वाईटातून चांगले ...


वाईट घटनेतून कधी - कधी चांगले घडते, असे अनेकजण सांगतात.माझ्या बाबतीत खरंच वाईटातून चांगले घडले आहे. ६ सप्टेंबर २०१६ रोजी काही समाजकंटकांनी विरोधात बातमी दिली म्हणून उस्मानाबादेतील गावकरी कार्यालयावर हल्ला केला, या हल्ल्यात मी सुखरूप बचावलो, त्यानंतर  हल्लेखोरांनी पोलिसांच्या संगनमताने माझ्यासह तीन जणांवर खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना १४ दिवस नाहक जेलमध्ये राहावे लागले.दैव बलवत्तर म्हणून माझा व माझ्या सहकाऱ्यांचा  कोर्टाने जामीन मंजूर केला. जामीन देताना कोर्टाने  काही अटी घातल्यामुळे मला उस्मानाबाद सोडावे लागले आणि पुण्यात यावे लागले. आता चार वर्षे झाले, पुण्यातच स्थायिक झालोय.


खरं तर उस्मानाबाद सोडून पुण्यात जाण्याचा विचार या घटनेच्या दोन वर्षे अगोदर केला होता. २०१६ मध्येच एप्रिल महिन्यात मयुरीला पुण्यात कंपनीत जॉब मिळाला होता. चार वर्षे मुलगी औरंगाबादला होस्टेलवर राहत होती. तिला पुण्यात कुटुंबाचा आधार हवा होता. त्या घटनेमुळे पुण्यात आलो आणि तिचा आधार बनलो. मला मात्र सहा महिने त्रास सहन करावा लागला. सहा महिन्यानंतर उस्मानाबाद कोर्टाने घातलेली अट औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली होती, पण पुन्हा उस्मानाबाद नको, हीच  धारणा झाली होती. नंतर एक - दीड  वर्षानंतर त्या खोट्या गुन्ह्यातून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता झाली, पण उस्मानाबाद कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला होता. 


पुण्यात आल्यानंतर उस्मानाबाद लाइव्ह सुरूच होते. उस्मानाबादमध्ये राहणाऱ्या पत्रकारांना ज्या बातम्या कळत नाहीत, त्या मला पुण्यात राहून आजही  कळतात. त्या बातम्या कश्या कळतात, याचे अनेकांना कुतूहल आहे, अनेकांना वाटते, मी उस्मानाबादमध्ये राहतो,आज जरी पुण्यात राहत असलो तरी उस्मानाबादशी असलेली नाळ कधी तोडली नाही.सर्वात अगोदर बातमी, तेही कुणाचाही मुलाहिजा न ठेवता दिल्यामुळे उस्मानाबाद लाइव्हवरील वाचकांचा विश्वास कायम राहिला. दररोज किमान दोन ते तीन लाख वाचक उस्मानाबाद लाइव्हला भेट देतात.अनेक बातम्यांना 10 लाख हिट्स मिळाल्या आहेत, माझे काम हेच षडयंत्र करणाऱ्या तथाकथित पत्रपंडितांना उत्तर आहे.गेल्या महिन्यात ( नोव्हेंबर ) टाइम्स ग्रुपच्या कोलंबिया ( M 360  ) कंपनीने उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट डेव्हलप केली आहे. आता याच कंपनीने पुणे लाइव्ह वेबसाईट देखील डेव्हलप केली आहे. इतकेच काय तर त्यांच्या कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती दिल्या आहेत. टाइम्स ग्रुपच्या कंपनीची साथ मिळाल्यामुळे पुढे काम करण्यास अधिक उत्साह आला आहे.


