येत्या दशकात वेब मीडियाचा उदय - सुनील ढेपे


सोलापूर - दहा वर्षापुर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया अस्तित्वात नव्हता, तो आता उदयास आला आहे. येत्या दशकात बेब मीडिया उदयास येईल व तो थर्ड मीडिया म्हणून ओळखला जाईल. काळाची पाऊले उचलून विद्याथ्र्यानी आताच वेब मीडियाचे ट्रेनिंग घ्यावे, असे आवाहन उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी येथे केले.
सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या वतीने उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांचे मंगळवारी वेब जर्नालिझम या विषयावर व्याख्यान, संवाद व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.यावेळी विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर प्रा.देवानंद गडलिंग उपस्थित होते.
येत्या दशकात म्हणजे सन २०२० मध्ये वृत्तपत्रांची जागा ई -पेपर्स घेतील, असे सांगून सुनील ढेपे म्हणाले की, गेली अनेक वर्षे फक्त प्रिंट मीडीया होता.आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रिंट मीडीयाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे वाटले होते, पण त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.मात्र येत्या दशकात वेब मीडियाचा उदय होईल व प्रिंट मीडीयाचे अस्तित्व धोक्यात येईल.कागदाचे वाढलेले दर, मशिनरीचे वाढलेले भाव व कर्मचा-याचा फुगत चाललेला पगार यामुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडतील, व या वृत्तपत्रांची जागा ई - पेपर्स घेतील.
ई - पेपरमध्ये टेस्ट, ऑडिओ, व्हीडीओ यांचा मिलाफ आहे. एकप्रकारे प्रिंट मीडीया, इलेक्टॉनिक मीडीया, आकाशवाणी यांचा संगम आहे.तर जाहिराती स्कोल, टेस्ट, अ‍ॅनिमिशन, ऑडिओ, व्हीडीओ अशा पाच प्रकारे टाकून जाहिरातदारांचे समाधान करण्यास वाव आहे. शिवाय लटेस्ट घडलेली त्वरीत वाचकांपर्यत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ई - पेपर राहणार आहे.त्यामुळे येत्या काळात वेब जर्नालिझमला महत्व प्राप्त होईल. जर्नालिझमच्या विद्याथ्र्यांनी तसेच या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणा-यांनी कॉम्प्युटर, डीटीपी, इंटरनेट यांचे प्रशिक्षण घ्यावे, जे घेणार नाहीत, त्यांना चांगले लिहिता येवूनही कोणी विचारणार नाही. केवळ याच कारणामुळे अनेक चांगले लिहिणारे पत्रकार आऊटडेटड झाले आहेत, असेही सुनील ढेपे म्हणाले.
जर्नालिझमच्या विद्याथ्र्यांना जोपर्यत संधी मिळत नाही तोपर्यंत त्यांनी ब्लॉगर पत्रकार बनावे. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्ककिंगच्या माध्यमातून आपले फॅन्स फॉलो करावेत,असे सांगून ढेपे यांनी पत्रकारितेचे अनुभव, गाजलेले वार्तापत्र, काही गंमतीजमती सांगून विद्याथ्र्यांशी थेट संवाद साधला.प्राजेक्टरच्या माध्मातून उस्मानाबाद लाइव्ह हे ई - पेपर दाखवून बातम्या कशा पध्दतीने अ‍ॅडस्, इडित व डिलीट कराव्यात हे प्रात्यक्षिक दाखविले. नॉन स्टॉप दोन तास चाललेल्या या व्याख्यान, संवाद व प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्याथ्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याला सुनील ढेपे यांनी समर्पक उत्तरे दिली.प्रारंभी प्रा.देवानंद गडलिंग यांनी सुनील ढेपे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.शेवटी आभार विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांनी मानले.
उस्मानाबाद लाइव्हला वेब जर्नालिझमकरिता मिळालेला चौथा स्तंभ पुरस्कार हे पहिले आऊटपूट तर सोलापूर विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटने गेस्ट लेक्चर म्हणून दिलेले निमंत्रण हे दुसरे आऊटपूट असल्याचे सुनील ढेपे यांनी जाता - जाता सांगितले.

सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या वतीने उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांचे मंगळवारी वेब जर्नालिझम या विषयावर व्याख्यान, संवाद व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, यावेळी प्रा.देवानंद गडलिंग.विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर दिसत आहेत.

सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या वतीने उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे यांचे मंगळवारी वेब जर्नालिझम या विषयावर व्याख्यान, संवाद व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, यावेळी त्यांचे स्वागत करताना प्रा.देवानंद गडलिंग. यावेळी विभागप्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर दिसत आहेत.

पहिले आऊटपूट ...

  मुंबईच्या बिर्ला जर्नालिझम महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने मला काही दिवसापुर्वी एक प्रश्न विचारला होता, उस्मानाबाद लाइव्ह सुरू करून चार महिने होत आहेत, काही आऊटपूट मिळाले का ? मी त्यावर शांतपणे एकच उत्तर दिले होते, कोणत्याही रोपट्याला लगेच फळ लागत नाही, रोपटे मोठे व्हावे लागते, त्याचे वृक्षात रूपांतर व्हावे लागले, मगच त्याला फळ लागते...
अगदी तसेच घडले, पहिले फळ मिळाले ते...उस्मानाबाद लाइव्हला मिळालेला वेब जर्नालिझमचा चौथा स्तंभ विशेष पत्रकार पुरस्कार... यापेक्षा कोणते चांगले आऊटपूट असू शकते ?
उस्मानाबाद लाइव्हची मुहूर्तमेढ ८ ऑक्टोबर २०१० रोजी रोवण्यात आली. त्या दिवशी घटस्थापना होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेवून आम्ही हे शिवधनुष्य उचलले.अवघ्या चार महिन्यात जगभरातील असंख्य मराठी वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळविले आहेत. हा ई - पेपर खास करून उस्मानाबाद बाहेरच्या असंख्य माहेरवासिणीसाठी व शिक्षण,व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या लोकांसाठी काढण्यात आलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील किती तरी मुली लग्नानंतर बाहेरच्या जिल्ह्यात गेलेल्या आहेत, तसेच अनेक जण शिक्षण,व्यवसाय व नोकरीसाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर, परजिल्ह्यात व देशाबाहेर गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात व गावात काय चालले आहे, याची खबरबात पाहिजे, त्यांना आपल्या होमटाऊनची ओढ असते. त्यांच्यासाठीच आम्ही हे ई - पेपर सुरू केलेले आहे. विशेष म्हणजे उस्मानाबादचे हे पहिले ई - पेपर आहे.ते सुरू करताना फायदा व तोट्याचा कधीच विचार केलेला नाही.किमान एक वर्षे तोटा सहन करण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. जाहिरातीसाठी आम्ही कोणाचे उंबरठे झिजवलेले नाहीत, किंवा लाचारीही पत्करलेली नाही. जे घडले ते बिनधास्त देण्याचा, जे चुकले असेल तेथे सडेतोड लिखाण करण्याचा आमचा हातखंडा आहे. एवढेच नाही तर जेथे चांगले घडते, किंवा कोणी चांगले काम करीत असेल तर त्याचे तोंडभरून कौतुकही आम्ही केलेले आहे.
आज प्रत्येक दैनिकाच्या जिल्हा आवृत्त्या निघाल्या आहेत, त्यामुळे कितीही मोठे दैनिक असले तरी त्यांची बातमी उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेर जात नाही, मात्र उस्मानाबाद लाइव्हची प्रत्येक बातमी जगभरात पोहचत आहे.विशेष म्हणजे बातम्या क्षणाक्षणाला अपडेट करणारे मराठवाड्यातील हे एकमेव ई - पेपर आहे. मराठवाड्यात आज अगदी बोटवर मोजण्याऐवढेच ई - पेपर्स आहेत.पण उस्मानाबाद लाइव्हने सर्वात मोठी आघाडी घेतलेली आहे, हे नम्रपुर्वक सांगावे वाटते.
सन २००० मध्ये उस्मानाबादला पहिले इंटरनेट कॅफे सुरू केले , तेव्हापासून मला इंटरनेटची माहिती आहे. तेव्हाच्या इंटरनेटची स्पीड व आताच्या स्पीडमध्ये खूप फरक पडलेला आहे. जसे तंत्रज्ञानात बदल झाले तसेच मीडीयामध्येही बदल झाले. आज प्रिंट व इलेक्टॉनिक मीडीयाबरोबरच इंटरनेट ( वेब ) मीडीया उदयास आला आहे. आगामी दशकात वृत्तपत्रांची जागा ई - पेपर्स घेतील, असे अनेकांचे भाकीत आहे. आमचे सुध्दा हेच ठाम मत आहे. त्यादृष्टीनेच आमची वाटचाल चालू आहे. त्यामुळे आम्ही आताच आऊटपूटची अपेक्षा करीत नाही.आम्हाला मिळालेला चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार हेच आमचे पहिले आऊटपूट आहे, हे मात्र नक्की... 

