पुरस्कारामुळे तिरस्कार ....


पत्रकारितेच्या एकूण ३० वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास ४० हून अधिक पुरस्कार मला मिळाले. वयाच्या २१ वर्षीं लोकमतचा राज्यस्तरीय पां. वा. गाडगीळ पुरस्कार पहिल्यांदा मिळाला. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते हा पुरस्कार नागपुरात प्रदान करण्यात आला होता. सोलापूर केसरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या चिवरीतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार ? या  लेखास हा पुरस्कार मिळाला होता. चिवरीच्या महालक्ष्मी यात्रेत जी बेसुमार पशुहत्या सुरु होती, त्याच्याविरुद्ध मी सर्वप्रथम आवाज उठवला होता. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (रात्री ) भुताची यात्रा भरते, ही  अंधश्रद्धा सुद्धा आमच्या नवयुवक मंडळाने दूर केली होती. तेव्हा गावकऱ्यांचा मोठा हल्ला आमच्यावर झाला होता. 


१९९० मध्ये मिळालेल्या पुरस्कारामुळेच मला राजेंद्रबाबूंनी लातूरच्या लोकमतमध्ये शहर प्रतिनिधी म्हणून संधी दिली होती. नंतर उस्मानाबादला एकमतचा जिल्हा प्रतिनिधी झाल्यानंतर  १९९३ मध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा  पां. वा. गाडगीळ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार एकमतमध्ये लिहिलेल्या चिवरी यात्रेच्या संदर्भातीलच  होता. वृत्तपत्र वेगळे आणि लेख सुद्धा वेगळा होता. कंटेन्ट एक होता.पण एकाच विषयात दोन पुरस्कार कसे मिळतात म्हणून काही पत्रकारात पोटशूळ उठले. त्यात कळंबच्या एका  पत्रकाराने पुरस्कार रद्द करावा म्हणून परिषदेकडे तक्रार केली, पण ही  तक्रार फेटाळण्यात आली.  मुंबईत हा पुरस्कार लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी जयंतराव टिळक हे विधान परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी माझ्या लेखाची भरभरून स्तुती केली. दूरदर्शन हे एकमेव टीव्ही माध्यम होते, त्यावर ही  बातमी दाखवण्यात आली. त्यावेळी वय होते साधारण २४. इतक्या लहान वयात इतके मोठे पुरस्कार मिळाल्यामुळे आणखीच  हुरूप आला. उत्साह दुप्पट वाढला. 


त्यावेळी विलासराव देशमुख कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्या बंगल्यावरील गेस्ट रूममध्ये मुंबई प्रतिनिधी रविकिरण देशमुख राहात  होते, तेथेच एक दिवस मुक्काम केला होता, विलासराव देशमुख यांनी देखील त्यावेळी कौतुक करून शुभेच्छा दिल्या होत्या.तसेच  एकमताच्या वर्धापन दिनी दरवर्षी माझा सत्कार होत होता. त्यानंतर विविध संस्थेचे, विविध पत्रकार संघाचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यामुळे काही पत्रकारामध्ये आणखी पोटशूळ उठला. 



सन  २००४ मध्ये पत्रकार कल्याण निधीचा  बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार  जाहीर झाल्यानंतर मोठे रामायण घडले. पत्रकारितेत आलेल्या  एका कुकर्मीने  काही भामट्या पत्रकाराला हाताशी धरून हा पुरस्कार रद्द होण्यासाठी जंग जंग पछाडले, पण ६ जानेवारी २००५ मध्ये हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले ( ता. देवगड ) येथे प्रदान करण्यात आला, याच वर्षी मुंबईच्या  समर्थन संस्थेचा मानवी हक्क वार्ता पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आला. 



२०१६ मध्ये मराठी पत्रकार परिषदेचा कै . नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ठाण्यात विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  तसेच  प्रेस क्लबचा युवक पत्रकार पुरस्कार,डॉ. अनिल फळे यांच्या संस्थेचा चौथा स्तंभ पुरस्कार, सांगलीच्या महाराष्ट्र पत्रकार संघाचा पत्रकार रत्न, ऑल  इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार असे किती तरी पुरस्कार मिळाले. कुणी तरी आपल्या कामाची दाखल घेतंय, याचा आनंद  वाटत होता पण त्या आनंदावर विरझण टाकण्याचे काम उस्मानाबादच्या काही पत्रकारानी नेहमीच केले. 






बरोबरी करता येत नाही, स्पर्धा करता येत नाही  म्हणून पायात पाय घालण्याचे प्रकार आजवर झाले आहेत. मी कुणाला खाली घालून वर आलो नाही. मी कुणाची नोकरी घालून कामावर रुजू  झालो नाही. माझी मात्र अनेकांनी नोकरी घालवली.२००४ मध्ये कुकर्मीच्या षडयंत्रामुळे माझी आकाशवाणी- दूरदर्शनसाठी झालेली नियुक्ती रद्द झाली.  मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न अनेकवेळा झाला आहे. अन्नात विष कालवण्याचे प्रकार घडले आहेत. पण सत्य हे नेहमीच सत्य असते. मी  पत्रकारिता स्वतःचे खिसे भरण्यासाठी कधी केली नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी लढलो आणि लढत आहे. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असल्यामुळे आजही मी ताठ मानेने उभा आहे. कसलेही व्यसन नाही, गरजा मर्यादित आहेत, पोटापुरते कमवण्याची अक्कल नक्कीच आहे, त्यामुळे भविष्याची चिंता नाही. पत्रकाराचा खरा शत्रू हा पत्रकार आहे, हे मात्र नक्की. 


- सुनील ढेपे 

9420477111