गाढवाचा जन्म

दोन दिवसांच्या पुणे दौ-यानंतर प्रवास नको वाटत होता.मात्र मुलीच्या होस्टेल प्रवेशाला पालकच उपस्थित राहण्याच्या अटीमुळे लगेच औरंगाबादला निघणे गरजेचे होते.सकाळच्या सहाच्या हायकोर्ट एक्स्प्रेस किंवा साडेसहाच्या सोलापूर - औरंगाबाद बसने निघायचे ठरले.मात्र प्रवासाने थकून आल्यामुळे जाग पावणेसहा वाजता आली.बरे झाले अ‍ॅडव्हान्स बुकींग केले नाही, नाही तर खूपच पंचायत झाली असती, असे वाटून गेले.स्नान - संध्या आवरून, साडेसात वाजता मुलगी व मी तयार झालो.घर ते बसस्टॅन्ड पाच मिनिटाचे अंतर मात्र हातात मोठ - मोठ्या बॅगा असल्यामुळे रिक्षा करणे आवश्यक होते. दहा मिनीटे झाली तरी सकाळच्या वेळेमुळे रिक्षा मिळाली नाही, शेवटी बॅगाचे ओझे वाहत, चालत बस स्टॅन्ड गाठले.
घरी गवळी मामा न आल्यामुळे चहा न घेताच निघालो होतो.एस.टी.कॅन्टींगमध्ये चहा घेतला आणि बाहेर येवून पहतो तर आठची सोलापूर - कन्नड बस लागली होती.बसमध्ये चढलो असता,केवळ मागच्या बाजूला दोन जागा शिल्लक दिसल्या. काहीका असेना, बसायला जागा मिळाली म्हणून, समाधानाचा सुस्कारा सोडला.बाजूला एक वृध्द बसले होते.अंगावर मळके कपडे,गालगुच्चे बसलेले, तोंडात तंबाखू धरलेली असा अवतार व हातात भगवा झेंडा पाहून हे वृध्द बहुतेक पंढरपूरहून गावाकडे परतत असल्याचा साक्षात्कार झाला.बस सुरू होतात,मी सोबत अणलेला एक हिंदी पेपर वाचण्यास सुरूवात केली.काही क्षणातच त्या वृध्द मामाने माझ्याजवळील पेपरची मराठवाडा पुरवणी हातात घेतली व त्याची घडी करून मी हा पेपर नेतो, अशी खूण केली.मी लगेच विचारले, मामा कुठे जायचे आहे, त्यावर त्यांनी बीड - बीड म्हणून दोनदा उच्चार केला.मग बीड आल्यावर पुर्ण पेपरचा घेवून जा, आता तो वाचायला द्या, असे म्हटले तरी तो पेपर काही परत देत नव्हता.मलाही एकदम पंढरपूरचा पांडुरंग आठवू लागला आणि पेपर परत मागण्याचा नाद सोडला.
काही वेळाने कंडक्टर तिकिट - तिकिट म्हणून जवळ आला.त्या मामाने एक चौसाळा म्हटले.मी लगेच विचारले, ओळखपत्र नाही का, त्याने हातानेच नाही अशी खूण केली. ज्यांचे वय अजून झाले नाही,ते एस.टी.च्या हाफ तिकिटाचा फायदा घेतात, या मामाचे वय झाले तरी फायदा मिळत नाही.यांना ओळखपत्र कुठे काढावे, किंवा काढण्यासाठी कोणी वारस नसावा असा विचार मनात येवून गेला व या मामाची थोडी दया आली.कंडक्टर गेल्यानंतर मामाने खिशातून काढलेली एक शंभरची नोट व काही दहाच्या नोटा घडी करून, माझ्याकडून घेतलेल्या पेपरच्या एका तुकड्यात गुंडाळून ते स्वत:च्या बुटात ठेवल्या तसा मला मामाने पेपर का घेतला, याचा उलघडा झाला.मामा बुटात पैसे ठेवत असल्याचे पाहून शेजारीच बसलेली एक महिला मोठ्याने हासू लागली.ते पाहून काही प्रवासीही हासू लागले. मग मीही लटके - लटके हासलो.
