मार्गदर्शक 'आप्पा' !
तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावात फक्त चार किलोमीटरचं आंतर आहे. या दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाची मंदिरे आहेत, पण देवाची मूर्ती एकच आहे. 'श्री'ची मूर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. देवाची मूर्ती अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला नेताना याठिकाणी यात्रा असते. गतवर्षी कोरोनामुळे दोन्हीकडील यात्रा रद्द झाली होती. यंदा अणदूची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. ती होईल की नाही हे माहित नाही पण यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ज्यांचा हातभार असतो, ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक 'आप्पा' म्हणजे दिलीपराव शिवराम मोकाशे ( वय ७१ ) यांचे २१ ऑक्टोबर रोजी अचानक निधन झाल्याने आम्ही सर्वजण चिंतेत आणि काळजीत पडलो आहोत.
२१ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे ( गुरुजी ) यांचा फोन आला, मला वाटले नेहमीसारखा निरोप, काम असेल. पण त्यांनी 'आप्पा' स्वर्गवासी झाले असल्याचे सांगताच मी निशब्द झालो. माझा त्यावर विश्वासच बसेना. नंतर किमान चार ते पाच वेगवेगळ्या व्यक्तींना फोन केल्यानंतर 'आप्पा' गेल्याची बातमी सत्य निघाली पण आजही विश्वास बसत नाही, 'आप्पा' च्या कुटुंबावरच नव्हे तर आमच्या समाजावर फार मोठे हे संकट आहे. आमच्या सर्वांचे आधारवड आज आमच्यातून निघून गेले आहेत.
दहा वर्षापूर्वी मी श्री खंडोबा देवस्थान (अणदूर - नळदुर्ग ) चा सचिव झालो, पण 'आप्पा' त्याअगोदर १० वर्षे उपाध्यक्ष होते. पुढेही त्यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा होती. देवस्थानावर आलेले कसलेही संकट असो, अणदूर- नळदुर्गची यात्रा असो की कुणी वाद - भांडण करो ते शांतपणे हाताळण्याची 'आप्पा' कडे एक वेगळीच कला होती. ते माझ्यापेक्षा २० वर्षे वयाने मोठे ! आमच्यात देवस्थानच्या कारभारावरून काही वेळा मतभेदही झाले. पण काही वेळातच ते मिटले देखील. त्यांनी आणि मी कधीच किंतु- परंतु मनात ठेवले नाही. आम्ही शेवट्पर्यंत मिळून कारभार केला. त्यांचा शब्द म्हणजे आम्ही अंतिम शब्द समजत होतो. देवस्थानचे ऑडिट लिहिण्यापासून सर्व आर्थिक व्यवहार 'आप्पा च्या सल्ल्याने आम्ही हाताळत होतो. पण आता पुढे हा गाडा कोण हाकणार म्हणून काळजीत आहे.
आमच्या मयुरीचा साखरपुडा असो की लग्न सोहळा ! 'आप्पा' ने स्वतःच्या घरचे कार्य समजून आनंदसोहळा उरकला होता. तसेच समाजातील कुणाच्याही घरचे कार्य असो, दुःखद घटना असो, 'आप्पा' चा सहभाग महत्वाचा असायचा. आमच्यात 'आप्पा' नाहीत हे कल्पनाच सहन होत नाही. 'आप्पा' चे मोठे चिरंजीव बंडू उर्फ अविनाश मोकाशे याच्यावर पुढील जबाबदारी आहे. 'आप्पा' ची उणीव कुणीच भरून काढू शकत नाही, हे कुणीही नाकारू शकत नाही. श्री खंडोबा बंडू उर्फ अविनाश मोकाशे व त्याच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही प्रार्थना !
- सुनील ढेपे
सचिव, श्री खंडोबा देवस्थान
अणदूर - नळदुर्ग