दर्पण पुरस्काराची आठवण...


पत्रकारितेचे बदलते तंत्र आणि मंत्र...

माझ्या पत्रकारितेची सुरूवात १९८७ मध्ये झाली. त्यावेळी अणदूरमध्ये सोलापूरहून प्रसिध्द होणारा संचार, केसरी येत असत. संचार हा खिळे-मोळे जोडणी करून साध्या मशिनवर, तर केसरी ऑफसेटवर पण कृष्णधवल निघत असे. त्यावेळी रंगीत वृत्तपत्रे नव्हती. योगायोगाने मला केसरीचा वार्ताहर होण्याची संधी मिळाली. गावात घटना घडल्यानंतर एका साध्या कागदावर बातमी लिहून पोस्टाने पाठवत असे. ही बातमी तिस-या किंवा चौथा दिवशी प्रसिध्द होत असे. अपघाताची किंवा महत्वाची बातमी असेल तर सोलापूर गाठत असे. अपघातात एक किंवा दोन ठार झाले तरी ती त्यावेळी पहिल्या पानाची बातमी ठरत असे. आता पाचच्या पुढे आकडा असेल तर पहिल्या पानावर जागा मिळते, तेही त्या-त्या आवृत्तीमध्ये. असो...

१९९० मध्ये अणदूर सोडले व एमएसाठी लातूर गाठले. अणदूर ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर केसरीचाच लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगायोगाने संधी मिळाली. कारण त्यावेळचे जिल्हा प्रतिनिधी दामोदर पाटील केसरी सोडून लोकमतसाठी सोलापूरला गेले होते. लातूरच्या महत्वाच्या बातम्या टेलिफोनवर ट्रंक बुकींग करून देत असे. काही बातम्या तारेने पाठवत असे. ट्रंक बुकींग म्हणजे पूर्वी एसटीडीची सुविधा नव्हती. टेलिफोन खात्याला फोन करून बुकींग करावे लागत होते. दोन-तीन तासानंतर नंबर लागत असे. ब-याचवेळा फोन कट होई. तार व ट्रंक बुकींग करण्याचे कार्ड केसरीकडूनच मिळाले होते. असे कार्ड फक्त मोजक्या वार्ताहरांना दिले जाई. लातूरमध्ये केसरीचे सहा महिने काम केल्यांनतर लोकमतचा लातूर शहर प्रतिनिधी म्हणून रूजू झालो. बाहेरहून येणा-या वृत्तपत्रांमध्ये फक्त लोकमतचे कार्यालय होते. कार्यालयात बसून बातम्या लिहिण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यावेळी लोकमतचे कार्यालय गंजगोलाईत वरच्या मजल्यावर होते. जयप्रकाश दगडे जिल्हा प्रतिनिधी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले. लोकमतमध्ये टेलिप्रिंटर होते. महत्वाच्या बातम्या टेलिप्रिंटरवर तर अन्य बातम्या पार्सल टॅक्सीसोबत जात. आमच्या सर्व बातम्या दुस-या किंवा तिस-या दिवशी प्रसिध्द होत असत. त्यावेळी लोकमत कृष्णधवलच होता पण त्याहीवेळी त्याचा सर्वाधिक खप होता.

लोकमतमध्ये एक वर्षे काम केल्यानंतर स्वत:च्या जिल्ह्यात ओळख निर्माण करण्यासाठी एकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून उस्मानाबादला आलो. त्यावेळी फॅक्सचा शोध लागला होता. महत्वाच्या बातम्या तारगृहातील फॅक्सवरून पाठवत होतो. त्यावेळी एकमतकडून फॅक्स कार्ड मिळाले होते. दोन वर्षानंतर एकमतचे स्वतंत्र कार्यालय सावरकर चौकात सुरू झाले. एकमतकडून फॅक्समशिन मिळाली. मधुकर भावे एकमतचे संपादक म्हणून रूजू झाल्यानंतर उस्मानाबादचे कार्यालय समतानगरमधील घोगरे कॉम्प्लेक्समध्ये अद्ययावत करण्यात आले. एकमत वगळता बाहेरहून येणा-या वृत्तपत्राची कार्यालये याठिकाणी नव्हती. नंतर लोकमतचे कार्यालय मी एकमत सोडताना सुरू झाले. आता बाहेरहून येणा-या सर्वच वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. लातूरहून प्रसिध्द होणा-या यशवंतनेही उस्मानाबादला सर्वांत सुंदर कार्यालय सुरू केले आहे.

