न्यायालयातील पहिली साक्ष

अणदूरच्या बसस्थानकासमोर फुलचंद घुगे नावाचा अपंग व्यक्ती राहात होता. वृध्द आई - वडील, पत्नी, चार मुली व एक मुलगा असे त्याचे कुटुंब.त्याला एकूण पाच ते सहा एकर शेतजमिन.शेतीच्या वादातून त्याचा १९८९ मध्ये खून झाला. ज्यावेळी खून झाला, त्यावेळी अणदूरला बसस्थानक नव्हते. त्याच्या शेतापासून काही अंतरावर बस थांबत होत्या. त्या काळात अणदूरमध्ये काही विशिष्ठ लोकांची हुकूमत होती.त्यांच्याविरूध्द ब्र शब्द काढणे म्हणजे मरण ओढून घेणे होते. कोणालाही विनाकारण शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मजबुरीचा फायदा घेवून महिलांशी अनैतिक संबंध ठेवणे असे उद्योग या लोकांचे चालू होते.पोलीस अशा लोकांना पायबंद घालत नव्हते,त्यामुळे त्यांचे अत्याचार वाढत होते. फुलचंद घुगेची शेती गावातीलच तत्कालीन सरपंचाने बळकावली होती.फुलचंद शेतजमिन परत मागत होता, म्हणून त्याचा गुंडाकरवी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हद्दीत खून करण्यात आला.त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याला पोलीस उपनिरीक्षक अर्जुन काळे होते.त्यांनी हे खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.पंधरा दिवस झाले तरी खुनाबद्दल काहीच काहीच कारवाई झाली नव्हती.मी मोहोळ गाठले, घटनेची विचारपूस केली तर मला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मी कोणाचीही तमा न बाळगता केसरीमध्ये वृत्त प्रसिध्द केले.बातमीचे शिर्षक होते, फुलचंद घुगे खून प्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई... बातमीत कोणाचेही नाव न लिहिता सर्व गोष्टीचा उलघडा केला. बातमी वाचून गावात खळबळ उडाली.माझ्या घरी काही गुंड लोक आले, पुन्हा बातमी दिलास तर हातपाय तोडू, अशी धमकी देवून निघून गेले.मी या धमकीला न घाबरता पुन्हा बातमीचा पाठपुरावा केला.सरपंच व त्यांचे समर्थक आणखी चिडले. गुरूवारचा दिवस होता.अणदूरच्या आठवडी बाजाराचा हा दिवस.उस्मानाबादला राजू पाटील ( लोकमतचे नगर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार पाटील यांचे बंधु )यांनी कुलदैवत नावाचे दैनिक सुरू केले होते.त्याच्या प्रकाशन सोहळ्यास मी सकाळीच उस्मानाबादला निघालो होतो.वाटेत चौकात मला अडविण्यात आले, १० ते १५ जण हातात दांडपट्टा, लाकूड, दगड घेवून उभे होते.सर्वांनी मला रिंगण करून सिनेमा स्टाईल मारण्यास सुरूवात केली.किमान २०० ते ३०० लोक नुसते पहात होते, पण एकही बहाद्दर सोडविण्यास आला नाही. माझे पुर्ण अंग रक्तबंबाळ झाले होते. मी बेशुध्द पडल्यानंतर सरपंचाचे समर्थक निघून गेले.कोणीतरी मला उठविले.त्याच अवस्थेत उस्मानाबाद गाठले.राजू पाटलांना सर्व हकीगत सांगितली.प्रकाशन समारंभास डॉ.पद्मसिंह पाटील व अनेक मान्यवर आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रास्ताविक भाषणात राजू पाटील यांनी, पत्रकारांनी सत्य छापल्यानंतर काय घडले, हे माझे अंग उघडे करून दाखविले. सर्वजण अवाक् झाले. माझ्या मारहाण प्रकरणी सरपंचासह पाच लोकांना अटक झाली, दुस-या दिवशी सर्वांची सुटका झाली.प्रत्यक्ष घटना पाहणा-या एकानेही जबाब न दिल्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पाठविले नाही. या खून प्रकरणी पाठपुरावा करीतच राहीलो.नंतर फुलचंदच्या समाजातील काही लोकांचे सहकार्य मिळाले.तुळजापूरचे शेकापचे तत्कालीन आमदार स्व.माणिकराव खपले यांनी विधीमंडळात हे प्रकरण उचलून धरले. त्यानंतर या खून प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी झाली. सी.आय.डी.तील एकजण सरपंचच्या शेतात वर्षभर कामाला राहिला, सर्व हकीगत शोधून काढला व सरपंचचा मुलगा व मुस्तीच्या दोन गुंडांना अटक केली. ही अटक होईपर्यंत लोकांना खून कोण केला,हे माहीत नव्हते. या खून प्रकरणाची चर्चा होत होती, पण सत्य माहीत नव्हते.या अटकेमुळे शेवटी सत्य बाहेर आले. फुलचंदचा खून सरपंचाच्या मुलाने मुस्तीच्या दोन गुंडांना सुपारी देवून केल्याचे निष्षन्न झाले.त्यावेळी मी लातूरला राहात होतो.काही लोकांबरोबर माझाही जबाब सी.आय.डी.ने नोंदविला. पुढे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खून प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.आरोपीचे वकील धनंजय माने होते.ते प्रसिध्द वकील. न्यायाधीश धुमाळ साहेब होते.मला साक्ष देण्याच्या संदर्भातील समन्स मिळाल्यानंतर सोलापूरला गेलो.न्यायालयात साक्ष देण्याची माझी ही पहिली वेळ.त्यावेळी माझे वय २० ते २१ वर्षे. सरकारी वकीलांना भेटलो.ते निराश दिसले.सर्व साक्षीदार फितुर झाल्याचे त्यांनी सांगितले.माझी शेवटची साक्ष होतीे.काही वेळाने कोर्ट सुरू झाले.माझे नाव पुकारण्यात आले. कोर्टात न्यायाधीश धुमाळ साहेबांसमोर उभे राहिलो.फुलचंद घुगे यांची ओळख कशी ते मला झालेल्या मारहाणीबाबत सर्व हकीगत त्यांना सांगितली.त्यानंतर आरोपीचे वकील धनंजय माने उठले व मला कोर्टासमोर खोटे बोलत आहात असे दरडावून म्हणाले. आता कोर्टात जी हकीगत सांगितली ती पोलीस जबाबात नाही,असे त्यांचे म्हणणे होते.मी लगेच उत्तर दिले कि, हे मी पोलीसांनाही सर्व सांगितले होते,पण त्यांनी काय नोंदविले, हे मला माहीत नाही.माने निरूत्तर झाले. नंतर त्यांनी काही किरकोळ प्रश्न विचारले, पण त्यात दम नव्हता. साक्ष संपल्यानंतर चहा कँटींगमध्ये धनंजय माने यांची भेट झाली.त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवून चहा पाजविला.मला बरे वाटले.ते आरोपीचे वकील होते, पण त्यांच्यातील माणुसकी दिसून आली. काही दिवसांनी सोलापूरच्या सर्वच वृत्तपत्रात पान एकवर बातमी झळकली...अणदूरच्या फुलचंद घुगे खून प्रकरणी सरपंचाच्या मुलासह तिघांना जन्मठेप...मध्यभागी चौकटीत लिहिले होते...पत्रकार सुनील ढेपे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. काही दिवसांनी अणदूरला गेलो.सरपंच व त्यांच्या लोकांची हुकूमत नष्ट झाल्याचे दिसले.लोकांनी मला डोक्यावर घेतले. तेव्हापासून अणदूरचा मी हिरो ठरलो.