चिवरीची अघोरी प्रथा...


तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव. गावापासून पाच - सहा कि.मी.अंतरावर चिवरी हे छोटसं खेडं. या खेड्यापासून दोन - तीन कि.मी. अंतरावर डोंगर कपारीत लक्ष्मीआईचं छोटसं मंदिर. मंदिराच्या आसपास लोकवस्ती नाही. चिवरीची लक्ष्मीआई नवसाला पावते असा भाविकांचा भ्रम. त्यामुळं येथे दर मंगळवारी व शुक्रवारी मोठी गर्दी होत असे.
लक्ष्मीआईसमोर कोंबडी किंवा बकरी कापून त्याचा नैवेद्य दाखविला जाई. मुलगा होवू दे, धनप्राप्ती होवू दे आदी नवस लक्ष्मीआईसमोर बोलले जात होते.बोललेला नवस पुर्ण झाला की, तिच्यासमोर कोंबडे किंवा बकरे कापायचे.बोललेला नवस नाही फेडला की, लक्ष्मीआई कोपते, असा भाविकांचा समज.त्यामुळं भीतीपोटी भाविक कोंबडी किंवा बकरी कापायचे.सोबत हातभट्टीची दारू. आधी दारू नंतर मटण यामुळे चिवरीची यात्रा अख्या महाराष्ट्र व शेजारच्या आंध्र व कर्नाटकात प्रसिध्द झाली. पुर्वी दर वर्षाला भरणा-या यात्रेत दहा हजारापेक्षा अधिक कोंबड्या , एक हजारापेक्षा अधिक बक-या व शंभराहून अधिक रेड्याचा बळी दिला जात होता, त्यामुळे चिवरीच्या यात्रेत रक्ताचा पाट वहात होते.ही यात्रा किमान पाच लाखापेक्षा अधिक भरत असे.कारण हावसे,नवसे व गवसे याठिकाणी येत असत.ही यात्रा विशेष करून मंगळवारी भरत होती व दुस-या दिवशी येथे कोणीही थांबत नव्हते.कारण बुधवारी रात्री याठिकाणी भुताची यात्रा भरते, असा आणखीण एक गैरसमज होता.
या अघोरी प्रथेविरूध्द सर्वप्रथम मी आवाज उठविला. सन १९८७ मध्ये फेबु्रवारी महिन्यात यात्रेच्या पुर्वी केसरीच्या सर्व आवृत्त्यामध्ये यासंदर्भात लेख प्रसिध्द प्रसिध्द झाला होता.लेखाचे शिर्षक होते, चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार ?
हा लेख वाचून अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीत काम करणारे काही कार्यकर्ते जागृत झाले व त्यांनी मला सोबत घेवून या अघोरी प्रथेविरूध्द आवाज उठविण्यास सुरूवात केली.साता-याचे नरेंद्र दाभोळकर दुस-या वर्षी आमच्यासोबत आले. मी अणदूरला नवयुवक तरूण मंडळ स्थापन केले. मंडळाचे कार्यकर्ते रामेश्वर जिरोळे, भुजंग घुगे, उमाकांम करपे आदींनी भुताच्या यात्रेचा गैरसमज दूर केला.माझ्यासह २० - २५ कार्यकर्ते यात्रेच्या दुस-या दिवशी रात्रभर लक्ष्मीआईसमोर बसून होतो. एकही भुत आला नाही. आम्ही वृत्तपत्रातून यासंदर्भात बातम्या दिल्या. त्यानंतर दोन - तीन वर्षे या अघोरी प्रथेविरूध्द लिहित राहिलो.नंतर नरेंद्र दाभोळकर यांनी या चळवळीत मोठा भाग घेतला.आम्ही सर्वानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरली. चिवरीच्या यात्रेतील अघोरी प्रथा बंद करा म्हणून अनेक वर्षे झगडल्यानंतर अणदूरचे सि.ना.आलूरे गुरूजी हेही चळवळीत सहभागी झाले.अखेर सर्वाच्या प्रयत्नांना यश आले.शासनाने चिवारी यात्रेतील पशुहत्त्येवर बंदी घातली.कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे भाविकांना सोबत आणलेले कोंबडे व बकरे परत न्यावे लागले. यात्रेतील आघोरी प्रथा बंद पडल्यानंतर गावाकडे परतत असताना चिवरीच्या ग्रामस्थांनी आमच्यावर सामुहिक हल्ला केला.आम्ही ४० -५० जण होतो.काही लोकांनी मार खाल्ला.काही जण सोबत आणलेल्या मोटारसायकली रस्त्यावर टाकून बाजूच्या शेतातील पिकात लपून बसले. आमच्या मोटार सायकली जाळण्यात आल्या. मी कसाबसा या जीवघेण्या प्रसंगातून वाचलो. यासंदर्भात सर्वच वृत्तपत्रांनी बॅनर न्यूज केली. तेव्हापासून चिवरी यात्रेतील पशुहत्त्या बंद झाली आहे.
चिवरी यात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला मला लोकमतचा राज्यस्तरीय पां.वा.गाडगीळ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पां.वा.गाडगीळ पुरस्कार मिळाले. त्यावेळी खासगी न्यूज चॅनेल नव्हते. शासनाचे दुरदर्शन होते. दोन्ही पुरस्काराच्या वेळी दुरदर्शनवर झळकलो.लोकमतचा पुरस्कार तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री गिरीजा व्यास तर अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार तत्कालीन विधानसभा सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते मिळाला.मुंबई मराठी पत्रकार संघात १ मे १९९४ ला हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला होता.विशेष म्हणजे माझ्या एकट्यासाठी हा कार्यक्रम होता.कारण दरवर्षी एकाच पत्रकाराला पुरस्कार दिला जाई. त्यावेळी माझे वय २४ वर्षे होते. यावेळी जयंतराव टिळक यांनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढले, तेही आजही लक्षात आहेत. खरी पत्रकारिता शहरात नसून खेड्यात आहे, ग्रामीण भागात अनेक आघोरी प्रथा चालू असून त्याविरूध्द पत्रकारांनी लिखाण करावे, सुनील ढेपे यांनी हे काम केल्यामुळेच त्यांना पुरस्कार दिला गेला आहे. सुनीलचा लेख मी स्वत: वाचल्याचेही त्यांनी आर्वजुन सांगितले होते.आज जयंतराव टिळक आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार सोबत आहेत.त्यांचे विचार लक्षात ठेवूनच माझी पत्रकारिता चालू आहे.