लस हे कोरोनावरचे अमृत नाही, पण ...


कोरोनामुळे गेल्या एक  -दीड  वर्षात अनेक जीवाभावाची माणसे गेली. काही जणांचे संपूर्ण  कुटुंब यात बळी पडले. आई-वडील गेल्यामुळे अनेक मुले अनाथ झाली. पहिली लाट, दुसरी लाट संपल्यानंतर आता तिसरी लाट येणार आहे, असं आपलं मायबाप सरकारचं सांगतंय. तिसऱ्या लाटेची झळ लहान मुलांना बसणार आहे, हे दस्तुरखुद्द सरकारचं म्हणणं आहे. 


असं असलं तरी काही जणांच्या मनात फाजील आत्मविश्वास असतो, कोरोनाच्या कितीही लाटा आल्या तरी मला कोरोना होत नाही, कोरोना - बिरोना काही नाही., या भ्रामक कल्पनेत वागत आहेत. पण कोणी कितीही  शरीराने निरोगी व सुदृढ असला तरी कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं उदाहरण समोर आहे. 


गेल्या चार वर्षांपासून मी पुण्यात राहतो . पुण्यात आजवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अनेकांचे बळी गेले आहेत. पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट असताना दोन्ही लाटेत मला कोरोना झाला नाही, हे माझे नशीब म्हणावे लागेल. त्याबद्दल परमेश्वराचे आभारच... 


गेल्या एक - दीड  वर्षात कुणाचाही फोन आला की , आपुलकीचा सल्ला - काळजी घ्या... हे शब्दच मला बाहेर कुठे गेले की जबाबदारीची जाणीव करून देत होते. बाहेर जाताना आजवर मी मास्क वापरला, सॅनिटायझरचा वापर केला. बाहेरून आलो की , हात  स्वच्छ धुणे आदी पथ्ये पाळली.मध्यंतरी लाट ओसरली तरी बाहेर जाताना मास्क वापरणे सोडले नाही.त्यामुळेच आजवर मला कोरोना झाला नाही. मात्र कुठे तरी एक अनाहूत भीती मनात होती. 


४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरु झाल्यानंतर मला लस कधी मिळणार या प्रतीक्षेत होतो. https://www.cowin.gov.in/ या वेबसाईट वर नोंदणी करून फ्री नसेल तरी पेडमध्ये लस घेण्यासाठी उसुक होतो. पण मुलीच्या LTI कंपनीच्या कृपेमुळे २ जून ( बुधवार ) रोजी मला आणि दीपाला  कोविशील्ड लस मिळाली. त्यानंतर काही साईड इफेक्ट जाणवणार याची पूर्वकल्पना होतीच. झालेही तसेच.  मध्यरात्री आम्हा दोघांना थंडी वाजून ताप आला. अशक्तपणा जाणवू लागला. मी एका दिवसात ( गुरुवारी दुपारी ) कव्हर झालो तर दीपा आज ( शुक्रवारी सकाळी )  कव्हर झाली. मी आज ( शुक्रवार ) तर पूर्वीप्रमाणे ठणठणीत  आहे. 


लसीचे दोन्ही डोस  घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोना झाला, अपवादाने काही जणांचे मृत्यू देखील झाले. त्यामुळे लस का घ्यायची ? असे काही जणांचे  मत आहे, पण लस न घेतल्यामुळे एक प्रकारची अनाहुन भीती असे विचार करणाऱ्यांच्या  मनात असतेच. 


लस हे कोरोनावरचे अमृत नाही, पण  सुरक्षा कवच नक्कीच आहे. लस घेतल्याचा एक फायदा होतो  की , आपल्यात आणखी Positivity (सकारात्मकता) येते. आपण आता कोरोनाशी दोन हात करू शकतो, याचा आत्मविश्वास दृढ  होतो. माझा अनुभव देखील हाच आहे. त्यामुळे तुम्ही देखील लस घ्या, मग बघा अनुभव कसा येतो.  ... 


जाता जाता : लसीबाबत मनातून भीती काढून टाका . कोविशील्ड आणि कोव्हक्सिन दोन्ही लसी सुरक्षित आहेत. ही लस चांगली की  ती लस चांगली हा विचार करत बसण्यापेक्षा मिळेल ती लस घ्या. 


- सुनील ढेपे 

https://www.dhepe.in/