उस्मानाबाद लाइव्हचे पाचव्या वर्षात पदार्पण

उस्मानाबाद जिल्ह्यातील तसेच देश आणि विदेशात राहणा-या उस्मानाबादकरांचे आवडते ऑनलाईन न्यूज पोर्टल उस्मानाबाद लाइव्ह हे दि.२५ सप्टेंबर रोजी चार वर्षे पुर्ण करून पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे.चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या असंख्य वाचकांना कोटी कोटी प्रणाम तसेच आपणाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत आहोत.
सन २०१० मध्ये नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशी उस्मानाबाद लाइव्ह हे ऑनलाईन न्यूज पोर्टल सुरू केले.आज बघता - बघता चार वर्षे पुर्ण होवून आम्ही पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत.गेल्या चार वर्षात आम्ही जाहिरातीसाठी कोणाच्या दारात गेलो नाहीत की,जाहिरातीसाठी कोणाला आग्रह केलेला नाही.त्यामुळे उस्मानाबाद लाइव्ह हे कोणाच्याही दावणीला बांधले गेले नाही.आम्ही कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे मुखपत्र नाहीत.आम्ही वाचकांशी एकनिष्ठ आहोत.वाचक हेच आमचे मालक आहेत,म्हणूनच उस्मानाबाद लाइव्हने असंख्य वाचकवर्ग निर्माण केलेला आहे.
आज प्रत्येकाच्या घरी कॉम्प्युटर,लॅपटॉप आहे तसेच इंटरनेट जोडणी असल्यामुळे उस्मानाबाद लाइव्ह घरोघरी पोहचले आहेत.तसेच आज प्रत्येक युवकांच्या हाती स्मार्ट फोन आलेला आहे.त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या हातात पोहचलो आहोत.उस्मानाबाद लाइव्ह वाचणा-या वाचकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.
गतवर्षी उस्मानाबाद लाइव्हचा लूक चेंज केलेला आहे.आता काही दिवसांपुर्वी उस्मानाबाद लाइव्ह अ‍ॅप्सही तयार केलेला आहे.त्यामुळे प्रत्येक स्मार्ट फोन धारकांना उस्मानाबाद लाइव्ह न्यूज पोर्टल सहजरित्या वाचण्यास अधिक मदत झाली आहे.
उस्मानाबाद लाइव्हने उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी तात्काळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे.आमचे कितीतरी अंदाज सत्य ठरलेले आहेत.लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलेले आहे.त्यामुळे अनेकांना आमच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे.
आजची बातमी,उद्या नको,आजची बातमी आजच आणि आताच हे आमचे धोरण अंगीकारले आहे.त्यामुळे उस्मानाबाद लाइव्ह सर्वात लोकप्रिय झालेले आहे.तसेच टोच्या,गोफणगुंडा ही सदरे अधिक लोकप्रिय झालेली आहेत.आज प्रत्येकाच्या व्हॉटस् अ‍ॅप्सवर आमचा गोफणगुंडा फिरत आहे.सर्वच वाचकांनी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष भेटून या सदराचे कौतुक केलेले आहे.आमची खरी ताकद आमचे वाचकच आहेत.त्यामुळे आम्ही लिखाण करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही.एक निपक्ष,निर्भिड आणि सडेतोड हा आमचा बाणा आहे.व्यक्ती कितीही मोठा असो,त्याच्याविषयी आमच्यात कधीच भीती नाही.कोणी चुकत असेल तर चुका दाखवण्याची हिंमत आणि ताकद आमच्यात आहे.कारण आम्ही आजवर कोणाचे मिंधे झालो नाहीत.जाहिरातीसाठी कोणापुढे लाचारी पत्करलेली नाही.पत्रकारिता हा आम्ही कधीच धंदा केलेला नाही.धर्म मानलेला आहे.त्यामुळे पत्रकारितेत शिरलेले नवशिखे आणि अध्र्या हळकुंडात न्हालेले काही तथाकथित पत्रककार नेहमीच आमचा व्देष करीत आलेले आहेत.अशांची आम्ही कधीच पर्वा केलेली नाही.
ज्यांना आमच्याशी लिखाणाची स्पर्धा करता येत नाही,तेच मागे भुंकत असतात.गल्लीतील एक कुत्रे भुंकले की बाकीचे कुत्रेही भुंकत असतात.त्यांना भुंकण्याचे कारण काय हे माहित नसते.अशा कुत्र्यांच्या पेकाटात लाथ घालून आम्ही नेहमीच विजय मिळवलेला आहे.सत्य परेशान हो सकता है,पराजित नहीं...हे आम्हाला माहित आहे.असो,त्याचा समाचार नंतर कधीतरी सविस्तर घेवू...
उस्मानाबाद लाइव्हच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या असंख्य वाचकांना खूप खूप शुभेच्छा.आपले सहकार्य आणि प्रेम असेच कायम राहो,ही अपेक्षा.

सुनील ढेपे
संपादक
उस्मानाबाद लाइव्ह
9420477111