पुण्यातील दिमाखदार मराठवाडा मुक्ती दिन !

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले मात्र मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यामुळे संपूर्ण मराठवाडयात १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठवाडा मुक्ती दिन जसा मराठवाड्यात साजरा केला जातो तसाच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर असलेल्या पुण्यातही साजरा केला जातो. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातील लाखो लोक पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कामधंद्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आजही मराठवाड्यात दुष्काळ पडत असल्याने हा लोंढा वाढत चालला आहे. एका सर्व्हेनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मराठवाड्यातील किमान तीन लाख लोक राहतात हे समोर आले आहे..

यातून १० वर्षांपूर्वी मराठवाडा समन्वय समिती जन्माला आली. याच समितीच्या वतीने पुण्यात दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जातो.यंदा बालगँधर्व रंगमंदिर मध्ये मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्सहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम सर, पुण्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हेसेकर उपस्थित होते. विद्यमान अध्यक्ष महेंद्रकाका धुरगुडे यांचे मोठे बंधू राजकुमार धुरगुडे आहेत.संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. पाच वाजता सुंदर माझी शाळा हा भावमधुर गीतांचा कार्यक्रम सुरु झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील आष्टा कासारचे श्रीराम पोतदार आणि त्यांच्या चमूने बहार आणली. सात वाजता प्रमुख पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी मराठवाड्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या सात जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी अनपेक्षितरित्या माझाही निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकारिता करत असल्याबद्दल ऍड.उज्वल निकम सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मराठवाडा पैश्याने नव्हे मनाने श्रीमंत आहे असे मत ऍड.उज्वल निकम यांनी व्यक्त केले. आर्थिक बाबतीत राज्यात सहाव्या क्रमांकने पुढे असलेल्या कोल्हापुरात महापूर आल्यानंतर बीड, उस्मानाबाद सारख्या मागास जिल्ह्यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचे पुण्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हेसेकर यावेळी सांगितले. एक भाकरी जवळ असली तरी त्यातील अर्धी भाकरी मोडून दुसऱ्याला देणारा आपला मराठवाडा असल्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हेसेकर म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

पुण्यात आल्यानंतर मला कधी कधी एकटेपणाची भावना निर्माण होते.. पण अश्या कार्यक्रमातून आपल्या जिल्ह्यातील माणसे भेटली की हा एकटेपणा निघून जातो. उस्मानाबादला असताना दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाला हजेरी लावणारा मी आता या कार्यक्रमाला मुकतो की काय असे वाटत असताना उस्मानाबाद आणि मराठवाडयापेक्षा किती तरी पटीने चांगला कार्यक्रम पुण्यातही होतो हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला होता. पाच वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजता संपला. पाच तास कसे गेले हे कळले सुद्धा नाही. एका दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी महेंद्र धुरगुडे काका यांच्यामुळे मिळाली, याबद्दल त्यांचे ऋण मानावे तेवढे कमीच आहेत. राजकुमार धुरगुडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन !

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह