पत्रकारितेचा प्रवास....


तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव..अणदूरचे ग्रामदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी.घरची परिस्थिती तोलामोलाची.सन १९८५ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरी काही तरी हातभार लागावा म्हणून वृत्तपत्रांच्या एजन्स्या घेतल्या.केसरी,लोकमत,सकाळ आदी वृत्तपत्रांचे एजंट म्हणून काम करीत असताना हळूहळू या वृत्तपत्रात प्रसिध्द होणा-या वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी गावाच्या समस्या पाठवू लागलो.त्यातूनच माझ्यातील पत्रकारितेचा जन्म झाला.सर्वात प्रथम वार्ताहर होण्याची संधी केसरीने दिली.वृत्तसंपादक अरूण रामतिर्थकर यांनी दिलेल्या संधीमुळेच माझ्या पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला.
माझ्या पत्रकारितेची सुरूवातच सनसनाटी झाली.अणदूरमध्ये गाजलेले फुलचंद घुगे खून प्रकरण मीच उजेडात आणले होते. या खून प्रकरणाची बातमी दिल्यानंतर १० - १५ गावगुंडाकडून झालेली मारहाण आजही आठवणीत आहे. मारहाण झाल्यानंतरही हे प्रकरण उचलून धरले, त्यामुळेच खरे आरोपी गजाआड झाले व आरोपींना माझ्या साक्षीमुळेच जन्मठेप झाली, हे विशेष.
अणदूरपासून पाच - सहा कि.मी.अंतरावर चिवरी हे गाव.तेथे महालक्ष्मीच्या यात्रेत लाखो कोंबड्याचा व बक-याचा बळी दिला जात होता.त्याविरूध्द सर्वप्रथम मी केसरीमध्ये लेख लिहिला.याच लेखाला लोकमतचा राज्यस्तरीय पा.वा.गाडगीळ पुरस्कार मिळाला.त्यावेळी माझे वय २० वर्षे होते. नागपूरच्या देशपांडे सभागृहात तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री श्रीमती गिरीजा व्यास यांच्या हस्ते या पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.हा माझ्या जीवनातील पहिला पुरस्कार.याच पुरस्कारामुळे मला लोकमतमध्ये संधी मिळाली.राजेंद्रबाबू त्यावेळी संपादक होते.त्यांनी स्वत: माझी मुलाखत घेतली होती.अतुल कुलकर्णी यांनी लातूर सोडल्यामुळे रिक्त झालेल्या लातूर शहर प्रतिनिधीवर माझी वर्णी लागली होती. पण एका वर्षानंतर विलासराव देशमुख यांचा एकमत सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून रूजू झालो व लातूर सोडले.एकमतमध्ये तब्बल दहा वर्षे काम केले.याच काळात विविध १५ पुरस्कार मिळाले.
काही अडचणीमुळे एकमतचे काम सोडावे लागले व नंतर व्यवसायात शिरलो. मुक्तरंग कम्युनिकेशची निर्मिती झाली.बरेच उद्योग करीत छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो.केसरी,लोकसत्ता,चित्रलेखा,लोकप्रभा आदी दैनिकात व साप्ताहिकात लिखाण केले.पत्रकारितेच्या एकूण कारकिर्दीत राज्य पातळीवरील १५ व विभागीय पातळीवरील १० असे २५ पुरस्कार मिळाले.जिल्ह्यात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे पहिले पत्रकार व दर्पण पुरस्कार मिळविणारे पहिले पत्रकार म्हणून नोंद झाली.एक महिन्यापुर्वी उस्मानाबाद लाइव्ह हे इंटरनेट न्यूज चॅनल व ई -पेपर सुरू केले आहे.
पत्रकारितेच्या २० वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे आनंददायी प्रसंग आले, तेवढेच दु:खदही प्रसंग वाट्याला आले.काहीच चुक नसताना एकदा मारहाण, व दोनदा खोटी केस झाली.पण कधीच हार मानली नाही.फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून उंच झेप घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे.
कधी - कधी असे वाटते की, आता पत्रकारिता सोडून द्यावी, पण म्हणतात ना .. पत्रकार कधीच निवृत्त होत नसतो...तशीच माझी अवस्था झालेली आहे.