माझी स्पर्धा माझ्याबरोबर ...
सन २०११ मध्ये 'उस्मानाबाद लाइव्ह ' हे टायटल दैनिक वृत्तपत्र काढण्यासाठी मिळालं , एक महिना मोजकेच म्हणजे फाईलपुरते अंक काढले आणि आरएनआय सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हा आतबट्याच्या व्यवहार आपणास परवडत नाही म्हणून दैनिक बंद केले आणि न्यूज पोर्टल सुरु केले . त्यावेळी इंटरनेटची २ G इंटरनेट स्पीड होती. आजच्यासारखे स्मार्ट फोन नव्हते. ही वेबसाइट फक्त कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर दिसत होती. मोजकेच वाचक होते.
पत्रकार परिषदेत गेल्यानंतर मंत्री / मुख्यमंत्री / राजकीय पुढारी यांना उस्मानाबाद लाइव्हचा संपादक म्हणून ओळख करून दिल्यानंतर इतर काही पत्रकार कुत्सिकपणे हसत होते. माझ्या पाठीमागे टिंगल - टवाळी करून याची वेबसाईट कोण वाचतेय म्हणून लोकांना सांगत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या सोलापूरच्या एका वृत्तपत्राच्या जिल्हा कार्यालयात गेलो असता, त्या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी / जे स्वतःला थोर विचारवंत आणि वक्ते समजतात त्यांनी माझी उलटतपासणी करून उस्मानाबाद लाइव्ह वेबसाइटला बेकायदेशीर ठरवून कोण वाचतेय म्हणून हेटाळणी केली. यावेळी त्या वृत्तपत्राचे स्वतःला मालक समजणारे एक व्यापारी देखील बसले होते. त्यांनीही तुझी वेबसाइट कोण वाचतेय , त्यापेक्षा एखाद्या वृत्तपत्राचे काम कर म्हणून सल्ला दिला होता. पण माझे मिशन सुरूच ठेवले.
काळ बदलला तसा डिजिटल मीडियाचे दिवस आले. ४ G इंटरनेट स्पीड आणि स्मार्ट फोन यामुळे डिजिटल मीडियात मोठी क्रांती झाली. उस्मानाबाद लाइव्ह न्यूज वेबसाइट युझर फ्रेंडली असल्यामुळे दररोज ५ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात नंबर १ वेबसाइट आहे. युट्युब आणि फेसबुक पेज नंबर १ आहे. उस्मानाबाद लाइव्हच्या अनेक बातम्या गाजत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम देखील पहावयास मिळत आहेत. उस्मानाबाद लाइव्हने अनेक प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केला आहे. निर्भीड, निष्पक्ष, सडेतोड बाणा असल्यामुळे लोकांचा विश्वास मोठा आहे.
ज्यांनी कुचेष्टा केली, जे कुत्सिकपणे हसत होते, त्यांना पुढे वृत्तपत्रांनी काढून टाकल्यानंतर पोटापाण्यासाठी ५ ते १० हजारांची वेबसाइट काढून आता व्हाट्स अँपवर बातम्या शेयर करत आहेत. गंमत अशी की, यांना अजूनही कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हाताळता येत नाही. बातमी कशी अपलोड करावी हे कळत नाही. ऑपरेटर ठेवून काम सुरु आहे. तसेच स्वतःला थोर विचारवंत आणि वक्ते म्हणणारे 'कंदील' घेऊन बसले आहेत. स्वतःला स्टार पत्रकार म्हणणाऱ्याने भविष्यात चॅनलने हाकलून लावले तर दुसऱ्याच्या आडून 'कंदील' लावत आहेत. त्यांचे 'कंदील' अजून तरी उजेड पडत नाही हा भाग वेगळा , कारण त्यांच्या लाइव्ह बातमीपत्राला लाइव्ह दिसणाऱ्याची संख्या १ ते ५ असते. ( तेही त्यांचीच ) कंदील कुणीही पाहत नाही.
उस्मानाबाद लाइव्हबरोबर आता सगळेजण स्पर्धा करीत आहेत. पण माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. मी ११ वर्षे डिजिटल मीडियात काम करूनही स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतो. कारण विश्व खूप मोठे आहे. अजून बरेच काही मला शिकायचे आहे. सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करतो. उत्साह तोच आहे, जो ११ वर्षांपूर्वी होता. उलट आता काम करण्यास दुप्पट उत्साह वाढला आहे.
- सुनील ढेपे
( आगामी आत्मचरित्र पुस्तकातील काही भाग )