विलासरावांच्या "एकमत" मुळे अनेक पत्रकार घडले...


माझ्या पूर्णवेळ पत्रकारितेची सुरवात केसरीपासून झाली. सन १९९० मध्ये नळदुर्गच्या बालाघाट महाविद्यालयात बी.ए. डिग्री घेतल्यानंतर पुढे एम.ए. करण्याची इच्छा होती. केसरीचा अणदूर वार्ताहर म्हणून तीन वर्षे काम केल्यामुळे माझ्या कामाची  तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थकर यांना कल्पना होतीच.  लातूरचे तत्कालीन जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील यांनी केसरी सोडून सोलापूरला लोकमत जॉईन केल्यामुळे जागा रिक्त होती. त्या जागेवर लातूरला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रामतीर्थकर यांनी लगेच होकार दिला आणि येथेच माझ्या पुढील प्रवासाला टर्निग पॉईंट मिळाला. 


लातूरला दयानंद महाविद्यालयात एम. ए.ला प्रवेश घेतला.  गावातीलच गजानन मैत्री, सुनील होनराव यांच्यामुळे लातुरात राहायला जागा मिळाली. सकाळी ७ ते १० पर्यंत कॉलेज ,नंतर दिवसभर केसरीची पत्रकारिता आणि सांयकाळी दैनिक यशवंतला उपसंपादक म्हणून काम असा दिनक्रम सुरु झाला.  स्वतःच्या कमाईवर स्वतःचे शिक्षण सुरु होते. एक वर्षे काम केल्यानंतर लोकमतचे लातूर शहर प्रतिनिधी अतुल कुलकर्णी हे औरंगाबादला उपसंपादक  म्हणून गेल्यामुळे जागा खाली होती आणि जयप्रकाश दगडे यांनी शिफारस केल्यामुळे लोकमतचा लातूर शहर प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली. केसरीचा निरोप घेताना रामतीर्थकर म्हणाले, तू केसरी सोडत असल्यामुळे दुःख होत आहे पण तुझे चांगले होत आहे, याचा आनंद होत आहे. केवळ रामतीर्थकर सरांमुळे मला लातूरला जाता आले, त्यांच्यामुळे पुढे मी घडलो, हे कदापिही मी विसरणार नाही. 


स्व. विलासराव देशमुख यांनी  २० ऑगस्ट १९९१ मध्ये "एकमत" सुरु करण्याची घोषणा करताच, कार्यकारी संचालक विनायकराव पाटील यांनी मला उस्मानाबादला जिल्हा प्रतिनिधींची ऑफर दिली, लोकमत सोडावे की  नाही या विचारत असताना, काही मित्रांचा सल्ला घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी इतकी मोठी संधी मिळतेय म्हटल्यावर अखेर लोकमतला अवघ्या सहा महिन्यात राम -राम  ठोकला आणि लातूर सोडून उस्मानाबादला एकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून जॉईन झालो. Home District आणि त्यात छोटे शहर असल्यामुळे सहा महिन्यात जम बसला. अनेक बातम्या गाजू लागल्या. सर्वाधिक खप झाला. लोकमत औरंगाबादहून आणि सकाळ पुण्याहून येत होता, त्यावेळी पुण्यनगरी, दिव्य मराठी नव्हता. त्यामुळे एकमत नंबर १ वर होता. विभागीय दैनिकात केवळ एकमतचे  ऑफिस होते. त्यावेळी फॅक्स यंत्रणा होती,. हाताने बातम्या लिहून पाठवाव्या लागत होत्या. सर्व अर्जंट बातम्या फॅक्सवर जात होत्या. 


