पहिले आऊटपूट ...
मुंबईच्या बिर्ला जर्नालिझम महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने मला काही दिवसापुर्वी एक प्रश्न विचारला होता, उस्मानाबाद लाइव्ह सुरू करून चार महिने होत आहेत, काही आऊटपूट मिळाले का ? मी त्यावर शांतपणे एकच उत्तर दिले होते, कोणत्याही रोपट्याला लगेच फळ लागत नाही, रोपटे मोठे व्हावे लागते, त्याचे वृक्षात रूपांतर व्हावे लागले, मगच त्याला फळ लागते...
अगदी तसेच घडले, पहिले फळ मिळाले ते...उस्मानाबाद लाइव्हला मिळालेला वेब जर्नालिझमचा चौथा स्तंभ विशेष पत्रकार पुरस्कार... यापेक्षा कोणते चांगले आऊटपूट असू शकते ? उस्मानाबाद लाइव्हची मुहूर्तमेढ ८ ऑक्टोबर २०१० रोजी रोवण्यात आली. त्या दिवशी घटस्थापना होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेवून आम्ही हे शिवधनुष्य उचलले.अवघ्या चार महिन्यात जगभरातील असंख्य मराठी वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळविले आहेत. हा ई - पेपर खास करून उस्मानाबाद बाहेरच्या असंख्य माहेरवासिणीसाठी व शिक्षण,व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या लोकांसाठी काढण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील किती तरी मुली लग्नानंतर बाहेरच्या जिल्ह्यात गेलेल्या आहेत, तसेच अनेक जण शिक्षण,व्यवसाय व नोकरीसाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर, परजिल्ह्यात व देशाबाहेर गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात व गावात काय चालले आहे, याची खबरबात पाहिजे, त्यांना आपल्या होमटाऊनची ओढ असते. त्यांच्यासाठीच आम्ही हे ई - पेपर सुरू केलेले आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादचे हे पहिले ई - पेपर आहे.ते सुरू करताना फायदा व तोट्याचा कधीच विचार केलेला नाही.किमान एक वर्षे तोटा सहन करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. जाहिरातीसाठी आम्ही कोणाचे उंबरठे झिजवलेले नाहीत, किंवा लाचारीही पत्करलेली नाही. जे घडले ते बिनधास्त देण्याचा, जे चुकले असेल तेथे सडेतोड लिखाण करण्याचा आमचा हातखंडा आहे. एवढेच नाही तर जेथे चांगले घडते, किंवा कोणी चांगले काम करीत असेल तर त्याचे तोंडभरून कौतुकही आम्ही केलेले आहे. आज प्रत्येक दैनिकाच्या जिल्हा आवृत्त्या निघाल्या आहेत, त्यामुळे कितीही मोठे दैनिक असले तरी त्यांची बातमी उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर जात नाही, मात्र उस्मानाबाद लाइव्हची प्रत्येक बातमी जगभरात पोहचत आहे.विशेष म्हणजे बातम्या क्षणाक्षणाला अपडेट करणारे मराठवाड्यातील हे एकमेव ई - पेपर आहे. मराठवाड्यात आज अगदी बोटवर मोजण्याऐवढेच ई - पेपर्स आहेत.पण उस्मानाबाद लाइव्हने सर्वात मोठी आघाडी घेतलेली आहे, हे नम्रपुर्वक सांगावे वाटते. सन २००० मध्ये उस्मानाबादला पहिले इंटरनेट कॅफे सुरू केले , तेव्हापासून मला इंटरनेटची माहिती आहे. तेव्हाच्या इंटरनेटची स्पीड व आताच्या स्पीडमध्ये खूप फरक पडलेला आहे. जसे तंत्रज्ञानात बदल झाले तसेच मीडीयामध्येही बदल झाले. आज प्रिंट व इलेक्टॉनिक मीडीयाबरोबरच इंटरनेट ( वेब ) मीडीया उदयास आला आहे. आगामी दशकात वृत्तपत्रांची जागा ई - पेपर्स घेतील, असे अनेकांचे भाकीत आहे. आमचे सुध्दा हेच ठाम मत आहे. त्यादृष्टीनेच आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे आम्ही आताच आऊटपूटची अपेक्षा करीत नाही.आम्हाला मिळालेला चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार हेच आमचे पहिले आऊटपूट आहे, हे मात्र नक्की... |