चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय
एक पत्रकार म्हणून माझ्या कारकिर्दीची सुरुवात सोलापूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक केसरीचा अणदूर येथील बातमीदार म्हणून केली. अनेक सामाजिक विषयांवर बातम्या लिहिताना, एका अत्यंत क्रूर आणि अमानुष प्रथेची माहिती मला मिळाली. आमच्या गावापासून जवळच असलेल्या चिवरी गावात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महालक्ष्मी देवीच्या यात्रेत हजारो कोंबड्या, बकरे आणि रेड्यांचा बळी दिला जात असे.
देवीला पुरण-पोळीचा नैवेध असतानाही, दैत्याच्या नावाखाली हा पशुसंहार केला जात असे. या अंधश्रद्धेमुळे होणारी पशुहत्या पाहून माझे मन विषण्ण झाले. मी याविषयी दैनिक केसरीमध्ये १९८९ मध्ये "चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार?" या शीर्षकाखाली एक सविस्तर लेख लिहिला.
माझा लेख प्रकाशित होताच, त्याचे दूरगामी परिणाम दिसून आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते धाराशिवला आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पशुहत्येवर बंदी आणण्याची मागणी केली.
चिवरीच्या यात्रेबाबत आणखी एक अंधश्रद्धा होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी रात्री येथे भुतांची यात्रा भरते असा समज होता. या अंधश्रद्धेला तिलांजली देण्यासाठी, मी माझ्या मित्रांसह मिळून नवयुवक तरुण मंडळ स्थापन केले. आम्ही २०-२५ कार्यकर्ते मिळून बुधवारी रात्री मंदिरात मुक्काम केला. सकाळी अणदूरला परतताना काही समाजकंटकांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही पळ काढला, पण त्यांनी आमच्या मोटारसायकली जाळून टाकल्या.
अखेर, तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, शासनाने चिवरीच्या यात्रेतील पशुहत्येवर बंदी घातली. या निर्णयाने आम्हाला खूप समाधान मिळाले. आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.
चिवरीच्या यात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला दैनिक लोकमतचा आणि मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार मला अनुक्रमे तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते नागपुरात आणि विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंत श्रीधर टिळक यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रदान करण्यात आले. त्यावेळी खासगी न्यूज चॅनल नव्हते पण पुरस्कार वितरण समारंभाची बातमी दूरदर्शनच्या मराठी बातम्यामध्ये दाखवण्यात आली होती.
या पुरस्कारांमुळे केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले. एक पत्रकार म्हणून माझ्या लेखणीतून एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मी यशस्वी झालो होतो, याचा मला अभिमान आहे.
- सुनील ढेपे