अनाथ मुलांसोबत सलग दुसऱ्या वर्षी दिवाळी !

दिवाळी सण नुकताच पार पडला. हा सण यंदाही माझी मुलगी मयुरी आणि तिच्या कंपनीच्या टीमने सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे मांजरी बु.,पुणे येथे सन्मती बाल निकेतन हे बालकाश्रम आहे. या आश्रमात जवळपास २५ ते ३० मुले आश्रय घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यांना आई - वडील, भाऊ - बहीण हे कोण आहे माहित नाही.या अनाथ मुलासोबत कु. मयुरी आणि तिच्या कंपनीच्या टीमने दिवाळी साजरी करून आपला आनंद द्विगुणित केला.
कु. मयुरी ऐक्सचर कंपनीत गेली दीड वर्ष झाले काम करीत आहे. या कंपनीत प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळ्या टीम काम करतात. कु. मयुरी काम करीत असलेल्या १० ते १५ जणांनी प्रत्येकी दोन हजार असे २५ हजार जमा केले. त्यातून मिठाई, कपडे, फटाके, मुलांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करून ते सन्मती बाल निकेतन बालकाश्रमातील मुलांना वाटप केले. इतकेच काय तर त्यांच्यासोबत फटाके उडविले, गाणी गायली, मौज - मजा केली आणि आपले क्षण आनंदाने घालवून मुलांना आनंद दिला. यादिवशी माई एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्याची खंत होतीच.
गतवर्षी वडगाव शेरीतील 'माहेर' फौंडेशनच्या बालकाश्रमात कु. मयुरी आणि तिच्या टीमने असाच उपक्रम राबविला होता. यंदा माझ्या सूचनेवरून माईच्या बालकाश्रमात त्यांनी हा उपक्रम राबविला.
माझे बालपण खूप गरिबीत गेले आहे. गरिबी काय असते हे मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळेच आम्ही दिवाळी सण सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणला.
- सुनील ढेपे - उस्मानाबादकर
पुणे -9420477111