एक तरी वारी अनुभवावी

राम कृष्ण हरी...


मुंबईनंतर सर्वात मोठं शहर म्हणून पुणे ओळखले जाते . पुण्यात येऊन मला जवळपास दोन वर्ष होत आहेत. पुण्यातील रस्ते आता कुठं हळू - हळू माहित होत आहेत.पुण्याला फार मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे दररोज नवं नव्या बातम्या मिळतात. मात्र त्या लवकर समजायला थोडं कठीण आहे.
मी उस्मानाबादचा ! उस्मानाबाद शहर खूप छोटं शहर आहे. केवळ सव्वा लाख लोकसंख्या आहे. तेवढी लोकसंख्या तर पुण्यातील एका कोपऱ्यातील भागाची आहे. उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात पत्रकारिता करणं सोपं आहे. गेली ३० वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रकारिता केली. बातमीचे सोर्स खूप आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर बातमी मी दिली आहे.पुण्यात आलो तरी उस्मानाबादची बातमी मला अगोदर कळते.
पुण्यात पत्रकारिता करणं खूप अवघड आहे. एक तर प्रचंड मोठं शहर. त्यात वाहतुकीची कोंडी. येथे कोणते तरी एक बिट करता येते. एक तर येथील पत्रकार स्वतःला ग्रेट समजतात. त्यांना आपणापेक्षा दुसरं कोण तरी हुशार आहे, हे पटतच नाही. त्यामुळं नव्या पत्रकारास जम बसवणं अवघड आहे.
असो,
जगाच्या इतिहासानं नोंद घेतलेल्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. ५ तारखेला तुकाराम महाराज आणि ६ तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरीकडे निघाली आहे. कोणतेही साधने नसताना मी आणि चंद्रशेखर भांगे यांनी आळंदी ते सासवडपर्यंत वारी कव्हरेज केले. आमच्याकडे चार चाकी वाहन नाही. मोटारसायकल वरून पुणे ते वारी ठिकाण प्रवास केला. कॅमेरा किंवा कॅमेरामन नाही. व्हिडिओ एडिटर नाही. मोबाईलवर शूटिंग आणि मोबाईलवर एडिटिंग करत आम्ही ही वारी कव्हर केली. कधी फेसबुक लाइव्ह केले. इंटरनेट स्पीड कमी असताना किंवा कधी कधी मिळत नसताना जे शक्य आहे ते केले.
उस्मानाबादला असताना टीव्हीवर पाहणाऱ्या या वाऱ्या प्रत्यक्ष पाहिल्या. वारी कव्हर करण्याचा अनुभव नसताना रांगड्या भाषेत ते कव्हर केले. खरं तर मला प्रिंट मीडियाचा अनुभव आहे. पण जमेल तसे कव्हर केले. वारी कव्हर करताना तहान भूक लागत नव्हती. वारकऱ्यातील ऊर्जा पाहून आम्हालाही ऊर्जा येत होती. गेले पाच दिवस कसे गेले हे कळले नाही.एक तरी वारी अनुभवावी असं अनेकजण सांगत होते. खरंच वारी पाहून माणूस सर्व दुःख विसरतो. वारकऱ्यातील उत्साह पाहून आपणासहि उत्साह येतो. अनेक वृद्ध वारकरी चालत असल्याचे पाहून आपण स्वतःलाच खजील होतो..
वारी कव्हर करताना खूप छान वाटले ! वारीचा पुढचा टप्पा जमल्यास नक्की करणार आहे.
वारीचे कव्हरेज आमच्या युट्युबवर अपलोड केले. त्याला हजारो views येत आहेत. यापूर्वी मी युट्युब चॅनल अपलोड करत नव्हतो. पण वारीच्या निमित्ताने ते केले. एकाच महिन्यात पाच हजार सबक्राईबरर्स झाले.
सांगायचं मुद्दा असा की, तुमच्याकडे टीव्ही चॅनल नाही म्हणून रडत बसू नका. कॅमेरा, कॅमेरामन नाही म्हणून हताश होऊ नका. तुमच्या मोबाईलवर सुद्धा शूटिंग करून आणि एडिटिंग करून ते लोकापर्यंत पोहचवू शकता. एका वर्षात ५ जी येत आहे. डिजिटल मीडियात मोठी क्रांती होणार आहे.काळानुसार पत्रकारांनी चालले पाहिजे.
धन्यवाद !

सुनील ढेपे
9420477111
आमचे युट्युब चॅनल नक्की पाहा
goo.gl/dpQX85