पुढाऱ्याच्या विरोधात बातमी दिली म्हणून घरावर बहिष्कार
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव. हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असले तरी सोलापूर जवळ असल्याने खरेदीसाठी सोलापूरला जावे लागले. १९८७ ला जेव्हा मी पत्रकारितेत आलो, तेव्हा सोलापूरहून संचार, केसरी आणि तरुण भारत हे वृत्तपत्र गावात येत होते, तसेच पुण्याहून सकाळ आणि औरंगाबादहून लोकमत येत असे. सकाळ आणि लोकमत फार उशिरा येत होते.
सोलापूरची वृत्तपत्रे सकाळी साडेसात वाजता बसने येत होती. माझ्याकडे केसरीची एजन्सी होती.माझ्या बातम्या पाहून वृत्तसंपादक अरुण रामतीर्थकर यांनी वार्ताहर म्हणून नियुक्त केले. काही दिवसातच एक खून प्रकरण गाजवले. गावातील एका माणसाचा मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत खून झाला होता, त्या खून प्रकरणाचा मी पाठपुरावा केला, त्यामुळे मला गावगुंडांनी भर चौकात बेदम मारहाण केली. तरीही या प्रकरणाचा छडा लावला, पुढे या प्रकरणी तिघांना अटक झाली, नंतर सोलापूर कोर्टात केस गेल्यानंतर माझी साक्ष महत्वपूर्ण ठरली आणि आरोपीना जन्मठेप झाली.तसेच चिवरी यात्रेतील पशूहत्यावर वारंवार लिखाण केले. नंतर कायदयाने या यात्रेतील पशुहत्येवर बंदी आली. यात्रेतील अवैध धंदे बंद झाले.
गावातील एका मोठ्या पुढाऱ्याच्या विरोधात पोलखोल साप्ताहिकात लिखाण केले म्हणून गल्लीतील एका पुढाऱ्याने समाजाची एक मिटिंग घेतली, माझ्या आई - वडिलांवर दबाब टाकण्यात आला, आमच्या घरावर बहिष्कार घालण्यात आला, पण मी पत्रकारिता सोडली नाही. माझे आई- वडील अशिक्षित होते पण कधीच पत्रकारिता सोड असे म्हटले नाहीत.
याच पुढाऱ्याच्या घरी ग्रामपंचायतमधील रेशन दुकानातून एक पोते साखर फुकट जाताना मी पकडले आणि नेणाऱ्यास जाब विचारला म्हणून त्या पुढाऱ्याने माझ्यावर खोटी केस टाकण्याचा प्रयत्न केला पण नळदुर्गचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जेम्स आंबीलढगे यांनी केसच नोंदवून घेतली नाही. त्यांनी सत्यता तपासून पाहिली तर त्यातून खोटेपणा समोर आला होता.
केसरीबरोबर कोल्हापूरच्या पोलीस टाईम्समध्ये अनेक क्राईम स्टोऱ्या प्रसिद्ध झाल्या. तुळजापुराच्या पोलीस कोठडीत दोन पारधी समाजातील लोकांची पोलिसांच्या मारहाणीत जो मृत्यू झाला होता, त्याची स्टोरी खूप गाजली होती. अणदूर - नळदुर्ग जवळ असल्याने या भागातील सर्व न्यूज मी केसरीसाठी कव्हर करीत होतो, त्यामुळेच केसरीने मला लातूरला जिल्हा प्रतिनिधींची संधी दिली आणि येथूनच माझ्या पत्रकारितेच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली.
अणदूर ग्रामीण वार्ताहर म्हणून काम करताना, सोलापूरला एक पत्रकारांची कार्यशाळा झाली होती. संचारचे तत्कालीन सहसंपादक पु. ज. बुवा यांनी ही कार्यशाळा ठेवली होती. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात राहण्यास एक सूट मिळाला होता, मी, उमरगा तालुक्यातील एक आणि कळंब तालुक्यातील एक असे तिघेजण पत्रकार मुक्कामास होतो. स्वतःला ज्येष्ठ म्हणणाऱ्या त्या दोघांनी दोन दिवसांत इतके टॉर्चर केले की , मला रडकुंडीला आणले. मी पत्रकारिता करू नये असे त्यांचे म्हणणे....पण भविष्यात एक निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकार होता आले, याचा निश्चितच आनंद आहे.
- सुनील ढेपे
( आगामी आत्मचरित्र पुस्तकातील काही भाग )