आता सर्वच वृत्तपत्रे रंगीत सुरू झाली आहेत, सर्वच कार्यालयांत कॉम्प्युटर, इंटरनेट आहे. मोठ्या वृत्तपत्रात न्यूजसाठी चार ते पाच प्रतिनिधी आहेत. पत्रकारितचे तंत्र बदलले आहे. रात्री उशिरातील उशीरा घडलेली घटनाही दुस-या दिवशी प्रसिध्द होत आहे. प्रत्येक पत्रकाराच्या हातात मोबाईल आहे, पण पेन असून पेनचा वापर थांबला आहे. पूर्वीप्रमाणे बातमी कागदावर न लिहिता कॉम्प्युटरवर टाईप करावी लागते. ज्याला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान नाही, तो अज्ञानी पत्रकार समजला जातो. पत्रकारांची संख्या वाढली आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक पत्रकारांची संख्या वेगळीच. मी उस्मानाबादला आलो त्यावेळी म्हणजे १९९१-९२ ला शेषेराव कठारे, भारत गजेंद्रगडकर, एन एस गायकवाड, विजय कोकाटे, नंदकिशोर मंत्री, दिलीप पाठक-नारीकर असे बोटावर मोजण्याऐवढे पत्रकार होते. आता दौरा करायचा म्हटले तर एक बस लागते. उस्मानाबाद हा छोटा जिल्हा आहे तरी एवढी संख्या... बाहेरच्या जिल्ह्यांची कल्पना न केलेली बरी.

पूर्वी पत्रकारांचा दबदबा होता. जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर तेथील शिपाई लगेच साहेबांकडे सोडत असे. आता परवानगी घेवूनही तास-तास वेटिंग करावे लागते. हे कशामुळे घडले, हा प्रश्न नेहमी सतावतो. पत्रकारितेचा आता बाजार झाला आहे. नीतिमूल्यांचा -हास झालेला आहे. पानभर जाहिरात दिली की, तो गुंड असला तरी त्याचे गोडवे गायला व पोवाडे म्हणायला आपले शाहीर तयार आहेत. वृत्तपत्रांच्या मालकांनाही आता चांगले लिहिणा-यापेक्षा चांगल्या जाहिराती देणारा प्रतिनिधी हवा आहे. भले तो पत्रकारितेच्या नावाखाली कितीही काळे धंदे करीत असला, तरी चालेल, पण जाहिरातीचा चांगला धंदा देणारा पत्रकार मालकांना हवा आहे. एकंदरीत पत्रकारितचे तंत्र जसे बदलेले आहे तसेच मंत्रही बदलला आहे. 

न्यायालयातील पहिली साक्ष

अणदूरच्या बसस्थानकासमोर फुलचंद घुगे नावाचा अपंग व्यक्ती राहात होता. वृध्द आई - वडील, पत्नी, चार मुली व एक मुलगा असे त्याचे कुटुंब.त्याला एकूण पाच ते सहा एकर शेतजमिन.शेतीच्या वादातून त्याचा १९८९ मध्ये खून झाला. ज्यावेळी खून झाला, त्यावेळी अणदूरला बसस्थानक नव्हते. त्याच्या शेतापासून काही अंतरावर बस थांबत होत्या. त्या काळात अणदूरमध्ये काही विशिष्ठ लोकांची हुकूमत होती.त्यांच्याविरूध्द ब्र शब्द काढणे म्हणजे मरण ओढून घेणे होते. कोणालाही विनाकारण शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मजबुरीचा फायदा घेवून महिलांशी अनैतिक संबंध ठेवणे असे उद्योग या लोकांचे चालू होते.पोलीस अशा लोकांना पायबंद घालत नव्हते,त्यामुळे त्यांचे अत्याचार वाढत होते. फुलचंद घुगेची शेती गावातीलच तत्कालीन सरपंचाने बळकावली होती.फुलचंद शेतजमिन परत मागत होता, म्हणून त्याचा गुंडाकरवी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हद्दीत खून करण्यात आला.त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याला पोलीस उपनिरीक्षक अर्जुन काळे होते.त्यांनी हे खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.पंधरा दिवस झाले तरी खुनाबद्दल काहीच काहीच कारवाई झाली नव्हती.मी मोहोळ गाठले, घटनेची विचारपूस केली तर मला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मी कोणाचीही तमा न बाळगता केसरीमध्ये वृत्त प्रसिध्द केले.बातमीचे शिर्षक होते, फुलचंद घुगे खून प्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई... बातमीत कोणाचेही नाव न लिहिता सर्व गोष्टीचा उलघडा केला. बातमी वाचून गावात खळबळ उडाली.माझ्या घरी काही गुंड लोक आले, पुन्हा बातमी दिलास तर हातपाय तोडू, अशी धमकी देवून निघून गेले.मी या धमकीला न घाबरता पुन्हा बातमीचा पाठपुरावा केला.सरपंच व त्यांचे समर्थक आणखी चिडले. गुरूवारचा दिवस होता.अणदूरच्या आठवडी बाजाराचा हा दिवस.उस्मानाबादला राजू पाटील ( लोकमतचे नगर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार पाटील यांचे बंधु )यांनी कुलदैवत नावाचे दैनिक सुरू केले होते.त्याच्या प्रकाशन सोहळ्यास मी सकाळीच उस्मानाबादला निघालो होतो.वाटेत चौकात मला अडविण्यात आले, १० ते १५ जण हातात दांडपट्टा, लाकूड, दगड घेवून उभे होते.सर्वांनी मला रिंगण करून सिनेमा स्टाईल मारण्यास सुरूवात केली.किमान २०० ते ३०० लोक नुसते पहात होते, पण एकही बहाद्दर सोडविण्यास आला नाही. माझे पुर्ण अंग रक्तबंबाळ झाले होते. मी बेशुध्द पडल्यानंतर सरपंचाचे समर्थक निघून गेले.कोणीतरी मला उठविले.त्याच अवस्थेत उस्मानाबाद गाठले.राजू पाटलांना सर्व हकीगत सांगितली.प्रकाशन समारंभास डॉ.पद्मसिंह पाटील व अनेक मान्यवर आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रास्ताविक भाषणात राजू पाटील यांनी, पत्रकारांनी सत्य छापल्यानंतर काय घडले, हे माझे अंग उघडे करून दाखविले. सर्वजण अवाक् झाले. माझ्या मारहाण प्रकरणी सरपंचासह पाच लोकांना अटक झाली, दुस-या दिवशी सर्वांची सुटका झाली.प्रत्यक्ष घटना पाहणा-या एकानेही जबाब न दिल्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पाठविले नाही. या खून प्रकरणी पाठपुरावा करीतच राहीलो.नंतर फुलचंदच्या समाजातील काही लोकांचे सहकार्य मिळाले.तुळजापूरचे शेकापचे तत्कालीन आमदार स्व.माणिकराव खपले यांनी विधीमंडळात हे प्रकरण उचलून धरले. त्यानंतर या खून प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी झाली. सी.आय.डी.तील एकजण सरपंचच्या शेतात वर्षभर कामाला राहिला, सर्व हकीगत शोधून काढला व सरपंचचा मुलगा व मुस्तीच्या दोन गुंडांना अटक केली. ही अटक होईपर्यंत लोकांना खून कोण केला,हे माहीत नव्हते. या खून प्रकरणाची चर्चा होत होती, पण सत्य माहीत नव्हते.या अटकेमुळे शेवटी सत्य बाहेर आले. फुलचंदचा खून सरपंचाच्या मुलाने मुस्तीच्या दोन गुंडांना सुपारी देवून केल्याचे निष्षन्न झाले.त्यावेळी मी लातूरला राहात होतो.काही लोकांबरोबर माझाही जबाब सी.आय.डी.ने नोंदविला. पुढे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खून प्रकरणाची सुनावणी सुरू झाली.आरोपीचे वकील धनंजय माने होते.ते प्रसिध्द वकील. न्यायाधीश धुमाळ साहेब होते.मला साक्ष देण्याच्या संदर्भातील समन्स मिळाल्यानंतर सोलापूरला गेलो.न्यायालयात साक्ष देण्याची माझी ही पहिली वेळ.त्यावेळी माझे वय २० ते २१ वर्षे. सरकारी वकीलांना भेटलो.ते निराश दिसले.सर्व साक्षीदार फितुर झाल्याचे त्यांनी सांगितले.माझी शेवटची साक्ष होतीे.काही वेळाने कोर्ट सुरू झाले.माझे नाव पुकारण्यात आले. कोर्टात न्यायाधीश धुमाळ साहेबांसमोर उभे राहिलो.फुलचंद घुगे यांची ओळख कशी ते मला झालेल्या मारहाणीबाबत सर्व हकीगत त्यांना सांगितली.त्यानंतर आरोपीचे वकील धनंजय माने उठले व मला कोर्टासमोर खोटे बोलत आहात असे दरडावून म्हणाले. आता कोर्टात जी हकीगत सांगितली ती पोलीस जबाबात नाही,असे त्यांचे म्हणणे होते.मी लगेच उत्तर दिले कि, हे मी पोलीसांनाही सर्व सांगितले होते,पण त्यांनी काय नोंदविले, हे मला माहीत नाही.माने निरूत्तर झाले. नंतर त्यांनी काही किरकोळ प्रश्न विचारले, पण त्यात दम नव्हता. साक्ष संपल्यानंतर चहा कँटींगमध्ये धनंजय माने यांची भेट झाली.त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवून चहा पाजविला.मला बरे वाटले.ते आरोपीचे वकील होते, पण त्यांच्यातील माणुसकी दिसून आली. काही दिवसांनी सोलापूरच्या सर्वच वृत्तपत्रात पान एकवर बातमी झळकली...अणदूरच्या फुलचंद घुगे खून प्रकरणी सरपंचाच्या मुलासह तिघांना जन्मठेप...मध्यभागी चौकटीत लिहिले होते...पत्रकार सुनील ढेपे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. काही दिवसांनी अणदूरला गेलो.सरपंच व त्यांच्या लोकांची हुकूमत नष्ट झाल्याचे दिसले.लोकांनी मला डोक्यावर घेतले. तेव्हापासून अणदूरचा मी हिरो ठरलो.


