तुमच्या शुभेच्छामुळे आज धन्य झालो...
आज माझा वाढदिवस. हा वाढदिवस पुण्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमात अनाथ मुलांच्या सोबत साजरा करण्याचा माझा मानस होता, पण कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. घरीच राहा, सुरक्षित राहा, हा मंत्र जोपासत घरीच कुटुंबासोबत साजरा केला. मुंबईत राहणाऱ्या मुलीने ऑनलाइन केक बुक करून पुण्यातील घरी पाठवला होता, तोच केक कापून वाढदिवस साजरा केला.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव. एका गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या घराण्यात कुणी यापूर्वी पत्रकार नव्हते. उपजीविकेसाठी वृत्तपत्र एजंट झालो, त्यातील बातम्या वाचत पुढे पत्रकार झालो, सोलापूर केसरीचे तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थकर यांच्यामुळे केसरीत संधी मिळाली. पुढे लातूर जिल्हा प्रतिनिधी झालो. नंतर लोकमत, एकमत, लोकसत्ता असा प्रवास करीत स्वतःचे वेबपोर्टल काढले. अणदूरसारख्या एका खेड्यागावातून वृत्तपत्र एजंट ते जिल्हा प्रतिनिधी आणि पुढे स्वतःचे वेबपोर्टल हा सारा इतिहास स्वप्नवत आहे. अणदूर ते लातूर, पुढे उस्मानाबाद आणि आता पुणे प्रवास पुस्तक लिहिण्यासारखा आहे. माझ्या पर्सनल वेबसाईट www.dhepe.in वर सर्व लिहिले आहे. तरीही नव्या पिढीसाठी अनुभवाचे बोल पुस्तक रूपाने लिहिणार आहे, हेच यानिमित्त संकल्प.
सडेतोड आणि निर्भीड पत्रकारिता करीत असताना काही जणांची कदाचित मने दुखावली असतील. पण माझा लढा व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध आहे. कुणीही माझा शत्रू नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून आजवर समाजाच्या समस्या सोडवणाचा प्रयत्न केला आहे. पत्रकारिता हा धंदा नसून धर्म मानलेला आहे. तोच बाणा यापुढेही कायम राहील.
आपण सर्वानी वाढदिवसनिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. त्या नेहमीच मला बळ आणि प्रेरणा देत राहतील. आपले प्रेम,स्नेह आणि सदिच्छा कायम पाठीशी राहो, हीच यानिमित्त अपेक्षा.
धन्यवाद आणि आभार
सुनील ढेपे