सत्यमेव जयते...!


प्रत्येक पत्रकाराला कसलं ना कसलं व्यसन असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे समाज आज पत्रकाराकडे कुत्सीत नजरेने पहात आहे. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात,त्याप्रमाणे बोटावर मोजण्याऐवढ्या बदनाम पत्रकारामुळे चांगल्या पत्रकारांकडेहीे लोक वाकड्या नजरेने पहात आहेत. .आपलेच दात, आपलेच ओठ म्हणून पत्रकारही त्याकडे कानाडोळा करतात पण मी सहन न झाल्यामुळे पत्रकाराच्या विरोधातही बातमी दिली होती.
सन २००३ मध्ये घडलेली गोष्ट. उस्मानबादच्या जिल्हा कारागृहाच्या समोरील राधिका बिअर - बार मध्ये लोकसभेतील एका उमेदवाराकडून मिळालेल्या पैश्यातून नामवंत दैनिकातील चार पत्रकारांनी भरपूर दारू पिऊन गोंधळ घातला.नंतर वेटरवर मोबाईल चोरीचा आळ घातला.त्यामुळे संतप्त झालेल्या बार मालकाने चारही पत्रकारांना वेटरकडून धो...धो...धुतले...बेदम मार खावूनही या पत्रकारांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला नाही.परंतु ही बातमी शहर व जिल्ह्यात मोठ्या चवीने चर्चिली जात होती.
त्यावेळी मी सोलापूरच्या केसरी व सह्याद्री वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो.एकाही पत्रकराने बातमी टाकली नाही, मला मात्र काही पत्रकारांचे फोनवर फोन...ही बातमी तुच टाकू शकतोस असे त्यांचे म्हणने.
मी कधीच दारू पित नाही, मावा,खुटका वगैरे ...कधीच खात नाही. सिगारेट कधीच पित नाही. शुध्द शाकाहरी माणूस. गळ्यात विठ्ठलाची तुळशी माळ.शहरात एकमेव माळकरी पत्रकार. मी खूप विचार केला.जे व्हायचे ते होवू दे म्हणून..केसरी व सह्याद्रीमध्ये कोणाचेही नाव न लिहिता बातमी दिली. पाच ते सहा कॉलम बातमी होती.
त्यात लिहिले होते, चार पत्रकारांचे एकमत झाले... भरपूर दारू ढोसली,...नंतर वेटर व पत्रकारांत सामना रंगला... त्यात कधी सकाळ झाली हे कळलेच नाही...
लोकांनी काय अर्थ लावायचा तो लावला..
काही दिवसांनी मला योगायोगाने दर्पण पुरस्कार मिळाला.दारूड्या चार पत्रकारांनी मला मिळालेला दर्पण पुरस्कार रद्द होण्यासाठी छुप्प्या कारवाया केल्या. सह्यांची एक मोहीम राबवून माझा दर्पण पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली, त्यासाठी खूप आटा - पिटा केला. त्यांचे म्हणने होते की, शहरात अनेक ज्येष्ठ पत्रकार असताना, सुनील ढेपेला पुरस्कार का...? पण निवड समितीने दारूड्या पत्रकारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून हा पुरस्कार मला सन्मानपुर्वक प्रदान केला.
शेवटी सत्य हे सत्यच असते....हेच खरे....!
पत्रकारावर लिहिलेली ही बातमी अजूनही लोकांच्या व पत्रकारांच्या लक्षात आहे. या पत्रकारांनी मला बदनाम करण्यासाठी खूप वेळा षडयंत्र रचले...पण प्रत्येक वेळी त्यांच्यावरच बूमरँग उलटले. सत्याची कास धरल्यानंतर त्रास होणारच...
माझ्यापुढे संत ज्ञानेश्वरांचा आदर्श आहे. दररोज रात्री मी एक तास अध्यामिक वाचन करतो. प्रथम गणपती अर्थर्व शिष्य, नंतर ज्ञानेश्वरीतील काही ओळी, हरिपाठ व शेवटी पसायदान हा माझा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे.
कोणी काही म्हणोत...काही मुठभर लोकांनी वाईट म्हटले म्हणजे आपण वाईट ठरत नाही. तो वाईट का म्हणतो... याचा शोध घ्या... मगच आपले मत ठरवा...हेच यानिमित्त सांगणे.