उस्मानाबाद लाइव्ह : मिशन २०२० !


उस्मानाबाद लाइव्हच्या प्रतिसाद सदरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश -विदेशातील मराठी वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया आम्हाला महत्वाची वाटते...
विदर्भातील वर्धा येथील एका इंजिनिअरींग कॉलेजमधील आयटीचे प्रोप्रेसर प्रकाश सर यांनी एका महिन्यापुर्वी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.ते म्हणतात...
its new concept for new generation of mission 2020.i specially thanks to mr.dhepe. he give new concept to new generation .be proud we r indian...
* prakash mujbaile , wardha
त्यावेळी प्रकाश सरांची प्रतिक्रिया वाचून आम्ही भारावून गेलो होतो.त्यात भर पडली आहे, ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केलेल्या भाकीतामुळे...६ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्रपत्र विभागात झालेल्या कार्यशाळेत शिरवळकर म्हणतात की, पुढील दशकात म्हणजे सन २०२० च्या आसपास ई - पेपर्स वृत्तपत्रांची जागा घेतील.
त्या बातमीची लिंक आम्ही येथे देत आहोत.
http://www.osmanabadlive.com/rashtra_maharashtra.php?cat=Rashtra_maharashtra&key=1268
जे विधान एक महिन्यापुर्वी प्रोप्रेसर प्रकाश यांनी केले होते, तेच विधान ज्येष्ठ पत्रकार माधव शिरवळकर यांनी केल्यामुळे आम्हाला नवी प्रेरणा मिळाली आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा व मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा मागास आहे. उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असले तरी लोकसंख्या फक्त एक लाखाच्या आसपास आहे. येथे औद्योगिकरण नसल्यामुळे विकास नाही.घराचे बंगले झाले, गल्लीच्या कॉलन्या झाल्या पण उस्मानाबाद शहर वाढलेल्या वृक्षासारखा ...तुळजाभवानी व हवा - पाणी सोडले तरी या जिल्ह्याची नवी ओळख नाही.आता हवा आणि पाणीही प्रदूषित झाले आहे. सहा महीन्यापुर्वी येथून एक रंगीत वृत्तपत्र सुरू झाले आहे. महिलांचे वय व वृत्तपत्रांचा खप विचारू नये, म्हणून आम्ही या वृत्तपत्राचा खप सांगत नाही.सांगण्याचा मुद्दा म्हणजे मागास उस्मानाबाद जिल्हयात ई - पेपर सुरू करणे म्हणजे मोठे धाडसच होय. हे धाडस आम्ही केले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व कुलदैवत श्री खंडोबाचा आशिर्वाद व जनता - जनार्दनाच्या पाठिंब्यावर ८ ऑक्टोबर २०१० रोजी उस्मानाबाद लाइव्ह सुरू झाले. त्यादिवशी नवरात्र सुरू झाला होता, व घटस्थापना होती. घटस्थापनेच्या दिवशीच उस्मानाबाद लाइव्हची स्थापना झाली व केवळ तीन महिन्यात जगभरातील असंख्य वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळविले आहेत.
मला पुर्वीपासूनच नवनविन प्रयोग करण्याचा छंद आहे. देशात व जगात आलेले नविन तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आहे.सन १९९९ मध्ये एकमत सोडल्यानंतर मुक्तरंग कम्युनिकेशन सुरू केले. त्यावेळी उस्मानाबादमध्ये पहिले इंटरनेट कॅफे सुरू केले होते. त्यावेळच्या काही गंमती - जंमती आजही आठवतात.
दुकानाच्या बाहेर आम्ही एक बोर्ड लावला होता, मुक्तरंग इंटरनेट कॅफे....हा बोर्ड वाचून काही जण दुकानात येवून कॉफी मागत होते. त्यावेळी एका सिव्हील सर्जनने कॅफे सुरू केले म्हटल्यावर...छान..आम्ही पण कॉफी पिण्यास येवू म्हटले होते. आता कुठे लोकांना इंटरनेट म्हणजे काय असे समजू लागले आहे. गेल्या दहा वर्षापासून आम्ही इंटरनेटचा वापर करीत असल्यामुळे आम्हाला ई - पेपर सुरू करण्याची कल्पला सुचली.मराठवाड्यात दोन -तीन ई - पेपर्स आहेत पण क्षणाक्षणाला अपडेट करणारे एकमेव आमचे ई - पेपर आहे.
उस्मानाबादमधील काहीजण आम्हाला सहज विचारतात...सध्या कोणत्या पेपरचे काम करता... त्यांना उस्मानाबाद लाइव्ह सुरू केले म्हटल्यावर आहो, ते बुक -स्टॉलवर दिसत नाही म्हणतात...त्यांना मी मकरंद अनासपुरेचा एक विनोदी डॉयलॉग म्हणून दाखवितो...असले छापील धंदे आम्ही करीत नाही... मग लोक हसतात व नंतर त्यांना उस्मानाबाद लाइव्ह म्हणजे नेमके काय आहे, ई - पेपर्स म्हणजे काय, हे समजावून सांगतो.
दहा वर्षापुर्वी ज्यावेळी इंटरनेट कॅफे सुरू केले होते, त्यावेळी ज्या गंमती - जमती होत होत्या त्याच आता ई - पेपरर्स केल्यानंतर होत आहेत.पण हे आमचे मिशन २०२० आहे...हे त्यांना कुठे माहित...?