बस सुरू होवून अर्धा तास झाल्यानंतर या मामाने माझ्याकडे पाहून एका हाताचा बोट दुस-या हाताच्या तळव्यावर मळण्यास सुरू केली.मी काय म्हणून विचारले तर, त्यांनी तंबाखूची मागणी केली.मी खात नाही म्हटल्यानंतर, मामाने हत् तुझ्या, तुझा तर गाढवाचा जन्म म्हणून मला हिणवले.मला थोडेसे हासू आले तसे बाजूला बसलेली दोन अकरावी - बारावीला असलेली मुलेही हासू लागली.त्यातील एकाने त्याच्या खिशातून किसान जर्दाची तंबाखूची पुडी व चुना काढला व मामाला दिला.मामाने मग मस्त पैकी तंबाखू मळली व तोंडात भरून मी वयाच्या बारा वर्षापासून तंबाखू खातो म्हणून फुशारकी मारली.थोड्या वेळाने तंबाखू दिलेल्या मुलाने तंबाखूची पुडी वापस मागितली तर मामाने सगळी खाल्ली म्हणून खूण केली.वास्तविक मामाने राहिलेली पुडी खिशात ठेवली होती व पुढची तयारी केली होती.वारकरी असूनही मामा खोटे बोलतात म्हणून थोडा राग आला पण, असू दे म्हणून मी काय वय आहे असे विचारले.मामाने एक बोट वर करतात, शंभर का म्हणून विचारले तर त्यांनी मुंडके हालविले.व्वा शंभरी मारली म्हणतात, बाजूची मुले जन्म तारीख विचारू लागले.मामाला जन्म तारीख सांगता आली नाही.मामाने दिलेली तंबाखूची पुडी वापस दिली नाही, म्हणून दुस-या मुलाने तंबाखूची पुडी काढली व दोघेही तंबाखू खावू लागले.वृध्द मामा व नुकतीच मिसरूड फुटलेली दोन मुले तंबाखू खावून गप्पा मारू लागले तश्या गप्पा रंगू लागल्या.मामा कुठे गेला होता, म्हणून त्यांनी विचारले तर विठ्ठलाकडे म्हणून सांगितले.एक महिन्यापुर्वी चालत गेलो होतो, आता वापस जात आहे, असे मामाने मोडक्या तोडक्या भाषेत सांगितले.मामाचे वय व परिस्थिती पाहून चालत पंढरपूरला जायची खरीच गरज होती का, असे वाटून गेले.कांदा, मुळा आणि भाजी, अवघी विठाई माझी, असे म्हणत सावता माळीसह अनेक संत आपल्या गावातच विठ्ठलाला बोलवत असत, मग या मामाला या अवघड परिस्थितीत जायाची काय गरज होती, असे पुन्हा - पुन्हा वाटू लागले.
थोड्या वेळाने मामाने मला सुपारी आहे का म्हणून विचारले...नाही म्हणताच मामाने पुन्हा तुझा गाढवाचा जन्म म्हणून हिणवले.मामा मी कधीच तंबाखू, सुपारी खात नाही म्हणून सांगताच, मामाने का म्हणून विचारले. मला शंभर वर्षे जगायचे आहे म्हणून मी काहीच खात नाही म्हणताच, बाजूची मुले शक्य नाही म्हणून हिणवू लागली. आज- काल खाणा-या - पिणा-याला काहीच होत नाही,उलट निर्रव्यसनी लोकच लवकर वर जातात, असे ते म्हणताच,त्यांचे बोलणे सत्य वाटू लागले.मात्र माझी तंबाखू खाण्याची इच्छा मात्र झाली नाही.चौसाळा येताच हातात विठ्ठलाचा झेंडा घेतलेला मामा खाली उतरला आणि खरेच माझा गाढवाचा जन्म आहे का म्हणून विचार करू लागलो...औरंगाबाद आले तरी या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.परत उस्मानाबादला येताना वाटेत चौसाळा दिसले व वारकरी मामाची आठवण झाली.पुन्हा खरेच माझा गाढवाचा जन्म आहे का म्हणून विचार करू लागलो.शेवटी विठ्ठलाच विचारले, ब्बा, विठ्ठला, खरेच माझा गाढवाचा जन्म आहे का ? त्यावर विठ्ठल काही बोलला नाही...

* सुनील ढेपे
मो.9420477111
ई - मेल : dhepssm@gmail.com(ही सत्य घटनेवर कथा आहे)