कुकर्मीचा प्रताप ...


सन २००४ च्या  या  तीन घटना आहेत , आज २० वर्षे झाले पण त्या कटू घटना आणि आठवणी  डोक्यातून कधी जात नाहीत. कुकर्मी आणि पापनगरीचा चेहरा दिसला की त्या कटू आठवणी अधिक गडद होतात. कुकर्मी आणि पापनगरी पत्रकाराचे दुष्कर्म शत्रूच्या सुद्धा वाट्याला येऊ नयेत... 


२१ जुलै २००४ रोजी मुलीनंतर मुलगा जन्माला म्हणून आमच्या घरात आनंदी वातावरण होते. मी धाराशिवला तर वडील अणदूरला राहत होते. अणदूरला शेती असल्याने वडिलांचे मन धाराशिवला रमत नव्हते. त्यांना त्यांचे गाव, शेती प्रिय होती. मी आठवड्यातून एकदा अणदूरला जात असे. वडील महिन्यातून कधी तरी धाराशिवला येत असत. मुलगा झाल्याची बातमी समजताच, ते धाराशिवला येणार होते, पण नातूला सोन्याची अंगठी घेऊन भेटायला जाईन म्हणून थांबले होते पण आठच दिवसात काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि नातवाचे तोंड न पाहता ते आमच्यातून निघून गेले होते. नळदुर्गजवळ रस्ता अपघातात त्यांचे निधन  झाले , तो दिवस होता २८ जुलै २००४. 


दैनिक एकमतचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारितेला जोडधंदा  म्हणून मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. धाराशिव शहरात पहिले इंटरनेट कॅफे सुरु केले होते. ते धाराशिवच्या काही पत्रकारांना बघवत नव्हते. कुकर्मी आणि पापनगरीच्या पत्रकाराला तर पोटदुखी झाली होती. कुकर्मी आमच्या कॅफेमध्ये यायचा आणि बिल न देता निघून जायचा. त्याच्याकडे त्याकाळी २७०० रुपये उधारी थकली होती. ती उधारी आमचा नातेवाईक दिलीप ( कॅफे व्यवस्थापक )  याने मागितले म्हणून त्याला राग आला आणि त्याने आमचे इंटरनेट कॅफे बंद पाडण्याचा जणू पण केला होता.त्यासाठी त्याने  पापनगरीच्या पत्रकारास हाताशी धरले. २७ जुलै २००४ रोजी सायंकाळी मी नसताना, समतानगरमधील कॅफेमध्ये पापनगरीवाला आला आणि त्याने कॅफेमध्ये अज्ञात ठिकाणी ब्यू फिल्मची सीडी ठेवून निघून गेला. सायंकाळी सातनंतर एलसीबी पोलीसाची रेड पडली आणि त्यांनी कॅफेची कसून चौकशी सुरु केली. आमच्या कॅफेमध्ये ब्यू फिल्म दाखवली जाते, अशी तक्रार कुकर्मी आणि पापनगरीवाल्याने पोलिसांकडे केली होती. 


कॅफेमध्ये असला प्रकार कधी आम्ही केला नाही. पण आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले. पण आमच्या मदतीला साक्षात स्वामी समर्थ आले. पापनगरीवाला सीडी ठेऊन गेल्यानंतर काही वेळात १० ते १२ वर्षाचा एक गोंडस मुलगा कॅफेमध्ये आला आणि त्याने आमचा नातेवाईक दिलीप यास सीडीबद्दल माहिती दिली. दिलीपने घडलेला प्रकार मला मोबाईलवर सांगितला. मी कॅफेमध्ये गेलो आणि त्या मुलाला पाहिले , तो मुलगा यापूर्वी आमच्या कॅफेमध्ये कधी आला नाही आणि पुन्हा कधी दिसला नाही. त्याला कसे माहित की , अमक्याने दुकानात सीडी ठेवली आहे. साक्षात श्री स्वामी समर्थ बालकाच्या रूपात मदतीला धाऊन आले होते. मी स्वामी समर्थांची मासिक अक्कलकोट  वारी करत होतो आणि त्यांची भक्ती करत होती. म्हणून ते माझ्या मदतीला आले. आम्ही ती ब्यू फिल्मची सीडी दुसरीकडे नेऊन ठेवली आणि नंतर  पोलीस आले होते. पण त्यांना हाताशी लागले नाही. कुकर्मी आणि पापनगरीवाला पोलिसाना रेड पडली तेव्हा फोन करून जागा सांगत होते पण पोलिसाना सीडी काही हाती लागली नाही. यातून आम्ही श्री स्वामी समर्थ कृपेने बालंबाल बचावलो... 


त्याच रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास बस स्थानकाजवळ पापनगरी कार्यालयाची  भीमनगरमधील तीन ते चार तरुणांनी तोडफोड केली. भारत - पाक क्रिकेट सामना झाल्यानंतर ते तरुण जवळच्या बारमध्ये गेले होते, कार्यालयासमोर लघवी का केली म्हणून ते चार तरुण आणि पापनगरीचे दोन कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर हा प्रकार घडला, असे नंतर कळले. पण कुकर्मी आणि पापनगरी याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देतांना सुनील ढेपे आणि त्यांचे चार साथीदार यांनी कार्यालयावर हल्ला केला, अशी खोटी फिर्याद देवून माझे नाव विनाकारण गोवले. मी तर माझ्या कॅफेमध्ये आणि नंतर घरी होतो , पण मुद्दाम मला बदनाम करण्यासाठी जणू विडाच उचलला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे वडील अपघातात वारले आणि मी गावाकडे निघून गेलो. गावाकडे गेल्यावर समजले कि माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद देताना, ऑफिसमधील ५० हजार नेले असे खोटे लिहिले होते पण पोलिसांनी ते कलम वगळले होते. 


पहिल्या दिवशी इंटरनेट कॅफेवर पोलिसांची रेड, त्याच रात्री मारहाणीचा खोटा गुन्हा आणि दुसऱ्या दिवशी वडीलाचे अपघाती निधन या तीन घटना माझ्यावर आघात करणाऱ्या होत्या. पण मी त्यातून सावरलो. नंतर अटकपूर्व जामीन घेतला. हा माझ्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा होता. त्यांतून दोन वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली. पण यामुळे माझी आकाशवाणी आणि दूरदर्शन बातमीदार म्हणून झालेली निवड रद्द झाली. ज्या इंगळे नावाच्या पोलीस निरीक्षकांनी हा खोटा गुन्हा दाखल केला होता, तो धाराशिवला असतानाच एका लाच प्रकरणात अटक होऊन नंतर त्याला शिक्षा झाली आणि नंतर तो पोलीस दलातून बडतर्फ झाला. पापनगरीवाला सहा महिन्यातच कौटुंबिक वादातून  विष पिला होता पण  मरणाच्या दाढेतून कसाबसा वाचला होता. कुकर्मीचे अपराध आता भरले आहेत आणि तो आपल्या कर्माची फळे भोगतोय... कुकर्मी आणि पापनगरीवाला माझ्या आयुष्यात जसे अन्नात विष कालवले तसे अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. देव यांना सद्बुद्धी देवो... 


(मी अणदूरच्या खंडोबाचा पुजारी आहे. मी हे जे लिहिले आहे, ते सत्य आहे. श्री स्वामी समर्थ आणि खंडोबाची शपथ घेऊन सांगतो घडलेला हा प्रकार सत्य आहे.  ) 


क्रमशः 

सुनील ढेपे 

( आगामी आत्मचरित्रातील काही भाग )