पुढील दशकात वृत्तपत्रांची जागा ई - पेपर्स घेतील - सुनील ढेपे

वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाने गरूड झेप घेतली आहे. नव-नविन शोध लागल्यामुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटच्या शोधानंतर झपाटयाने क्रांती होऊन सबंध जग माहिती जाळात गुंपले गेले. इंटरनेटचा वापर वाढला असून मागील काही वर्षापासून ई-पेपरची सुविधा अस्तिवात आली आहे. उस्मानाबादमध्ये २००० साली पहिले इंटरनेट कॅफे सुरू करणारे पत्रकार सुनिल ढेपे यांनी मागील ४ महिन्यापूर्वी स्वताच्या मालकिचा ‘उस्मानाबाद लाईव्ह’ हा ई-पेपर सुरू केला. या ई-पेपरची दखल घेत राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार श्री ढेपे यांना जाहिर झाला आहे. त्यानिमित्त ई-पेपरच्या संकल्पने विषयी बातचीत करताना २०२० साली दैनिकांची जागा ई-पेपरने घेतलेली असेल असे सांगत असतानाच जाहिर झालेला पुरस्कार जिल्ह्यातील पत्रकारीतेचा गौरव असल्याचे त्यांनी दैनिक यशवंतचे शहर प्रतिनिधी किशोर भावे यांच्याशी बातचीत करताना सांगितले.

* आपली ई-पेपर सुरू करण्यामागची संकल्पना काय होती?

-पत्रकारितेत बऱ्याच पदावर काम केल्यानंतर आलेल्या बऱ्या, वाईट अनुभवामुळे स्वत:च्या मालकीचे माध्यम सुरू करण्याचा विचार केला. दैनिक सुरू करण्यासाठी प्रचंड खर्च येत असल्यामुळे त्या ऐवजी नभोवाणी, मुद्रित माध्यम, आणि दुरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांचा संगम असणारा मिडीया अर्थात ई-पेपर सुरू करण्याचा विचार केला. ई-पेपर अनेक फायदे आहेत. जिल्ह्यातील अनेक विवाहित महिला लग्नानंतर पर जिल्ह्यात,राज्यात , परदेशात गेलेल्या आहेत. नौकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त जिल्हाभरातील लोक ठिकठिकाणी विखुरले आहेत. दैनिकांच्या प्रसिध्दीची व्याप्ती जिल्हा व विभागापूर्वीच राहिल्यामुळे आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासा अडचणी येतात. या अडणची दुर करण्यासाठी जगात कुठेही वाचता, पहाता व ऐकू येण्यासाठी उस्मानाबाद लाईव्हची निर्मीती केली. नफ्या-तोटयाचा विचार न करता काम सुरू आहे. ई-पेपरच्या सुविधेमुळे जिल्ह्यातील घटना सातासमुद्रापार जात आहेत. व त्याचा लाभही वाचक घेत आहेत.

* भविष्यात ई-पेपरची स्थिती काय असेल?

- आजवर जे-जे नविन आले. ते समजून घेण्याचा त्याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला . २००० साली पहिले नेट कॅफे मी सुरू केल्यानंतर लोक पिण्याची कॉफी मागत, १० वर्षात चित्र बदलले. पुढील १० वर्षात त्या आणखी बदल होईल.२०२० साली दैनिकांची जागा ई-पेपरने घेतलेली असेल. मोबाईल व संगणकावर इंटरनेटचा वापर वाढत आहे. आगामी काळात याचा वापर वाढून लोक छापील दैनिकांची वाट पहात बसण्या ऐवजी ई-पेपरचा वापर करतील व तेंव्हा ही सुविधा स्वस्त झालेली असेल.

* तुमचे आगामी काळातील नियोजन काय आहे ?

-महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारीता क्षेत्रात मी काम केलेले आहे. राज्यपातळीवरील १५ आणि विभागीय पातळीवरील १० असे एकूण २५ पुरस्कार मिळाले आहेत. आत्ताचे पत्रकार खास पुरस्कारासाठी बातम्या लिहीतात. मात्र कुठलीही बातमी मी पुरस्कारासाठी लिहीली नाही. मी लिहीत गेलो आणि पुरस्कार मिळत गेले. मागील ४ महिन्यापूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आणि अणदूरचा खंडोबा यांच्या आशिर्वादाने ‘उस्मानाबाद लाईव्हची‘ सुरूवात घटस्थापने दिवशी केली. अवघ्या ४ महिन्याच्या काळात वेब गटासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहेच. पण हा सन्मान केवळ माझा एकटयाचा नसुन उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारितेचा गौरव आहे.

