आम्ही बातम्या लिहीत नाही... आम्ही इतिहास लिहितो!
मी पत्रकारितेत आलो... की पत्रकारिता माझ्याकडे आली, हे आजही कळत नाही. अणदूरच्या माळरानावरून चालत, सायकलवरून खडबडीत रस्त्यांवरून जाताना माझ्या खिशात शून्य रुपये होते, पण डोक्यात बातमीचा बॉम्ब असायचा. वयाच्या १९व्या वर्षी ‘पत्रकार’ ही ओळख पाठीवर घेतली आणि थेट रणभूमीत उतरलो.
सुरुवात झाली होती अणदूर वार्ताहर म्हणून. तिथूनच सुरू झाला स्टोरींचा थरार. केसरीमध्ये अरुण रामतीर्थकर यांच्यासारख्या वृत्त संपादकाने विश्वास टाकला आणि माझ्या बातम्या ‘बातमी’च नव्हे, तर चर्चेचा विषय बनल्या. फुलचंद घुगे खून प्रकरण असो की चिवरीच्या महालक्ष्मी यात्रेतील पशुहत्या — बातमीच्या पुढे जाऊन परिणाम घडवणारी पत्रकारिता मी तिथे शिकत होतो... आणि घडवत होतो.
रामतीर्थकरांनी लातूरचा जिल्हा प्रतिनिधी केलं आणि बातमीचा कंपास बदलला. ‘ रिपोर्टर’ ते ‘जिल्हा प्रतिनिधी’ हा प्रवास कुठल्या मास्टर्सपेक्षा भारी शिकवणारा ठरला.१९९१ मध्ये एकमतमुळे माझा प्रवास धाराशिवला वळला. फक्त १५०० पगारात बातम्यांची शिदोरी भरली होती. बातम्या विकत नव्हे, भिडवून लिहायचो.
केसरी, लोकमत, एकमत, सह्याद्री, लोकसत्ता, भास्कर... वृत्तपत्रं बदलली, पण माझं ध्येय एकच होतं — सत्य.मग येऊन धडकली सगळी मोहीम डिजिटल युगात!
धाराशिवमध्ये मी पहिलं इंटरनेट कॅफे सुरू केलं. लोक ब्राउझ करत असताना, माझं डोकं ‘न्यूज पोर्टल’च्या कल्पनेवर क्लिक करत होतं. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढलं. मी हसून घेतलं. कारण मला भविष्य दिसत होतं — आजची बातमी 'आज' नव्हे, तर 'आताच' द्यायचं असतं!
धाराशिव लाइव्ह — माझं स्वप्न, माझा श्वास, आणि पत्रकारितेचा खरा चेहरा. गेली १४ वर्षे धाराशिव लाइव्हने ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ खरंच जगवलाय.
गोरगरिबांपासून मंत्र्यांपर्यंत, अन्यायापासून भ्रष्टाचारापर्यंत, आम्ही कोणालाही नजरेआड केलं नाही. आमच्या बातम्या फक्त बातम्या नसतात... त्या आवाज असतो — दुर्लक्षितांचा, दमलेल्या लोकांचा, सत्याचा.
आज अनेकजण वेबसाईट सुरू करतायत, कारण प्रिंटमधून बाहेर फेकले गेलेत. पण आम्ही तेव्हा सुरू केलं, जेव्हा ‘वेबसाईट’ हा शब्दही अनेकांना कळत नव्हता.
धाराशिव लाइव्ह आजही जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय, सर्वाधिक वाचक असलेली वेबसाईट आहे — ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ही आहे लोकांच्या विश्वासाची पावती.
माझी पत्रकारिता ही माझी कर्मभूमी आहे. मी तिचा व्यापार नाही केला.
हा व्यवसाय नव्हे, हाच माझा धर्म आहे.
कारण...
"बातमी ही खरी असेल, तर ती क्रांती घडवते!"
आणि आम्ही तीच क्रांती दररोज घडवत राहतो.
धाराशिव लाइव्ह म्हणून, धाराशिवच्या प्रत्येक हक्कासाठी.