संपादकीय पान बंद होणार ?


सन  1988 - 89  ला जेव्हा मी पत्रकारितेची सुरुवात केली, तेव्हा आमच्यापुढे सोलापूरहून प्रसिद्ध होणाऱ्या संचारचे संपादक रंगाआण्णा वैद्य आणि औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव यांचा आदर्श होता , त्यांनी लिहिलेला  प्रत्येक अग्रलेख मी आवर्जून वाचत होतो, त्यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडत होता, ते स्वर्गवासी होवून अनेक वर्षे झाली तरी आजही माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. 


रंगाआण्णा वैद्य आणि अनंतराव भालेराव यांच्या नंतर आजवर किती आदर्श संपादक झाले ?  सध्या कोणता संपादक आदर्श वाटण्यासारखा आहे ? याचा विचार करीत होतो, पण चित्रलेखाचे ज्ञानेश महाराव वगळता एकही नाव समोर दिसत नाही. 


गेल्या काही वर्षात मी कोणत्याही वृत्तपत्राचा अग्रलेख वाचलेला नाही, वाचावा असे वाटत नाही. आजची तरुण पिढी तर वृत्तपत्र हातात धरत नाही, अग्रलेख तर वाचणे फार दूर. 


भविष्यात संपादकीय पानच रद्द होईल. जे पान कुणी वाचतच नाही ते देणे मालकाला परवडणारे नाही.केवळ शासकीय नियम आहे म्हणून हे पान सुरू आहे, पण शासकीय जाहिराती किती मिळतात ? हा एक प्रश्नच आहे. भविष्यात शासकीय जाहिराती मिळतील की नाही, याची शाश्वती नाही, जेव्हा शासकीय जाहिराती पूर्णपणे बंद होतील, तेव्हा आपोआप सर्व वृत्तपत्रे संपादकीय पान रद्द करतील.


सध्या वाचकांची अभिरुची बदलली आहे, त्यात कोरोनाने वृत्तपत्राचे कंबरडे मोडले आहे.प्रिंटचा काळ खूप कठीण आहे, डिजिटलचा बोलबाला आहे. 


- सुनील ढेपे

https://www.dhepe.in

9420477111