उस्मानाबादचे लाचार पत्रकार !

पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासून मी कार्यरत आहे. या तीस वर्षात उत्कृष्ट लिखाण आणि एकंदरीत कामाबद्दल ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या महिन्यात अप्रतिम मीडियाचा 'चौथा स्तंभ' विशेष पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचा 'संपादक रत्न / पत्रकार भूषण' पुरस्कार पुरस्कार मिळाला आणि शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. 


महाराष्ट्र पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उस्मानाबादहून राजकीय क्षेत्रात असलेल्या एका मित्राचा फोन आला आणि अभिनंदन करून, सुनीलराव किती पुरस्कार घेता, इथल्या काही पत्रकारांना  किमान  'लाचार ' पुरस्कार  तरी द्या म्हणून शाब्दिक कोटी केली. हे ऐकून मला थोडं हसू देखील आलं पण उस्मानाबादचे पत्रकार इतके लाचार झाले आहेत का ? याचा विचार करू लागलो.यावेळी मागे  लिहिलेली एक पोस्ट आठवली. 


ती पोस्ट अशी होती की ,   उस्मानाबादचे काही चाटूगिरी करणारे पत्रकार राजकीय पुढाऱ्यांचे इतके तळवे चाटतात की, ते पुढारी रात्री पायाला विष लावून झोपले तर लाचार पत्रकार सकाळी मेलेले दिसतील. त्या पोस्टची खूप चर्चा झाली होती. 


१९८७ - ८८ मध्ये जेव्हा मी पत्रकारिता सुरु केली, तेव्हा सोलापूरचे रंगाअण्णा वैद्य आणि औरंगाबादचे अनंतराव भालेराव आमच्यापुढे आदर्श होते. त्यांचे अग्रलेख वाचून आम्हाला  स्फूर्ती येत असे. त्यावेळी पत्रकारितेचा एक मापदंड होता. चांगले लिखाण करणाऱ्याला जिल्हा प्रतिनिधी म्हणून संधी मिळत होती. आता चांगले लिखाण करणाऱ्याला नव्हे तर जाहिरात बिझनेस देणाऱ्याला जिल्हा प्रतिनिधी म्हणून संधी मिळते, मग धंदेवाईक जिल्हा प्रतिनिधीही तालुका वार्ताहर, ग्रामीण वार्ताहरही धंदा देणारा वार्ताहर नेमतो. उस्मानाबादच्या पत्रकारितेत 'पापनगरी'चा जसा शिरकाव झाला आणि त्याला टाईम - स्वार्थीची जोड मिळाली तशी उस्मानाबादची पत्रकारिता बदनाम झाली नव्हे ती नासली.त्यामुळेच लोक आता लाचार पत्रकार म्हणून उघडपणे हिणवू लागले आहेत. राजकीय पुढारी, अधिकारी कुत्सित नजरेने पाहू लागले आहेत. 


उस्मानाबादच्या पत्रकारितेत नव्याने आलेले काही चांगले पत्रकार आहेत, पण ते भिऊन वागतात. हे लाचार पत्रकार आपला गेम करतील म्हणून दबून राहत आहेत. जोपर्यंत चांगले पत्रकार एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत लाचार पत्रकार हे पुढे - पुढे आणि प्रामाणिक पत्रकार मागेच राहतील. 


- सुनील ढेपे 

धाराशिव