धन्यवाद आणि आभार...

पत्रकारितेचा क्षेत्रात येवून मला २५ वर्षे झाली.या २५ वर्षात राज्य पातळीवरील १५ आणि विभागीय पातळीवरील १२ असे २७ पुरस्कार मिळाले,परंंतु मराठी पत्रकार परिषेदचा ठाणे येथे झालेला पुरस्कार वितरण सोहळा भव्य आणि दिव्य असा होता.या सोहळ्याच्या आठवणी स्मरणात राहतील अश्याच आहेत.
ठाण्याचे गडकरी रंगायन सभागृह खचाखच भरले होते.बसण्यासाठी खुच्र्या जवळपास १ हजार पण तितकेच लोक सभागृहाच्या दोन्ही बाजूला आणि सभागृहाच्या बाहेर उभारले होते.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण बिंदू होते.उध्दवजी येवू नये म्हणून पत्रकारितेतीलच काही विघ्नसंतोषी लोकांनी काड्या केल्या,परंतु त्याला भीक न घालता उध्दवजी आले आणि त्यांनी जे मार्मिक आणि उपदेशात्मक भाषण केले,ते पत्रकारांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना ९१ व्या जीवनगौरव पुरस्कार देवून मराठी पत्रकार परिषेदेने त्यांचा खरा अर्थाने गौरव केला आहे.त्याचबरोबर त्यांच्या नावावर ९२ हजाराची ठेव ठेवून त्यांना वृध्दापकाळात आधार दिला आहे.दिवू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे योगदान दिले आहे,ते नव्या पिढीला माहीत नव्हते.ते यानिमित्त सर्वांना समजून आले.
दिनू रणदिने यांनी त्याकाळी काढलेल्या साप्ताहिकाला स्व.बाळासाहेब ठाकरे हे दर आठवड्याला व्यंगचित्र देत असत.तेही एक रूपया न घेता.त्याची आठवण दिनू रणदिवे यांनी सांगितली आणि सभागृह सद्गदीत झाले.पत्नीने दिलेली साथ सांगताना,त्यांचे अश्रू अनावर झाले आणि सभागृहातील प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
मी सत्कारमुर्ती असल्यामुळे पहिल्याच रांगेत बसण्याचे भाग्य मला मिळाले.उध्दवजीच्या हस्ते कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार स्वीकारताना चेह-यावर वेगळाच आनंद होता.कार्यक्रमास माझे सर्व कुटुंब उपस्थित होते.त्याचबरोबर माझे मुंबईचे मित्र सोमनाथ तडवळकर उपस्थित होते.त्यांनीच सोबत एक कॅमेरामन आणला होता.त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची सर्व छायाचित्रे उपलब्ध झाली.
ठाणे शहरात आदल्या दिवशी पोहचल्यानंतर माझे मुंबईचे खास मित्र विनोद जगदाळे यांनी एस.एम.देशमुख सरांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात भला मोठा गुच्छ देवून केलेले स्वागत प्रवासाचा क्षीण घालवणारे होते.त्याचबरोबर मुंबईचे आणखी एक मित्र नितीन सावंत यांनी केलेली सर्व व्यवस्था यामुळे ठाणेचा दौरा कधी संपला हे कळलेच नाही.
पत्रकारितेच्या आजवरच्या प्रवासात अनेक पुरस्कार मिळाले,पण एस.एम.देशमुख सर,किरण नाईक आणि मराठी परिषदेच्या सर्व कार्यकारिणी मराठवाड्याच्या पुरस्कारासाठी माझी निवड करून जो सन्मान केला,त्याबद्दल एस.एम.सर,किरण नाईक आणि परिषदेच्या सर्व कार्यकारिणीचा सदैव ंऋणी राहीन.
पुरस्कार हा माझ्या दृष्टरने नवा नाही.परंतु प्रत्येक पुरस्कार मला काम करण्याची नवी उमेद देतो.निर्भिड,सडेतोड आणि निपक्ष पत्रकारिता करताना असे पुरस्कार नवी प्रेरणा देतात.पुरस्कार मिळाल्यापासून प्रदान होईपर्यंत माझ्या असंख्य मित्रांनी,हितचिंतकांनी आणि माझ्यावर प्रेम करणा-या वाचकांनी अभिनंदनाचा सातत्याने वर्षाव केला.कोणी फोन करून,कोणी एसएमएस करून तर कोणी फेसबुक,व्हॉटस् एॅपवर अभिनंदन केले.त्या सर्वांचा मी आभारी आहे.


# सुनील ढेपे
संपादक,उस्मानाबाद लाइव्ह