सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं !



उस्मानाबादेत सन 2020 मध्ये 10, 11 आणि 12 जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या साहित्य संमेलनात झी २४ तासचे तत्कालीन रिपोर्टर मुस्तान मिर्झा  यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी  उस्मानाबाद लाइव्हमध्ये पोटतिडकीने सडेतोड लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे वाभाडे काढले होते. 'बिहारी बाबू , आता तरी जागे व्हा ' असे त्या लेखाचे हेडिंग होते.


ही पोस्ट माझे खास मित्र बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती.  त्यामुळे पोलिसांनी चिडून माझ्यासह  सुभेदारविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दि. १४ जानेवारी २०२० रोजी  पोलीस ( अप्रितीची भावना चेतवने)  कायदा 1922 चे  कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात  दोषारोपपत्र  दाखल केले होते. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंध महाराष्ट्रात पत्रकारांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला होता. 


या एफआयआर आणि चार्जशीटला आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्याच्या औरंगाबाद खंडपीठात दि. 16/02/2021 रोजी आव्हान दिले होते. कोरोनामुळे या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली होती. पण दीड वर्षानंतर या आव्हान याचिकेचा दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी निकाल लागला असून, न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले आहे  आणि पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं असेच म्हणावे लागेल. 


पत्रकारानी पोलिसांविरुद्ध सत्य लिहिले की , पोलीस ब्रिटिशकालीन कलम पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) कायदा 1922 चे कलम ३ चा गैरवापर करून पत्रकाराविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करतात, त्रास देतात. त्यामुळे हे कलम कायमचे रद्द करावे, यासाठी आता लढा द्यावा लागेल. तसेच म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो' या म्हणीप्रमाणे ज्या पोलिसांनी आमच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला त्यांच्याविरुद्ध उस्मानाबाद न्यायालयात मानहानीचा दावा ठोकणार आहोत. 


असो, माझी बाजू न्यायालयात भक्कमपणे  मांडणारे ॲड. सुशांत चौधरी यांचे मनपूर्वक आभार. याप्रकरणी माझी बाजू घेणाऱ्या पत्रकारांचे देखील आभार. 


खरंतर पत्रकारांचे खरे दुश्मन पत्रकारच आहेत, दुकानदारी आणि चाटूगिरी करणारे पत्रकार भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करतात, त्यांचे कान भरतात, आम्हीच या नगरीचे मेन पत्रकार आहोत म्हणून बडेजाव मिरवतात, त्यामुळे प्रामाणिक पत्रकारांची गोची होत आहे. प्रामाणिक पत्रकारांना टार्गेट करण्याचे काम हुजरेगिरी करणारे पत्रकार नेहमीच करतात, अशा दुकानदारी आणि चाटूगिरी करणाऱ्या पत्रकाराविरुद्ध देखील माझा लढा सुरूच राहील आणि प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन , हेच यानिमित्त पुन्हा एकदा सांगणे ....


- सुनील ढेपे

संपादक,धाराशिव लाइव्ह