श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात जमिन असमानचा फरक आहे. देवावर आपली श्रध्दा असावी पण देवाच्या नावावर जी अंधश्रध्दा चालू आहे, त्याला मी प्रथमपासूनच कडाडून विरोध केलेला आहे.
चिवरीच्या लक्ष्मीआईला पुरण - पोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असताना दैत्याला बक-याचा नैवेद्य चालतो म्हणून जी बेसुमार पशुहत्त्या केली जात होती, त्याला सर्वप्रथम मी विरोध केला होता.१९८७ मध्ये मी सर्वप्रथम केसरीमध्ये चिवरीच्या यात्रेविषयी लेख लिहिला होता. लेखाचे शिर्षक होते, चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार ? नंतरही या यात्रेविषयी व त्यात चालणा-या अनिष्ठ प्रथेविषयी सातत्याने लेख लिहिले. आज चिवरी यात्रेतील पशुहत्त्या बंद झालेली आहे, पण महिलांच्या अंगात जे येते, तो प्रकार चमत्कारिकच म्हणावा लागेल.
आज चिवरीची लक्ष्मीआई असो अथवा तुळजापुरची तुळजाभवानी... तिच्यापुढे काही महिलां चित्र - विचित्र हातवारे करून जे नाचतात, तो बित्भल्स प्रकार आहे. देवी त्यांच्या अंगात कशी काय संचारते, हा संशोधनाचा विषय आहे. ही चक्क अंधश्रध्दा आहे. ज्या महिला देवीपुढे नाचतात, त्या बहुतांश मागासवर्गीय समाजाच्या आहेत, उच्च पदस्थ समाजाच्या महिलांत देवी का संचारत नाही, हा आमचा सवाल आहे. देवी अंगात शिरते, हे निव्वळ थोतांड असून, त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
देवीचे दर्शन घेणे, तिची फार तर खणा - नाराळाने ओटी भरणे, तिला पुरण - पोळीचा नैवेद्य दाखविणे, ही श्रध्दा आहे, त्याला कोणाचा आक्षेप नाही, असण्याचेही कारण नाही, पण देवीपुढे विचित्र हातवारे करीत नाचणे, ही चक्क अंधश्रध्दा असून, ही अंधश्रध्दा बंद होण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.
१९९३ ची आणखी एक गोष्ट आठवते. ३० सप्टेंबर १९९३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर परिसरात पहाटे प्रलंयकरी भूकंप झाला होता. अख्ये गाव भूकंपाने भुईसपाट झाले होते.त्यावेळी एकमतला जिल्हा प्रतिनिधी होतो. ही महाभयानक वार्ता समजताच माझ्यासह उस्मानाबादचे काही पत्रकार सकाळी आठ वाजता सास्तूरमध्ये दाखल होतो. उषा काल होता... होता..., काळ रात्र झाली...! असे शिर्षक देवून भूकंपाचा सर्व वृत्तांत मी लिहिला होता. एक महिनाभर या भूकंपावर ऑन द स्पॉट रिपोर्टटींग केली होती.त्यावेळी दररोज भूकंपग्रस्त परिसरात जाण्याचा प्रसंग आला होता.
वर्षभरानंतर पुन्हा पडक्या म्हणजे जुन्या सास्तूरमध्ये एक भयंकर घटना घडली होती. या गावातील
आयेशाबी इनामदार या पाच वर्षाच्या छोट्या चिमुकलीचा गुप्तधानाच्या लालसेपाटी बळी दिला गेला होता. गावातील एकाला कोणी तरी सांगितले की, भूकंपाने पडलेल्या सास्तूरमध्ये गुप्तधन असून, एकाचा बळी दिला तर गुप्तधन मिळू शकते.
पहिले काही दिवस आयेशाबी इनामदार गायब झाल्यांतर पोलीसांनी दखलच घेतली नव्हती.नंतर तिचा मृतदेह चक्क कुत्र्याने लचके देवून खावून टाकला होता. तिच्या कपड्यावरून तिची ओळख पटली होती. ज्यावेळी ही घटना मला समजली तेव्हा मी एकट्याने सास्तूर गाठले व सर्वप्रथम ऑन द स्पॉट रिपोर्ट लिहिला. त्यावेळी एकमतचे संपादक राजा माने होते.
पहिल्या दिवशी पान एकवर पाच कॉलम बातमी दिली, या बातमीत चौकट करून उद्याच्या अंकात सुनील ढेपे यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट वाचा, असा उल्लेख करण्यात आला. कारण त्यावेळी आजच्या सारखी कॉम्प्युटर सिस्टीम नव्हती. वृत्तपत्रे रंगीत नव्हती. बातम्या कागदावर लिहून फॅक्सद्धारे पाठवाव्या लागत होत्या.विजय भन्साळी यांनी ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो काढले होते.वार्तापत्र लिहिण्यासाठी व फोटो धुण्यासाठी वेळ लागत होता.
त्याचरात्री रात्रभर बसून पुर्ण स्टोरी लिहिली. दुर-या दिवशी कार्यालयाचा शिपाई सुरेश चौगुले यास वार्तापत्र व फोटो घेवून लातूरला पाठविले. मग त्याच्या दुस-या दिवशी पान एक व उर्वरित भाग आतील पानावर प्रसिध्द झाला. या ऑन द स्पॉट रिपोर्टचे हेडींग होते,
भूकंपग्रस्त सास्तूर , तिथे नरबळीचा दस्तूर....
हे वार्तापत्र खूपच गाजले. नंतर पंधरा दिवस त्याच्यावर फॉलोअप करीत राहिलो. एका भोंदू महाराजासह आठ लोकांना नंतर अटक झाली.
कळंब तालुक्यातील जवळा खुर्द गावातही विहिरीला पाणी लागावे म्हणून एका दलिताचा बळी दिला गेला होता. त्यावरही खूप लिखाण केले होते.
गेल्या २० वर्षाच्या पत्रकारितेच्या कार्यकालात अंधश्रध्देवर नेहमीच प्रहार केलेला आहे. चिवरी विषयी लेखाला तीन, सास्तूर विषयी लेखाला दोन तर जवळा खुर्दच्या वार्तापत्राला एक पुरस्कार मिळालेला आहे. केवळ पुरस्कार मिळावेत म्हणून मी कधीच लेखन केलेले नाही. पण केलेल्या कामाचे फळ पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले, हे मात्र नक्की.