योगायोग !

परवा जवळपास 15 वर्षांनी सोलापूर केसरीतील जुने सहकारी अरुण लोहकरे यांच्याशी फेसबुकवर चॅट झाले आणि त्यांचा मोबाईल नंबर घेवून जवळपास अर्धा तास फोनवर बोलणे झाले, लोहकरे यांनी सोलापूर केसरी सोडल्यानंतर पुण्यात आले, लोकमत, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रात काम करून गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारितेतून निवृत्ती घेतली, सध्या त्यांचे वय 54 आहे, वयाच्या 49 वर्षी निवृत्ती घेतल्याचे सांगताच, मी सहज कारण विचारले तर पत्रकारितेचा कंटाळा आला , हे नेहमीचा शब्द कानी पडला ! मीही याच वयात निवृत्ती घेण्याचा विचार करीत असताना, अनेक मित्रांनी लिहीत राहा असा सल्ला दिला, त्यामुळे अजून तरी निवृत्ती घेतलेली नाही !
बोलता बोलता केसरीचा विषय निघाला.
सन 1987 . त्यावेळी सोलापुरात फक्त संचार वृत्तपत्र निघत होते,संचार नाव इतके लोकप्रिय होते की, लोक इतर वृत्तपत्राला सुध्दा संचार म्हणत असत. पण संचार खिळे मोळे जोडून साध्या प्रिंटिंग युनिटवर निघत असे. केसरी डायरेक्ट ऑफसेट प्रिंटिंग युनिटवर सुरू झाला, मी त्यावेळी 12 वी शिकत होतो, शाळा शिकत केसरीची एजन्सी घेतली, सकाळी पेपर वाटत आणि त्यातील बातम्या वाचून बातम्या लिहिण्यास शिकलो.बातम्या लिहिण्यास शिकताच केसरीचे तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थंकर यांनी केसरीचा अणदूर वार्ताहर म्हणून संधी दिली, या संधीचे सोने केले, अनेक बातम्या गाजविल्या.तीन वर्षे काम केल्यानंतर माझे बीए शिक्षण पूर्ण झाले, मला एम ए साठी लातूरला जाण्याची इच्छा होती, त्याचवेळी लातूरचे जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील यांनी राजीनामा देवून लोकमत सोलापूरला गेले होते, या रिक्त जागेसाठी लातूरहुन अनेक अर्ज आले होते, मी बातमी देण्याच्या निमित्ताने सोलापूरला केसरी कार्यालयात गेलो असता,उपसंपादक अरुण लोहकरे यांना एम ए करण्यासाठी लातूरला जाण्याचा मनोदय सांगितला तर त्यांनी दामोदर पाटील यांनी राजीनामा दिल्याचे सांगून रामतीर्थकर यांना विचार असे म्हणतात, मी सरांना विचारणा केली तर सरच खूप आनंदी झाले, माझे टेन्शन मिटले असे म्हणत बरे झाले तू विचारल्यास, मी खूप विचारात होतो की लातूरसाठी चांगला माणूस हवा होता, त्यांनी तात्काळ होकार दिला आणि माझी ऑर्डर तयार केली. इतकेच काय तर त्यानंतर मला जवळच्या किनारा हॉटेल मध्ये स्पेशल चहा पाजला !
सर माझ्या कामावर खूप खुश होते आणि एक विश्वास होता.
सरामुळे मी लातूरला गेलो आणि पत्रकारितेचा पुढील प्रवास सुरु झाला.
दामोदर पाटील हे उमरगा तालुक्यातील रहिवासी, सध्या हयात नाहीत.त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. दामोदर पाटील यांनी त्यावेळेस राजीनामा दिला नसता तर मी लातूरला गेलो नसतो आणि अरुण लोहकरे यांनी कल्पना दिली नसती तरी मी लातूरला गेलो नसतो आणि अरुण रामतीर्थकर यांनी संधी दिली नसती तरी लातूरला गेलो नसतो ! हा योगायोग म्हणावा लागेल.
मी अरुण लोहकरे यांना, हे सांगताच तेही जुन्या आठवणीत डुंबून गेले.रामतीर्थकर भला माणूस म्हणून स्तुती केली!
रामतीर्थकर सरही सध्या हयात नाहीत ! पण सर आमच्या आठवणीत आहेत !
मी केसरी सोडून लोकमतला जात असताना सर म्हणाले होते, केसरी सोडत आहेस हे आमच्यासाठी वाईट आहे पण तुझे चांगले होत आहे, याचा आनंद आहे !
दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारे सर माझ्या सदैव हृदयात आहेत .
त्यांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही !
थँक्स अरुण लोहकरे !


- सुनील ढेपे