होणार होतो चित्रकार पण झालो पत्रकार !

तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव. श्री खंडोबा मंदिरात भरणाऱ्या जवाहर विद्यालयात माझे माध्यमिक ( पाचवी ते दहावी ) शिक्षण झालं. मंदिराला लागूनच माझं राहत घर. त्यामुळे शाळा सुटली की घरी पोहचायला फक्त २ मिनिट लागत होते.
मला लहानपासूनच चित्रकलेची आवड होती. सातवी ते दहावीमध्ये ही चित्रकला अधिक फुलली. चित्रकला शिक्षक पोतदार गुरुजी हे माझे मार्गदर्शक.याच आवडीमुळे जीवशास्त्र ( Biology ) होमवर्क बुकमधील संबंधित प्राण्याचे चित्रे मी हुबेहूब काढत असे. जीवशास्त्र शिकवणारे संगशेट्टी सर माझे होम वर्क बुक इतर वर्गातील मुलांना दाखवून बघा, अशी पाहिजेत चित्रे म्हणून सांगत असे. मला नेहमी सुंदर/ अतिसुंदर हा रिमार्क मिळत असे. दहावीत असताना अनेक बालमित्राच्या होमवर्क मध्ये चित्रे काढून त्यांना सहकार्य तर केले पण काही मजेशीर किस्सेही घडले.
नववी- दहावी मध्ये असताना चित्रकलेची एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा A ग्रेड मध्ये पास झालो. इंटरमिजिएट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलो होतो. दैनिक संचारमध्ये त्यावेळी बातमी देखील प्रसिद्ध झाली होती.दहावीनंतर ATD ( आर्ट टीचर डिप्लोमा ) आणि GD Art (Drawing & Painting) करून मोठा चित्रकार होण्याची इच्छा होती, पण गरिबी परिस्थितीमुळे ATD ( आर्ट टीचर डिप्लोमा ) ला प्रवेश घेऊ शकलो नाही. त्यामुळे माझे चित्रकार होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पण अपघाताने पुढे पत्रकार झालो.त्याची स्टोरीही मोठी रंजक आहे.

- सुनील ढेपे
( आगामी आत्मचरित्र पुस्तकातील काही भाग )