धन्यवाद आणि आभार...
महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय " संपादक रत्न " पुरस्कार जाहीर केल्याबद्दल संघाचे राज्याध्यक्ष प्रा. विलासराव कोळेकर आणि सर्व सदस्यांचे जाहीर आभार. तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनंदन करणाऱ्या सर्व हितचिंतक,मित्र, वाचक यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्र पत्रकार संघ ही नोंदणीकृत राज्यस्तरीय पत्रकार संघटना असून, गेल्या १८ वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करते. येत्या २९ मे रोजी संघाचा अठरावा वर्धापन दिन शिर्डी येथे साजरा होत असून याचदिवशी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे 'डिजिटल मीडिया'वर माझे व्याख्यान देखील होणार आहे. हा एक दुग्धशर्करा योग आहे.
गेल्या ३० वर्षांपासून मी पत्रकारितेत कार्यरत असून, यापूर्वी लोकमतचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९० ), अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९२ ) कै. नागोजी दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ( २०१६ ), पत्रकार कल्याण निधीचा कै . बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार ( २००६ ) , समर्थन संस्था ( मुंबई ) चा मानवी हक्क वार्ता पुरस्कार ( २००६ ) पुणे प्रेस क्लबचा युवा पत्रकारिता पुरस्कार ( दोन वेळा ) असे ३० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. याच महिन्यात औरंगाबादच्या अप्रतिम मीडियाचा राज्यस्तरीय " चौथा स्तंभ " विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. तो कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हे दोन्ही पुरस्कार केलेल्या कामाची एक पावती असून, जे प्रामाणिक पत्रकार आहेत, त्यांना दोन्ही पुरस्कार समर्पित आहेत.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर या छोट्याच्या गावातून १९८८ - ८९ मध्ये फस्ट एयर ( बी.ए.) मध्ये असतानाच माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली. याच दरम्यान अणदूरचे फुलचंद घुगे खून प्रकरण गाजवले. त्यानंतर चिवरी यात्रेतील पशुहत्येबद्दल लेखमाला लिहून यात्रेतील बेसुमार पशुहत्या बंद केली. या लेखमालेला लोकमतचा राज्यस्तरीय पां. वा. गाडगीळ पुरस्कार मिळाला होता. वयाच्या २१ वर्षी मिळालेला तो पहिला पुरस्कार. आता वय ५० झालं तरी पुरस्काराची ही मालिका सुरूच आहे. तसे मला ५० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत, पण त्यातून सामाजिक संस्थेचे पुरस्कार यात नमूद केले नाहीत.
मी पत्रकारिता धर्म मानतो. धंदा नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांवर झालेल्या अन्याय पोटतिडकीने मांडला आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय मांडत असताना माझ्यावरच अनेकवेळा अन्याय झाला आहे. माझ्यावर काही खोट्या केसेज देखील झाल्या, पण त्याची कधीच पर्वा केली नाही. ज्यांनी - ज्यांनी समाजासाठी काम केलं त्यांना मोठा त्रास झाला हा इतिहास आहे. मग मी कोण ? मी तर एक छोटा कार्यकर्ता / पत्रकार आहे. आपण आपले प्रामाणिक काम करत राहायचे.
पुनश्च सर्वांचे आभार...
- सुनील ढेपे , संपादक , उस्मानाबाद लाइव्ह