावा लागला, परंतु जनतेच्या आशीर्वादाने मी त्या सर्वांमधून निर्दोष सुटलो.


माझा हा लढा पुढेही चालूच राहील. मी न भिता, न घाबरता माझ्या कार्यात पुढे जात राहीन. कोणतीही बातमी दबली जाणार नाही,याची मला खात्री आहे. माझा प्रवास हा सत्याच्या शोधाचा आहे, आणि या मार्गावर मी ठामपणे उभा राहणार आहे.धाराशिव लाईव्हचे यश हे लोकांच्या विश्वासावर आणि माझ्या निर्भीड पत्रकारितेच्या तत्वांवर आधारित आहे.

- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह