कठीण परिस्थितीमध्ये गणेशचे यश !


६ सप्टेंबर २०१६ रोजी उस्मानाबादेत असताना, विरोधात बातम्या दिल्या म्हणून दैनिक गावकरी कार्यालयावर काही गावगुंड आणि दारू विक्रेत्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता, त्यातून मी बालंबाल बचावलो होतो, पण आमच्यावरच हल्ला करून आमच्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आल्याने पुढे १४ दिवस जेल मध्ये राहावे लागले, त्यातून न्यायालयाने जामिनावर सुटका केली, पण काही अटी घातल्या होत्या, त्यामुळे मला उस्मानाबाद सोडावे लागले आणि पुण्यात यावे लागले. त्यावेळी गणेश हा श्रीपतराव भोसले हायस्कुल, उस्मानाबाद येथे सातवी मध्ये शिकत होता, मी पुण्यात आणि तो उस्मानाबादेत.
सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१६ दरम्यान खूप यातना सहन केल्या. माझी कुटुंबाला आणि कुटुंबाला माझी आठवण येत असे. कित्येक रात्री मी जागून काढल्या. कोणताही गुन्हा केला नसताना झालेल्या यातना खूप मोठ्या असतात. शेवटी सत्य हे सत्यच असते, नंतर या खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आणि ज्यांनी षड्यंत्र केले ते पापाचे फळे भोगत आहेत. असो...
एप्रिल २०१६ मध्ये गणेशची सातवीची परीक्षा संपल्यानंतर त्याला पुण्याला आणले. आठवीसाठी कुठे प्रवेश घ्यावा, हा मोठा प्रश्न होता. सर्व नामांकित शाळेत प्रवेश फुल्ल होते. त्यामुळे मुंढवा भागातील एका छोट्या शाळेत प्रवेश मिळाला. एका नामंकित शाळेत शिकलेल्या गणेशला थोडे दिवस चुकल्या- चुकल्या सारखे वाटत होते. तो खुश नव्हता.नववी मध्ये त्याला काही मित्र मिळाले, नंतर दहावी मध्ये थोडा रमला.त्याला हवे तसे शिक्षण मिळाले नाही, पण स्वतःच्या मेहनतीवर त्याने दहावीमध्ये ८७ टक्के गुण मिळवले. त्याची बहीण मयुरीला दहावी मध्ये ९२ टक्के गुण होते. ( टॉप ५ नुसार ९६ टक्के ) . भावाने बहिणीची बरोबरी केली नसली तरी तिच्या वाटेवर त्याचा प्रवास सुरु आहे.
पुढे ११, १२ ( विज्ञान ) करून इंजिनिअर होण्याची त्याची इच्छा आहे. त्याला आता पुण्यातील नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याची बहीण आता त्याची गुरु झाली आहे.माझे, दीपाचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत, आपल्या शुभेच्छा पाठीशी असू द्या...
-सुनील ढेपे