तुमच्या शुभेच्छामुळे धन्य झालो...

 



तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव. एका  गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी आजोबा कै. दत्तात्रय ढेपे यांनी मला जिल्हा परिषद शाळेत घातले होते. पहिलीसाठी वयाची अट पाच वर्षे असताना, दोन वर्षाने आकडेवारीमुळे वयाने मोठा झालो , मास्तरांनी अंदाजे तारीख लिहिली. शाळेच्या दाखल्यावर एक आणि जन्म दिनादिवशी लिहिलेली तारीख एक अश्या दोन वेगवेगळ्या तारखा आहेत.  दोन तारखेत घोळ घालत बसण्यापेक्षा शाळेच्या दाखल्यावरील तारीख मान्य केली आणि फेसबुकने लोकांना दरवर्षी आठवण करून दिली. त्यामुळेच आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सकाळपासून फोन, मेसेज सुरु आहेत, या सर्वांचा मी आभारी आहे. 


माझे आजोबा  कै. दत्तात्रय ढेपे हे अणदूरच्या श्री खंडोबाचे पुजारी.  धार्मिक वृत्तीचे. श्रावण महिन्यात मंदिरात दर वर्षी जे  ग्रंथ वाचन ठेवले जात होते, त्याचे  मी वाचन करीत असे आणि आजोबा अर्थ सांगत असत. लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली. रामायण, महाभारत, नवनाथ आदी धार्मिक ग्रंथांचा लहानपणापासून अभ्यास आहे. तरुणपणात अनेक दिग्गज लेखकांचे पुस्तके वाचली. वाचनामुळे लिखाणाची आवड निर्माण झाली.त्यातून माझ्या पत्रकारितेचा जन्म झाला. 


आजोबा आणि माझी आई यांचे माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळेच मी पत्रकारिता हा व्यवसाय नसून धर्म  मानलेला आहे, पत्रकारितेच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत सत्याची कास कधी सोडली नाही, सदैव अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा दिला. सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन लढलो. सत्य बातम्या दिल्यामुळे अनेकवेळा अडचणीत आलो, पण कधीच  सत्याचा रस्ता सोडला नाही. आजही त्या खडतर रस्त्यावरून चालत आहे. या रस्त्यावर काहींनी साथ दिली तर काहींनी साथ सोडली. जे सोबत आले त्यांचे आभार आणि ज्यांनी साथ सोडली त्यांचेही आभार. 



माझ्या घराण्यात कुणी यापूर्वी पत्रकार नव्हते. उपजीविकेसाठी वृत्तपत्र एजंट झालो, त्यातील बातम्या वाचत पुढे पत्रकार झालो, सोलापूर केसरीचे तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थकर यांच्यामुळे केसरीत संधी मिळाली. पुढे लातूर जिल्हा प्रतिनिधी झालो. नंतर लोकमत, एकमत, लोकसत्ता   असा प्रवास करीत स्वतःचे वेबपोर्टल काढले. अणदूरसारख्या एका खेड्यागावातून वृत्तपत्र एजंट ते जिल्हा प्रतिनिधी आणि पुढे स्वतःचे वेबपोर्टल हा सारा इतिहास स्वप्नवत आहे. डिजिटल मीडियात नवनवीन प्रयोग सुरूच आहेत. सध्या पुण्यात स्थायिक झालो असलो तरी मन मात्र उस्मानाबाद जिल्हा आणि विशेषतः अणदूरमध्येच आहे. 


सडेतोड आणि निर्भीड पत्रकारिता करीत असताना काही जणांची  कदाचित मने दुखावली असतील. पण  माझा लढा व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध आहे. कुणीही माझा शत्रू नाही. 


आपण सर्वानी वाढदिवसनिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. त्या नेहमीच मला बळ आणि प्रेरणा देत  राहतील. आपले प्रेम,स्नेह आणि सदिच्छा कायम पाठीशी राहो, हीच यानिमित्त अपेक्षा. 


धन्यवाद आणि आभार


सुनील ढेपे