पत्रकारितेची २५ वर्षे

मित्रानो, तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव. वयाच्या १९ व्या वर्षी (१९८७) माझ्या पत्रकारितेचा श्रीगणेशा झाला.केसरीच्या सोलापूर आवृत्तीचे तत्कालिन वृत्तसंपादक अरूण रामतिर्थकर सर यांनी मला अणदूरमध्ये वार्ताहर म्हणून काम करण्याची सर्वप्रथम संधी दिली.त्यानंतर तीन वर्षे अणदूरमध्ये काम केल्यानंतर लातूर जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील यांनी केसरीचा राजीनामा दिल्यामुळे ,रामतिर्थकर यांनी,मला लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि तेथूनच माझ्या पत्रकारितेने नवे वळण घेतले.केवळ रामतिर्थकर सर यांनी,संधी दिल्यामुळेच आज मी इथंपर्यंत आलो आहे.
ऑगस्ट १९९१ मध्ये एकमत सुरू झाल्यानंतर,उस्मानाबादला आलो.दहा वर्षे एकमतचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले.लोक माझी एकमतची कारकिर्द अजूनही विसरले नाहीत.कोणीही भेटले की म्हणतात,तुम्ही एकमतला असताना,जबरदस्त बातम्या होत्या,वगैरे...असो,पुढचे काही सांगत नाही.
सांगायचा मुद्दा म्हणजे, बघता - बघता माझ्या पत्रकारितेला सुरूवात करून २५ वर्षे पुर्ण झालेली आहे.
या २५ वर्षात माझी काहीच अर्थप्राप्ती नाही,माझा उस्मानाबादला तीन रूमचा एक प्लॅट आहे.त्या प्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माझी अणदूरची वडिलोपार्जित शेती विकलेली आहे.चार चाकी गाडी अजून घेवू शकलो नाही.पण खंत नाही.राज्य आणि विभागीय पातळीवरील ३० पेक्षा अधिक पुरस्कार मला मिळालेले आहेत.अनेक ठिकाणी माझा सन्मान होतो.हिच माझी धन - दौलत आहे.
माझी मुलगी कु.मयुरी ढेपे ही औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिस-या वर्षात शिकत आहे.पुढच्या वर्षी ती इंजिनिअर होईल.हाच माझा सोशल कारखाना आहे.मुले हीच आई-वडिलांचा सोशल कारखाना असतो.त्यांना चांगले शिक्षण दिले की,ते आपले नाव करतात,या मताचा मी आहे.
असो,गेल्या २५ वर्षात अनेक संकटे येवूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून ताठमानेने उभा आहे.गेली सात - साडेसात वर्षे खूप कठीण गेली.एक प्रकारची साडेसाती माझ्या जीवनात होती.ही साडेसाती आता निघून गेलेली आहे.सापाची कात निघून जावी,तसे झाले आहे.पुन्हा सळसळत्या अंगाने माझी पत्रकारिता सुरू झालेली आहे.आपले प्रेम,आशिर्वाद आणि सहकार्य अपेक्षित..

सुनील ढेपे
मुख्य संपादक,उस्मानाबाद लाइव्ह -