मागे वळून पाहताना...

मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे पत्रकार भवन आहेत,ते याच संस्थेचे आहेत.ही संस्था स्थापन होवून आजमितीस ७७ वर्षे पुर्ण होत आहेत.या संस्थेचे अध्यक्षपद अनेक नामवंत पत्रकारांनी भूषविले आहे.
याच संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रतिष्ठेचे आणि मानाचे पुरस्कार दिले जातात.संपूर्ण मराठवाड्यातून एका पत्रकारास कै.नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार दिला जातो.यंदाच्या पुरस्कारांसाठी माझी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,किरण नाईक यांच्यासह सर्व पदाधिका-यांचा आभारी आहे.
माझ्या पत्रकारितेस २५ वर्षे पुर्ण झाली आहेत.वयाच्या १९ व्या वर्षी पत्रकारितेस सुरूवात केली आणि २१ व्या वर्षी लोकमतच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पां.वा.गाडगीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार मिळाला.नागपुरात तत्कालिन माहिती व प्रसारण मंत्री गिरीजा व्यास यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.तो पहिला पुरस्कार होता.त्यानंतर एका पाठोपाठ एक २५ हून अधिक पुरस्कार मिळाले.सन २००४ मध्ये बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार मिळाला.तत्कालिन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते जांभेकर यांच्या जन्मगावी म्हणजे पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला होता.त्यानंतर सर्वात मानाचा हा पुरस्कार आहे.या पुरस्कारामुळे आनंद तर झाला आहेच परंतु तितकीच जबाबदारी वाढली आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातून सन १९८७ पासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास अनेक संकटे झेलत इथंपर्यंत पोहचला आहे.मागे वळून पाहताना आपण काय होतो आणि काय झालो,याचे आत्मचिंतन केले की चेह-यावर आसू आणि हासू येतात.माझ्या घरात पत्रकारितेचा वारसा नाही.आई - वडील अशिक्षित.घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची.शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून अणदूरच्या मुद्दाना शेट्टी यांच्या हॉटेलात एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तीन रूपयावर दिवसभर काम केले.त्या आठवणी काढल्या की डोळे भरून येतात,परंतु गरीबीवर आणि सर्व संकटावर मात करत यशस्वी झालो,माझे जीवन म्हणजे एक कादंबरी आहे.अनेक मित्रांनी आत्मचरित्रावर कादंबरी लिहिण्याचा सल्ला दिला आहे.भविष्यात तो लिहिण्याचा मानस आहे.
पत्रकारिता ही चळवळ मानणा-यापैकी मी एक आहे.त्याचा कधी धंदा होवू दिला नाही.गरीबी काय असते आणि गरीबांचे प्रश्न काय असतात,या चाकोरीतून मी गेलो आहे.त्यामुळे कितीही यश मिळाले तरी गर्विष्ठ होत नाही आणि कितीही अपयश आले तरी खचून जात नाही.यश आणि अपयशाच्या पलिकडे मी गेलो आहे.संत ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा मी किती तरी वेळा वाचलेली आहे.त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माझ्यावर ज्या ज्या वेळी संकटे कोसळली त्या प्रत्येकी वेळी कोणी ना कोणी देवासारखा धावून आलेला आहे.या जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही,परंतु या जगात अनेक देवासारखी माणसे आहेत,हे मला माहित आहे.त्यामुळे या जगात सर्वजण वाईट आहेत,हा भ्रम मी कधी करून घेतलेला नाही.नेहमी सकारात्मक विचार ठेवून वाटचाल केलेली आहे.
असो,कै.नागोजीराव दुधगावकर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक मित्र,हितचिंतक आणि मार्गदर्शकांनी फोन,एस.एम.एस.व्हॉटस एॅप,फेसबुक आणि प्रत्यक्ष भेटीत अभिनंदन करून ज्या शुभेच्छा दिल्या आहेत,त्याबद्दल सर्वांचे पुनश्च आभार...
सुनील ढेपे
संपादक,उस्मानाबाद लाइव्ह
www.osmanabadlive.com