होणार होतो चित्रकार पण झालो पत्रकार ...

 

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात माझा जन्म झाला. माझं लहानपण मंदिराच्या छायेत आणि साध्या घरात गेलं. माझे वडील , मधुकर ढेपे, हे  श्री खंडोबाचे  मंदिरात पुजारी होते , आणि माझी आई अनुसया घर सांभाळत होती. आमचं लहानसं पत्र्याचं घर मंदिराच्या शेजारीच होतं. त्या घरात दोन खोल्या होत्या, पण आमचं मन मोठं होतं. 1972 चा दुष्काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. माझ्या वडिलांनी आणि आईने खूप कष्ट केले. शासकीय रोडच्या कामाला जाऊन त्यांनी आमचं घर चालवलं. 


मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलो. चौथी पर्यंत शिक्षण झाल्यावर जवाहर विद्यालयात पाचवीमध्ये प्रवेश घेतला. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. पोतदार गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं, आणि मी अनेक चित्रे काढली. चित्रकला परीक्षेत  जिल्ह्यात पहिला आल्याची बातमी संचार वृत्तपत्रात आली तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता.


चित्रकार होण्याचं स्वप्नं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे मला चित्रकला महाविद्यालयात जाता आलं नाही. मी नळदुर्गच्या  बालाघाट महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश घेतला, बारावी पास झालो, आणि बी ए फर्स्ट इयरला असताना वृत्तपत्र वाटप सुरू केलं. केसरी वृत्तपत्राची एजन्सी घेतली आणि अणदूर गावाचा बातमीदार झालो.


1989 मध्ये मी एक खून प्रकरण उघडकीस आणलं. गावगुंडांनी माझ्यावर हल्ला केला, पण मी वाचलो. मी पत्रकारिता सोडली नाही आणि या खून प्रकरणी कोर्टात साक्ष दिल्यामुळे तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. पदवीनंतर मी जर्नालिझमची पदवी घेतली आणि धाराशिवमध्ये 20 वर्षे विविध वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. मी निर्भीड पत्रकारिता केली, अनेकांना न्याय मिळवून दिला. माझ्यावर चार खोटे गुन्हे दाखल झाले, पण मी त्यातून दोषमुक्त झालो.


मी 'धाराशिव लाइव्ह' नावाचं डिजिटल चॅनल काढलं, जे धाराशिव जिल्ह्यात नंबर 1 आहे. या चॅनलला यूट्यूब कडून सिल्व्हर बटन मिळालं आहे, आणि वेबसाईटचे लाखो वाचक आहेत. माझं हे यश माझ्या मेहनतीचं फलित आहे. मला  पत्रकारिता क्षेत्रातील 40 हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

मी चित्रकार होणार होतो, पण परिस्थितीने मला पत्रकार बनवलं. माझ्या मेहनतीने, निर्भीडतेने आणि सत्याच्या ध्यासाने मी माझी ओळख निर्माण केली. 


(माझ्या आत्मचरित्रातील सारांश )