उस्मानाबाद लाइव्ह, पुणे लाइव्ह बरोबर राज्यस्तरीय वेबसाईट असावी, अशी संकल्पना पुढे आल्याने बंद पडलेली महाराष्ट्र लाइव्ह वेबसाईट देखील दर्जेदार पद्धतीने सुरु केली आहे. उस्मानाबाद लाइव्हवर उस्मानाबाद जिल्ह्यातील, पुणे लाइव्हवर पुणे शहर, पुणे जिल्हा , पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र लाइव्हवर मुंबईसह  राज्यभरातील बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 


 सध्या डिजिटल युग आहे. पुढील वर्षी 5 G सुरू झाल्यानंतर  मीडियात आणखी आमूलाग्र बदल होतील, अनेक वृत्तपत्र बंद पडतील, वेबसाईटला तेही दर्जेदार कंटेंट असणाऱ्या वेबसाईटला अधिक महत्व येईल. काळाबरोबर आम्ही वेळोवेळी बदल केले आहेत,त्यामुळेच  टाइम्स ग्रुपच्या  M 360 कंपनीबरोबर काही बाबीवर करार केला आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी वेबसाईट सुरु केली होती , तेव्हा काही लोक  विशेषतः पत्रकार मला वेडे समजत होते. माझी हेटाळणी करीत होते. हेटाळणी करणारे आज  पत्रकारितेतून कालबाह्य झाले आहेत. तरुण पत्रकारांचा आज मी आयकॉन झालोय. जे तरुण मला सहकार्य मागतात,त्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. अनेकांना वेबसाईट सुरु करण्यासाठी प्रेरित केले आहे. मार्गदर्शन केले आहे. काही जण म्हणतात, फुकट सल्ला देत जावू  नका. पण मी पुण्यात राहून कधीच पुणेरी झालेलो नाही. व्यवहार कधी पाहिलेला नाही.


माझाकडे भांडवल नाही. मला आजपर्यंत  कामातून जे पैसे मिळाले त्यातून वेबसाईट सुरु केल्या आहेत. अनेकजण व्यसनात पैसा  घालवतात, मी नवनवीन डिजिटल प्रयोग करून पैसे खर्च करतो.हेच माझे वेड आहे. सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत मी नॉनस्टॉप काम करत आहे. काही मित्र याकामी सहकार्य करीत आहेत.कोरोना लॉकडाऊनच्या मागील  ८- ९  महिन्याच्या कालावधीत मी एक दिवसही  सुट्टी घेतलेली नाही. पुण्यात राहूनही आजपर्यंत कोरोनाने स्पर्श केलेला नाही.कोरोना आता हद्दपार होतोय. लस आली की  तो कायमचा जाईल. त्यानंतर पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस सुरु करण्याचा मानस आहे. 


सांगायचा मूळ मुद्दा म्हणजे, उस्मानाबाद सोडून पुण्यात आल्यामुळे उस्मानाबाद लाइव्ह सोबत पुणे लाइव्ह आणि महाराष्ट्र लाइव्ह वेबसाईट सुरु करता आली. अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. नवीन तंत्रज्ञान जाणून घेता आले. राज्यभरात नेटवर्क उभा करता आले. अनेक मोठ्या व्यक्तीबरोबर ओळख आणि मैत्री करता आली.  पुण्यापासून मुंबई जवळ असल्यामुळे मुंबईला अनेकवेळा जाता आले. मुलगी उलवे ( नवी मुंबई ) मध्ये राहते. केवळ अडीच ते तीन तास मध्ये तिच्याकडे केव्हाही जाता येते आणि तिलाही केव्हाही आमच्याकडे येता येते.गणेशचा चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे. तो पुढे येथेच शिकून मोठा होईल. 

असो, डोक्यात खूप भन्नाट कल्पना आहेत. त्या प्रत्यक्षात सुरु झाल्या की  त्यावर लिहीनच... आपण वाचक म्हणून माझ्यावर जे प्रेम आणि सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहे. तेव्हा असेच प्रेम आणि सहकार्य असू द्या. तेव्हा वाचत राहा उस्मानाबाद लाइव्हबरोबर पुणे लाइव्ह आणि महाराष्ट्र लाइव्ह. 


https://osmanabadlive.com/

https://www.punelive.today/

https://maharashtralive.today/


सुनील ढेपे

संपादक, उस्मानाबाद, पुणे आणि महाराष्ट्र लाइव्ह