( दै. यशवंत, लातूरवरून साभार )

श्रध्दा आणि अंधश्रध्दा


श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात जमिन असमानचा फरक आहे. देवावर आपली श्रध्दा असावी पण देवाच्या नावावर जी अंधश्रध्दा चालू आहे, त्याला मी प्रथमपासूनच कडाडून विरोध केलेला आहे.
चिवरीच्या लक्ष्मीआईला पुरण - पोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असताना दैत्याला बक-याचा नैवेद्य चालतो म्हणून जी बेसुमार पशुहत्त्या केली जात होती, त्याला सर्वप्रथम मी विरोध केला होता.१९८७ मध्ये मी सर्वप्रथम केसरीमध्ये चिवरीच्या यात्रेविषयी लेख लिहिला होता. लेखाचे शिर्षक होते, चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार ? नंतरही या यात्रेविषयी व त्यात चालणा-या अनिष्ठ प्रथेविषयी सातत्याने लेख लिहिले. आज चिवरी यात्रेतील पशुहत्त्या बंद झालेली आहे, पण महिलांच्या अंगात जे येते, तो प्रकार चमत्कारिकच म्हणावा लागेल.
आज चिवरीची लक्ष्मीआई असो अथवा तुळजापुरची तुळजाभवानी... तिच्यापुढे काही महिलां चित्र - विचित्र हातवारे करून जे नाचतात, तो बित्भल्स प्रकार आहे. देवी त्यांच्या अंगात कशी काय संचारते, हा संशोधनाचा विषय आहे. ही चक्क अंधश्रध्दा आहे. ज्या महिला देवीपुढे नाचतात, त्या बहुतांश मागासवर्गीय समाजाच्या आहेत, उच्च पदस्थ समाजाच्या महिलांत देवी का संचारत नाही, हा आमचा सवाल आहे. देवी अंगात शिरते, हे निव्वळ थोतांड असून, त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.
देवीचे दर्शन घेणे, तिची फार तर खणा - नाराळाने ओटी भरणे, तिला पुरण - पोळीचा नैवेद्य दाखविणे, ही श्रध्दा आहे, त्याला कोणाचा आक्षेप नाही, असण्याचेही कारण नाही, पण देवीपुढे विचित्र हातवारे करीत नाचणे, ही चक्क अंधश्रध्दा असून, ही अंधश्रध्दा बंद होण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.
१९९३ ची आणखी एक गोष्ट आठवते. ३० सप्टेंबर १९९३ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर परिसरात पहाटे प्रलंयकरी भूकंप झाला होता. अख्ये गाव भूकंपाने भुईसपाट झाले होते.त्यावेळी एकमतला जिल्हा प्रतिनिधी होतो. ही महाभयानक वार्ता समजताच माझ्यासह उस्मानाबादचे काही पत्रकार सकाळी आठ वाजता सास्तूरमध्ये दाखल होतो. उषा काल होता... होता..., काळ रात्र झाली...! असे शिर्षक देवून भूकंपाचा सर्व वृत्तांत मी लिहिला होता. एक महिनाभर या भूकंपावर ऑन द स्पॉट रिपोर्टटींग केली होती.त्यावेळी दररोज भूकंपग्रस्त परिसरात जाण्याचा प्रसंग आला होता.
वर्षभरानंतर पुन्हा पडक्या म्हणजे जुन्या सास्तूरमध्ये एक भयंकर घटना घडली होती. या गावातील
आयेशाबी इनामदार या पाच वर्षाच्या छोट्या चिमुकलीचा गुप्तधानाच्या लालसेपाटी बळी दिला गेला होता. गावातील एकाला कोणी तरी सांगितले की, भूकंपाने पडलेल्या सास्तूरमध्ये गुप्तधन असून, एकाचा बळी दिला तर गुप्तधन मिळू शकते.
पहिले काही दिवस आयेशाबी इनामदार गायब झाल्यांतर पोलीसांनी दखलच घेतली नव्हती.नंतर तिचा मृतदेह चक्क कुत्र्याने लचके देवून खावून टाकला होता. तिच्या कपड्यावरून तिची ओळख पटली होती. ज्यावेळी ही घटना मला समजली तेव्हा मी एकट्याने सास्तूर गाठले व सर्वप्रथम ऑन द स्पॉट रिपोर्ट लिहिला. त्यावेळी एकमतचे संपादक राजा माने होते.
पहिल्या दिवशी पान एकवर पाच कॉलम बातमी दिली, या बातमीत चौकट करून उद्याच्या अंकात सुनील ढेपे यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट वाचा, असा उल्लेख करण्यात आला. कारण त्यावेळी आजच्या सारखी कॉम्प्युटर सिस्टीम नव्हती. वृत्तपत्रे रंगीत नव्हती. बातम्या कागदावर लिहून फॅक्सद्धारे पाठवाव्या लागत होत्या.विजय भन्साळी यांनी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटो काढले होते.वार्तापत्र लिहिण्यासाठी व फोटो धुण्यासाठी वेळ लागत होता.
त्याचरात्री रात्रभर बसून पुर्ण स्टोरी लिहिली. दुर-या दिवशी कार्यालयाचा शिपाई सुरेश चौगुले यास वार्तापत्र व फोटो घेवून लातूरला पाठविले. मग त्याच्या दुस-या दिवशी पान एक व उर्वरित भाग आतील पानावर प्रसिध्द झाला. या ऑन द स्पॉट रिपोर्टचे हेडींग होते,
भूकंपग्रस्त सास्तूर , तिथे नरबळीचा दस्तूर....
हे वार्तापत्र खूपच गाजले. नंतर पंधरा दिवस त्याच्यावर फॉलोअप करीत राहिलो. एका भोंदू महाराजासह आठ लोकांना नंतर अटक झाली.
कळंब तालुक्यातील जवळा खुर्द गावातही विहिरीला पाणी लागावे म्हणून एका दलिताचा बळी दिला गेला होता. त्यावरही खूप लिखाण केले होते.
गेल्या २० वर्षाच्या पत्रकारितेच्या कार्यकालात अंधश्रध्देवर नेहमीच प्रहार केलेला आहे. चिवरी विषयी लेखाला तीन, सास्तूर विषयी लेखाला दोन तर जवळा खुर्दच्या वार्तापत्राला एक पुरस्कार मिळालेला आहे. केवळ पुरस्कार मिळावेत म्हणून मी कधीच लेखन केलेले नाही. पण केलेल्या कामाचे फळ पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले, हे मात्र नक्की.

चिवरीची अघोरी प्रथा...


तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव. गावापासून पाच - सहा कि.मी.अंतरावर चिवरी हे छोटसं खेडं. या खेड्यापासून दोन - तीन कि.मी. अंतरावर डोंगर कपारीत लक्ष्मीआईचं छोटसं मंदिर. मंदिराच्या आसपास लोकवस्ती नाही. चिवरीची लक्ष्मीआई नवसाला पावते असा भाविकांचा भ्रम. त्यामुळं येथे दर मंगळवारी व शुक्रवारी मोठी गर्दी होत असे.
लक्ष्मीआईसमोर कोंबडी किंवा बकरी कापून त्याचा नैवेद्य दाखविला जाई. मुलगा होवू दे, धनप्राप्ती होवू दे आदी नवस लक्ष्मीआईसमोर बोलले जात होते.बोललेला नवस पुर्ण झाला की, तिच्यासमोर कोंबडे किंवा बकरे कापायचे.बोललेला नवस नाही फेडला की, लक्ष्मीआई कोपते, असा भाविकांचा समज.त्यामुळं भीतीपोटी भाविक कोंबडी किंवा बकरी कापायचे.सोबत हातभट्टीची दारू. आधी दारू नंतर मटण यामुळे चिवरीची यात्रा अख्या महाराष्ट्र व शेजारच्या आंध्र व कर्नाटकात प्रसिध्द झाली. पुर्वी दर वर्षाला भरणा-या यात्रेत दहा हजारापेक्षा अधिक कोंबड्या , एक हजारापेक्षा अधिक बक-या व शंभराहून अधिक रेड्याचा बळी दिला जात होता, त्यामुळे चिवरीच्या यात्रेत रक्ताचा पाट वहात होते.ही यात्रा किमान पाच लाखापेक्षा अधिक भरत असे.कारण हावसे,नवसे व गवसे याठिकाणी येत असत.ही यात्रा विशेष करून मंगळवारी भरत होती व दुस-या दिवशी येथे कोणीही थांबत नव्हते.कारण बुधवारी रात्री याठिकाणी भुताची यात्रा भरते, असा आणखीण एक गैरसमज होता.
या अघोरी प्रथेविरूध्द सर्वप्रथम मी आवाज उठविला. सन १९८७ मध्ये फेबु्रवारी महिन्यात यात्रेच्या पुर्वी केसरीच्या सर्व आवृत्त्यामध्ये यासंदर्भात लेख प्रसिध्द प्रसिध्द झाला होता.लेखाचे शिर्षक होते, चिवरीच्या यात्रेतील मुक्या प्राण्यांना अभय कोण देणार ?
हा लेख वाचून अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीत काम करणारे काही कार्यकर्ते जागृत झाले व त्यांनी मला सोबत घेवून या अघोरी प्रथेविरूध्द आवाज उठविण्यास सुरूवात केली.साता-याचे नरेंद्र दाभोळकर दुस-या वर्षी आमच्यासोबत आले. मी अणदूरला नवयुवक तरूण मंडळ स्थापन केले. मंडळाचे कार्यकर्ते रामेश्वर जिरोळे, भुजंग घुगे, उमाकांम करपे आदींनी भुताच्या यात्रेचा गैरसमज दूर केला.माझ्यासह २० - २५ कार्यकर्ते यात्रेच्या दुस-या दिवशी रात्रभर लक्ष्मीआईसमोर बसून होतो. एकही भुत आला नाही. आम्ही वृत्तपत्रातून यासंदर्भात बातम्या दिल्या. त्यानंतर दोन - तीन वर्षे या अघोरी प्रथेविरूध्द लिहित राहिलो.नंतर नरेंद्र दाभोळकर यांनी या चळवळीत मोठा भाग घेतला.आम्ही सर्वानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरली. चिवरीच्या यात्रेतील अघोरी प्रथा बंद करा म्हणून अनेक वर्षे झगडल्यानंतर अणदूरचे सि.ना.आलूरे गुरूजी हेही चळवळीत सहभागी झाले.अखेर सर्वाच्या प्रयत्नांना यश आले.शासनाने चिवारी यात्रेतील पशुहत्त्येवर बंदी घातली.कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे भाविकांना सोबत आणलेले कोंबडे व बकरे परत न्यावे लागले. यात्रेतील आघोरी प्रथा बंद पडल्यानंतर गावाकडे परतत असताना चिवरीच्या ग्रामस्थांनी आमच्यावर सामुहिक हल्ला केला.आम्ही ४० -५० जण होतो.काही लोकांनी मार खाल्ला.काही जण सोबत आणलेल्या मोटारसायकली रस्त्यावर टाकून बाजूच्या शेतातील पिकात लपून बसले. आमच्या मोटार सायकली जाळण्यात आल्या. मी कसाबसा या जीवघेण्या प्रसंगातून वाचलो. यासंदर्भात सर्वच वृत्तपत्रांनी बॅनर न्यूज केली. तेव्हापासून चिवरी यात्रेतील पशुहत्त्या बंद झाली आहे.
चिवरी यात्रेविषयी लिहिलेल्या लेखाला मला लोकमतचा राज्यस्तरीय पां.वा.गाडगीळ व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पां.वा.गाडगीळ पुरस्कार मिळाले. त्यावेळी खासगी न्यूज चॅनेल नव्हते. शासनाचे दुरदर्शन होते. दोन्ही पुरस्काराच्या वेळी दुरदर्शनवर झळकलो.लोकमतचा पुरस्कार तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री गिरीजा व्यास तर अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार तत्कालीन विधानसभा सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते मिळाला.मुंबई मराठी पत्रकार संघात १ मे १९९४ ला हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला होता.विशेष म्हणजे माझ्या एकट्यासाठी हा कार्यक्रम होता.कारण दरवर्षी एकाच पत्रकाराला पुरस्कार दिला जाई. त्यावेळी माझे वय २४ वर्षे होते. यावेळी जयंतराव टिळक यांनी माझ्याबद्दल जे गौरवोद्गार काढले, तेही आजही लक्षात आहेत. खरी पत्रकारिता शहरात नसून खेड्यात आहे, ग्रामीण भागात अनेक आघोरी प्रथा चालू असून त्याविरूध्द पत्रकारांनी लिखाण करावे, सुनील ढेपे यांनी हे काम केल्यामुळेच त्यांना पुरस्कार दिला गेला आहे. सुनीलचा लेख मी स्वत: वाचल्याचेही त्यांनी आर्वजुन सांगितले होते.आज जयंतराव टिळक आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार सोबत आहेत.त्यांचे विचार लक्षात ठेवूनच माझी पत्रकारिता चालू आहे.

सत्यमेव जयते...!