संपादक तुकाराम कोकजे होते, वृत्तसंपादक राजा माने तर कार्यकारी संपादक गुरुनाथ नाईक होते. उपसंपादक म्हणून नंदकिशोर पाटील, मंगेश देशपांडे - डोंग्रजकर, नंदकुमार सुतार,  संजय जेवरीकर, माधव दिवाण, गजानन औटी, रामराव गवळी,पांडुरंग कोळगे,अविनाश जोशी,हनुमंत चिटणीस, स्व. रवींद्र जगताप  ही  टीम होती. रविकिरण देशमुख आणि अभय देशपांडे मुंबई प्रतिनिधी होते. एकमतमध्ये उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्याच्या  सर्व ताज्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यामुळे वाचकांमध्ये एकमत लोकप्रिय झाला. माझ्या अनेक बातम्या, शोधवार्ता, वार्तापत्र, मुलाखती, लेख गाजले. आजही लोक त्यावेळच्या एकमतच्या आठवणी काढतात. 


१९९१ ते २००० असे सलग दहा वर्षे काम केल्यानंतर एकमत सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि पुन्हा अर्धेवेळी पत्रकारिता सुरु केली. पुन्हा केसरी आणि केसरीचे भावंड सह्याद्री  जॉईन केला. सायंकाळी येणारा सह्याद्री जवळपास एक हजार अंक उस्मानाबाद शहरात येत होता, नंतर लोकसत्ता, चित्रलेखा, लोकप्रभा, गावकरी आदी वृत्तपत्रात अर्धवेळ काम केल्यानंतर २०११ मध्ये स्वतःचे उस्मानाबाद लाइव्ह न्यूज पोर्टल सुरु केले. 


विलासरावांच्या एकमतमुळे अनेक चांगले पत्रकार घडले. एकमतच्या त्यावेळच्या टीममधील नंदकिशोर पाटील हे लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक आहेत. मंगेश देशपांडे - डोंग्रजकर, हे एकमत - पुढारी असा प्रवास करून सध्या एकमतचे संपादक आहेत. नंदकुमार सुतार हे पुढारी, सकाळचे संपादक झाले होते.   संजय जेवरीकर हे औरंगाबाद एकमत संपादक, नंतर  लोकपत्रचे संपादक झाले होते. माधव दिवाण हे पुणे येथे पुढारीत वृत्तसंपादक आहेत. गजानन औटी हे औरंगाबादमध्ये दिव्य मराठीत पान १ ची जबाबदारी सांभाळतात. पांडुरंग कोळगे हे एकमतचे संपादक झाले होते. राजा माने लोकमतचे संपादक झाले होते, आता निवृत्त आहेत. अविनाश जोशी आजही एकमतमध्ये आहेत. रामराव गवळी निवृत्त झाले आहेत. 


एकमतमध्ये असताना, एक त्रिकुट ( त्यातील दोन स्वर्गवासी झालेत )  लातूरला विलासराव आले कि, माझ्याबद्दल खोट्या तक्रारी घेऊन जात होते, पण विलासरावांनी फक्त ऐकून घेतले आणि पुढे काहीच केले नाही. केवळ त्यांच्यामुळे एकमतमध्ये दहा वर्षे काढली. पुढे त्यांच्या चिरंजीवाकडे कारभार जाताच मी स्वतःहून एकमत सोडले. लोकमत सोडले  नसते तर... लातूर सोडले नसते तर... असे अनेक विचार कधी - कधी मनात  येतात पण माझ्या उस्मानाबाद लाइव्हची ओळख काही कमी नाही. स्वतःचे काही तरी नव्या युगाचे नवीन काही तरी उभा करता आले याचा नक्कीच अभिमान आहे. दहा वर्षांपूर्वी डिजिटल मीडियात आलो म्हणून आजही पत्रकारितेत स्थिर आहे अन्यथा आज मला पत्रकारितेतून कायमचे  निवृत्त व्हावे लागले असते आणि स्वतःचे अस्तित्व संपले असते. जे काही होते, जे काही घडते ते चांगल्यासाठीच निर्माण होते, हे नक्की.


- सुनील ढेपे

संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 

9420477111