जेव्हा बातमी पाठवण्यासाठी मोबाईल नव्हता

 

तार, पत्र आणि एसटीच्या प्रवासातील पत्रकारिता

आजच्या पिढीतील पत्रकाराला एखादी बातमी पाठवायची असेल तर मोबाईल काढायचा, फोटो काढायचा आणि एका क्लिकवर ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचते. व्हॉट्सअॅप, ई-मेल, सोशल मीडिया आणि क्लाउड स्टोरेजमुळे बातमी पाठवणे हा आता काही सेकंदांचा विषय झाला आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा बातमी पाठवणे हीच एक मोठी मोहीम असायची.

मी पत्रकारितेत आलो तेव्हा मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, ई-मेल नव्हते. गावातील पत्रकारांसाठी तर परिस्थिती आणखी वेगळी होती. बातमी मिळवणे जितके अवघड होते, त्याहून अवघड ती वेळेत वृत्तपत्राच्या कार्यालयापर्यंत पोहोचवणे होते.

त्या काळात बातमी हाताने लिहिली जायची. अनेकदा वहीतील पानांवर किंवा साध्या कागदावर बातमी तयार केली जायची. काही ठिकाणी टायपरायटरची सुविधा असे, पण ग्रामीण भागातील बहुतांश वार्ताहर हातानेच बातम्या लिहित असत. बातमी लिहून झाली की प्रश्न असायचा – आता ती पाठवायची कशी?

कधी एखाद्या प्रवाशाकडे ती बातमी देऊन एसटी बसने पाठवली जायची. बसस्थानकावर चालक, वाहक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे कागदाचे पाकीट दिले जायचे. शहरातील कार्यालयातील व्यक्ती ठराविक वेळी बसस्थानकावर जाऊन ते पाकीट घेऊन यायची. एका बातमीसाठी इतकी साखळी काम करत असे.

कधी महत्त्वाची बातमी असेल तर तारचा वापर केला जायचा. मात्र तार पाठवणे महागडे होते. त्यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरावा लागे. बातमी नव्हे, तर तिचा सारांश पाठवला जाई. आज ज्या एका बातमीसाठी आपण शेकडो शब्द लिहितो, त्याच बातमीचा गाभा काही शब्दांत तारमधून पाठवावा लागत असे.

पत्र हा तर पत्रकारितेचा विश्वासू साथीदार होता. काही अहवाल, निवेदने किंवा विशेष बातम्या पोस्टाने पाठवल्या जात. पण पोस्टाने पाठवलेली माहिती कार्यालयात पोहोचायला एक-दोन दिवस लागत. त्यामुळे वेग आणि अचूकता यांच्यात सतत संघर्ष सुरू असे.

त्या काळात बातमी पाठवण्यासाठी पत्रकाराला फक्त लेखन येणे पुरेसे नव्हते. त्याच्याकडे संयम, नियोजन आणि संपर्कही असावा लागत असे. कोणत्या बसने पाकीट पाठवायचे, कोणत्या व्यक्तीकडे द्यायचे, कार्यालयात कोण घेणार आहे, हे सर्व आधीच ठरलेले असे.

आजच्या तरुण पत्रकारांना कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण अनेकदा बातमी पाठवण्यासाठी आम्ही किलोमीटरचा प्रवास करत असू. फोनची सुविधा असलेल्या ठिकाणी जावे लागे. एखाद्या दुकानातील किंवा सरकारी कार्यालयातील फोन वापरण्यासाठी वाट पाहावी लागे. बातमीच्या मागे धावण्याइतकीच धावपळ ती पाठवण्यासाठीही करावी लागत असे.

मात्र या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट मिळाली – बातमीची किंमत समजली. प्रत्येक शब्द विचारपूर्वक लिहिला जाई. माहितीची खात्री करूनच ती पाठवली जाई. कारण एकदा बातमी गेली की ती लगेच दुरुस्त करण्याची सुविधा नव्हती. आजच्या "एडिट" आणि "डिलीट" बटणांचा तो काळ नव्हता.

नंतर फॅक्स आला आणि आम्हाला तो चमत्कारच वाटला. मग ई-मेल आले. इंटरनेट आले. मोबाईल आले. आणि आता AI चे युग आले आहे. काही सेकंदांत फोटो, व्हिडिओ आणि बातमी जगभर पोहोचते. पण या वेगवान युगातही मला एसटी बसच्या खिडकीतून पाठवलेले ते पाकीट, पोस्टाच्या लिफाफ्यातील बातमी आणि तारमधील मोजके शब्द आठवतात.

कारण ती फक्त बातमी पाठवण्याची साधने नव्हती; ती पत्रकारितेची एक संस्कृती होती. संघर्षाची, संयमाची आणि समर्पणाची संस्कृती.

आजच्या पत्रकारितेचा वेग पाहताना मनात एकच विचार येतो — तंत्रज्ञान बदलले, साधने बदलली, पण सत्य शोधण्याची पत्रकाराची धडपड मात्र कालही तशीच होती आणि आजही तशीच आहे.

क्रमशः...
(तार ते AI – भाग २)