प्रत्येक पत्रकाराला कसलं ना कसलं व्यसन असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे समाज आज पत्रकाराकडे कुत्सीत नजरेने पहात आहे. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात,त्याप्रमाणे बोटावर मोजण्याऐवढ्या बदनाम पत्रकारामुळे चांगल्या पत्रकारांकडेहीे लोक वाकड्या नजरेने पहात आहेत. .आपलेच दात, आपलेच ओठ म्हणून पत्रकारही त्याकडे कानाडोळा करतात पण मी सहन न झाल्यामुळे पत्रकाराच्या विरोधातही बातमी दिली होती.
सन २००३ मध्ये घडलेली गोष्ट. उस्मानबादच्या जिल्हा कारागृहाच्या समोरील राधिका बिअर - बार मध्ये लोकसभेतील एका उमेदवाराकडून मिळालेल्या पैश्यातून नामवंत दैनिकातील चार पत्रकारांनी भरपूर दारू पिऊन गोंधळ घातला.नंतर वेटरवर मोबाईल चोरीचा आळ घातला.त्यामुळे संतप्त झालेल्या बार मालकाने चारही पत्रकारांना वेटरकडून धो...धो...धुतले...बेदम मार खावूनही या पत्रकारांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला नाही.परंतु ही बातमी शहर व जिल्ह्यात मोठ्या चवीने चर्चिली जात होती.
त्यावेळी मी सोलापूरच्या केसरी व सह्याद्री वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो.एकाही पत्रकराने बातमी टाकली नाही, मला मात्र काही पत्रकारांचे फोनवर फोन...ही बातमी तुच टाकू शकतोस असे त्यांचे म्हणने.
मी कधीच दारू पित नाही, मावा,खुटका वगैरे ...कधीच खात नाही. सिगारेट कधीच पित नाही. शुध्द शाकाहरी माणूस. गळ्यात विठ्ठलाची तुळशी माळ.शहरात एकमेव माळकरी पत्रकार. मी खूप विचार केला.जे व्हायचे ते होवू दे म्हणून..केसरी व सह्याद्रीमध्ये कोणाचेही नाव न लिहिता बातमी दिली. पाच ते सहा कॉलम बातमी होती.
त्यात लिहिले होते, चार पत्रकारांचे एकमत झाले... भरपूर दारू ढोसली,...नंतर वेटर व पत्रकारांत सामना रंगला... त्यात कधी सकाळ झाली हे कळलेच नाही...
लोकांनी काय अर्थ लावायचा तो लावला..
काही दिवसांनी मला योगायोगाने दर्पण पुरस्कार मिळाला.दारूड्या चार पत्रकारांनी मला मिळालेला दर्पण पुरस्कार रद्द होण्यासाठी छुप्प्या कारवाया केल्या. सह्यांची एक मोहीम राबवून माझा दर्पण पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली, त्यासाठी खूप आटा - पिटा केला. त्यांचे म्हणने होते की, शहरात अनेक ज्येष्ठ पत्रकार असताना, सुनील ढेपेला पुरस्कार का...? पण निवड समितीने दारूड्या पत्रकारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून हा पुरस्कार मला सन्मानपुर्वक प्रदान केला.
शेवटी सत्य हे सत्यच असते....हेच खरे....!
पत्रकारावर लिहिलेली ही बातमी अजूनही लोकांच्या व पत्रकारांच्या लक्षात आहे. या पत्रकारांनी मला बदनाम करण्यासाठी खूप वेळा षडयंत्र रचले...पण प्रत्येक वेळी त्यांच्यावरच बूमरँग उलटले. सत्याची कास धरल्यानंतर त्रास होणारच...
माझ्यापुढे संत ज्ञानेश्वरांचा आदर्श आहे. दररोज रात्री मी एक तास अध्यामिक वाचन करतो. प्रथम गणपती अर्थर्व शिष्य, नंतर ज्ञानेश्वरीतील काही ओळी, हरिपाठ व शेवटी पसायदान हा माझा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे.
कोणी काही म्हणोत...काही मुठभर लोकांनी वाईट म्हटले म्हणजे आपण वाईट ठरत नाही. तो वाईट का म्हणतो... याचा शोध घ्या... मगच आपले मत ठरवा...हेच यानिमित्त सांगणे.

पत्रकारितेचा प्रवास....


तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं गाव..अणदूरचे ग्रामदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी.घरची परिस्थिती तोलामोलाची.सन १९८५ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर घरी काही तरी हातभार लागावा म्हणून वृत्तपत्रांच्या एजन्स्या घेतल्या.केसरी,लोकमत,सकाळ आदी वृत्तपत्रांचे एजंट म्हणून काम करीत असताना हळूहळू या वृत्तपत्रात प्रसिध्द होणा-या वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी गावाच्या समस्या पाठवू लागलो.त्यातूनच माझ्यातील पत्रकारितेचा जन्म झाला.सर्वात प्रथम वार्ताहर होण्याची संधी केसरीने दिली.वृत्तसंपादक अरूण रामतिर्थकर यांनी दिलेल्या संधीमुळेच माझ्या पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला.
माझ्या पत्रकारितेची सुरूवातच सनसनाटी झाली.अणदूरमध्ये गाजलेले फुलचंद घुगे खून प्रकरण मीच उजेडात आणले होते. या खून प्रकरणाची बातमी दिल्यानंतर १० - १५ गावगुंडाकडून झालेली मारहाण आजही आठवणीत आहे. मारहाण झाल्यानंतरही हे प्रकरण उचलून धरले, त्यामुळेच खरे आरोपी गजाआड झाले व आरोपींना माझ्या साक्षीमुळेच जन्मठेप झाली, हे विशेष.
अणदूरपासून पाच - सहा कि.मी.अंतरावर चिवरी हे गाव.तेथे महालक्ष्मीच्या यात्रेत लाखो कोंबड्याचा व बक-याचा बळी दिला जात होता.त्याविरूध्द सर्वप्रथम मी केसरीमध्ये लेख लिहिला.याच लेखाला लोकमतचा राज्यस्तरीय पा.वा.गाडगीळ पुरस्कार मिळाला.त्यावेळी माझे वय २० वर्षे होते. नागपूरच्या देशपांडे सभागृहात तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री श्रीमती गिरीजा व्यास यांच्या हस्ते या पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.हा माझ्या जीवनातील पहिला पुरस्कार.याच पुरस्कारामुळे मला लोकमतमध्ये संधी मिळाली.राजेंद्रबाबू त्यावेळी संपादक होते.त्यांनी स्वत: माझी मुलाखत घेतली होती.अतुल कुलकर्णी यांनी लातूर सोडल्यामुळे रिक्त झालेल्या लातूर शहर प्रतिनिधीवर माझी वर्णी लागली होती. पण एका वर्षानंतर विलासराव देशमुख यांचा एकमत सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून रूजू झालो व लातूर सोडले.एकमतमध्ये तब्बल दहा वर्षे काम केले.याच काळात विविध १५ पुरस्कार मिळाले.
काही अडचणीमुळे एकमतचे काम सोडावे लागले व नंतर व्यवसायात शिरलो. मुक्तरंग कम्युनिकेशची निर्मिती झाली.बरेच उद्योग करीत छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो.केसरी,लोकसत्ता,चित्रलेखा,लोकप्रभा आदी दैनिकात व साप्ताहिकात लिखाण केले.पत्रकारितेच्या एकूण कारकिर्दीत राज्य पातळीवरील १५ व विभागीय पातळीवरील १० असे २५ पुरस्कार मिळाले.जिल्ह्यात सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे पहिले पत्रकार व दर्पण पुरस्कार मिळविणारे पहिले पत्रकार म्हणून नोंद झाली.एक महिन्यापुर्वी उस्मानाबाद लाइव्ह हे इंटरनेट न्यूज चॅनल व ई -पेपर सुरू केले आहे.
पत्रकारितेच्या २० वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे आनंददायी प्रसंग आले, तेवढेच दु:खदही प्रसंग वाट्याला आले.काहीच चुक नसताना एकदा मारहाण, व दोनदा खोटी केस झाली.पण कधीच हार मानली नाही.फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून उंच झेप घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे.
कधी - कधी असे वाटते की, आता पत्रकारिता सोडून द्यावी, पण म्हणतात ना .. पत्रकार कधीच निवृत्त होत नसतो...तशीच माझी अवस्था झालेली आहे.