पत्रकारितेचे बदलते तंत्र आणि मंत्र...

माझ्या पत्रकारितेची सुरूवात १९८७ मध्ये झाली. त्यावेळी अणदूरमध्ये सोलापूरहून प्रसिध्द होणारा संचार, केसरी येत असत. संचार हा खिळे-मोळे जोडणी करून साध्या मशिनवर, तर केसरी ऑफसेटवर पण कृष्णधवल निघत असे. त्यावेळी रंगीत वृत्तपत्रे नव्हती. योगायोगाने मला केसरीचा वार्ताहर होण्याची संधी मिळाली. गावात घटना घडल्यानंतर एका साध्या कागदावर बातमी लिहून पोस्टाने पाठवत असे. ही बातमी तिस-या किंवा चौथा दिवशी प्रसिध्द होत असे. अपघाताची किंवा महत्वाची बातमी असेल तर सोलापूर गाठत असे. अपघातात एक किंवा दोन ठार झाले तरी ती त्यावेळी पहिल्या पानाची बातमी ठरत असे. आता पाचच्या पुढे आकडा असेल तर पहिल्या पानावर जागा मिळते, तेही त्या-त्या आवृत्तीमध्ये. असो...

१९९० मध्ये अणदूर सोडले व एमएसाठी लातूर गाठले. अणदूर ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर केसरीचाच लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगायोगाने संधी मिळाली. कारण त्यावेळचे जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील केसरी सोडून लोकमतसाठी सोलापूरला गेले होते. लातूरच्या महत्वाच्या बातम्या टेलिफोनवर ट्रंक बुकींग करून देत असे. काही बातम्या तारेने पाठवत असे. ट्रंक बुकींग म्हणजे पूर्वी एसटीडीची सुविधा नव्हती. टेलिफोन खात्याला फोन करून बुकींग करावे लागत होते. दोन-तीन तासानंतर नंबर लागत असे. ब-याचवेळा फोन कट होई. तार व ट्रंक बुकींग करण्याचे कार्ड केसरीकडूनच मिळाले होते. असे कार्ड फक्त मोजक्या वार्ताहरांना दिले जाई. लातूरमध्ये केसरीचे सहा महिने काम केल्यांनतर लोकमतचा लातूर शहर प्रतिनिधी म्हणून रूजू झालो. बाहेरहून येणा-या वृत्तपत्रांमध्ये फक्त लोकमतचे कार्यालय होते. कार्यालयात बसून बातम्या लिहिण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यावेळी लोकमतचे कार्यालय गंजगोलाईत वरच्या मजल्यावर होते. जयप्रकाश दगडे जिल्हा प्रतिनिधी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले. लोकमतमध्ये टेलिप्रिंटर होते. महत्वाच्या बातम्या टेलिप्रिंटरवर तर अन्य बातम्या पार्सल टॅक्सीसोबत जात. आमच्या सर्व बातम्या दुस-या किंवा तिस-या दिवशी प्रसिध्द होत असत. त्यावेळी लोकमत कृष्णधवलच होता पण त्याहीवेळी त्याचा सर्वाधिक खप होता.

लोकमतमध्ये एक वर्षे काम केल्यानंतर स्वत:च्या जिल्ह्यात ओळख निर्माण करण्यासाठी एकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून उस्मानाबादला आलो. त्यावेळी फॅक्सचा शोध लागला होता. महत्वाच्या बातम्या तारगृहातील फॅक्सवरून पाठवत होतो. त्यावेळी एकमतकडून फॅक्स कार्ड मिळाले होते. दोन वर्षानंतर एकमतचे स्वतंत्र कार्यालय सावरकर चौकात सुरू झाले. एकमतकडून फॅक्समशिन मिळाली. मधुकर भावे एकमतचे संपादक म्हणून रूजू झाल्यानंतर उस्मानाबादचे कार्यालय समतानगरमधील घोगरे कॉम्प्लेक्समध्ये अद्ययावत करण्यात आले. एकमत वगळता बाहेरहून येणा-या वृत्तपत्राची कार्यालये याठिकाणी नव्हती. नंतर लोकमतचे कार्यालय मी एकमत सोडताना सुरू झाले. आता बाहेरहून येणा-या सर्वच वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. लातूरहून प्रसिध्द होणा-या यशवंतनेही उस्मानाबादला सर्वांत सुंदर कार्यालय सुरू केले आहे.

आता सर्वच वृत्तपत्रे रंगीत सुरू झाली आहेत, सर्वच कार्यालयांत कॉम्प्युटर, इंटरनेट आहे. मोठ्या वृत्तपत्रात न्यूजसाठी चार ते पाच प्रतिनिधी आहेत. पत्रकारितचे तंत्र बदलले आहे. रात्री उशिरातील उशीरा घडलेली घटनाही दुस-या दिवशी प्रसिध्द होत आहे. प्रत्येक पत्रकाराच्या हातात मोबाईल आहे, पण पेन असून पेनचा वापर थांबला आहे. पूर्वीप्रमाणे बातमी कागदावर न लिहिता कॉम्प्युटरवर टाईप करावी लागते. ज्याला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान नाही, तो अज्ञानी पत्रकार समजला जातो. पत्रकारांची संख्या वाढली आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक पत्रकारांची संख्या वेगळीच. मी उस्मानाबादला आलो त्यावेळी म्हणजे १९९१-९२ ला शेषेराव कठारे, भारत गजेंद्रगडकर, एन एस गायकवाड, विजय कोकाटे, नंदकिशोर मंत्री, दिलीप पाठक-नारीकर असे बोटावर मोजण्याऐवढे पत्रकार होते. आता दौरा करायचा म्हटले तर एक बस लागते. उस्मानाबाद हा छोटा जिल्हा आहे तरी एवढी संख्या... बाहेरच्या जिल्ह्यांची कल्पना न केलेली बरी.

पूर्वी पत्रकारांचा दबदबा होता. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर तेथील शिपाई लगेच साहेबांकडे सोडत असे. आता परवानगी घेवूनही तास-तास वेटिंग करावे लागते. हे कशामुळे घडले, हा प्रश्न नेहमी सतावतो. पत्रकारितेचा आता बाजार झाला आहे. नीतिमूल्यांचा -हास झालेला आहे. पानभर जाहिरात दिली की, तो गुंड असला तरी त्याचे गोडवे गायला व पोवाडे म्हणायला आपले शाहीर तयार आहेत. वृत्तपत्रांच्या मालकांनाही आता चांगले लिहिणा-यापेक्षा चांगल्या जाहिराती देणारा प्रतिनिधी हवा आहे. भले तो पत्रकारितेच्या नावाखाली कितीही काळे धंदे करीत असला, तरी चालेल, पण जाहिरातीचा चांगला धंदा देणारा पत्रकार मालकांना हवा आहे. एकंदरीत पत्रकारितचे तंत्र जसे बदलेले आहे तसेच मंत्रही बदलला आहे.