तुमच्या शुभेच्छामुळे आज धन्य झालो...आज माझा वाढदिवस. हा वाढदिवस पुण्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमात अनाथ मुलांच्या सोबत साजरा करण्याचा माझा मानस होता, पण कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही. घरीच राहा, सुरक्षित राहा, हा मंत्र जोपासत घरीच कुटुंबासोबत साजरा केला. मुंबईत राहणाऱ्या मुलीने ऑनलाइन केक बुक करून पुण्यातील घरी पाठवला होता, तोच केक कापून वाढदिवस साजरा केला.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव. एका गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या घराण्यात कुणी यापूर्वी पत्रकार नव्हते. उपजीविकेसाठी वृत्तपत्र एजंट झालो, त्यातील बातम्या वाचत पुढे पत्रकार झालो, सोलापूर केसरीचे तत्कालीन वृत्तसंपादक अरुण रामतीर्थकर यांच्यामुळे केसरीत संधी मिळाली. पुढे लातूर जिल्हा प्रतिनिधी झालो. नंतर लोकमत, एकमत, लोकसत्ता असा प्रवास करीत स्वतःचे वेबपोर्टल काढले. अणदूरसारख्या एका खेड्यागावातून वृत्तपत्र एजंट ते जिल्हा प्रतिनिधी आणि पुढे स्वतःचे वेबपोर्टल हा सारा इतिहास स्वप्नवत आहे. अणदूर ते लातूर, पुढे उस्मानाबाद आणि आता पुणे प्रवास पुस्तक लिहिण्यासारखा आहे. माझ्या पर्सनल वेबसाईट www.dhepe.in वर सर्व लिहिले आहे. तरीही नव्या पिढीसाठी अनुभवाचे बोल पुस्तक रूपाने लिहिणार आहे, हेच यानिमित्त संकल्प.
सडेतोड आणि निर्भीड पत्रकारिता करीत असताना काही जणांची कदाचित मने दुखावली असतील. पण माझा लढा व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध आहे. कुणीही माझा शत्रू नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून आजवर समाजाच्या समस्या सोडवणाचा प्रयत्न केला आहे. पत्रकारिता हा धंदा नसून धर्म मानलेला आहे. तोच बाणा यापुढेही कायम राहील.
आपण सर्वानी वाढदिवसनिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. त्या नेहमीच मला बळ आणि प्रेरणा देत राहतील. आपले प्रेम,स्नेह आणि सदिच्छा कायम पाठीशी राहो, हीच यानिमित्त अपेक्षा.
धन्यवाद आणि आभार
सुनील ढेपे

कठीण परिस्थितीमध्ये गणेशचे यश !


६ सप्टेंबर २०१६ रोजी उस्मानाबादेत असताना, विरोधात बातम्या दिल्या म्हणून दैनिक गावकरी कार्यालयावर काही गावगुंड आणि दारू विक्रेत्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला होता, त्यातून मी बालंबाल बचावलो होतो, पण आमच्यावरच हल्ला करून आमच्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आल्याने पुढे १४ दिवस जेल मध्ये राहावे लागले, त्यातून न्यायालयाने जामिनावर सुटका केली, पण काही अटी घातल्या होत्या, त्यामुळे मला उस्मानाबाद सोडावे लागले आणि पुण्यात यावे लागले. त्यावेळी गणेश हा श्रीपतराव भोसले हायस्कुल, उस्मानाबाद येथे सातवी मध्ये शिकत होता, मी पुण्यात आणि तो उस्मानाबादेत.
सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१६ दरम्यान खूप यातना सहन केल्या. माझी कुटुंबाला आणि कुटुंबाला माझी आठवण येत असे. कित्येक रात्री मी जागून काढल्या. कोणताही गुन्हा केला नसताना झालेल्या यातना खूप मोठ्या असतात. शेवटी सत्य हे सत्यच असते, नंतर या खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आणि ज्यांनी षड्यंत्र केले ते पापाचे फळे भोगत आहेत. असो...
एप्रिल २०१६ मध्ये गणेशची सातवीची परीक्षा संपल्यानंतर त्याला पुण्याला आणले. आठवीसाठी कुठे प्रवेश घ्यावा, हा मोठा प्रश्न होता. सर्व नामांकित शाळेत प्रवेश फुल्ल होते. त्यामुळे मुंढवा भागातील एका छोट्या शाळेत प्रवेश मिळाला. एका नामंकित शाळेत शिकलेल्या गणेशला थोडे दिवस चुकल्या- चुकल्या सारखे वाटत होते. तो खुश नव्हता.नववी मध्ये त्याला काही मित्र मिळाले, नंतर दहावी मध्ये थोडा रमला.त्याला हवे तसे शिक्षण मिळाले नाही, पण स्वतःच्या मेहनतीवर त्याने दहावीमध्ये ८७ टक्के गुण मिळवले. त्याची बहीण मयुरीला दहावी मध्ये ९२ टक्के गुण होते. ( टॉप ५ नुसार ९६ टक्के ) . भावाने बहिणीची बरोबरी केली नसली तरी तिच्या वाटेवर त्याचा प्रवास सुरु आहे.
पुढे ११, १२ ( विज्ञान ) करून इंजिनिअर होण्याची त्याची इच्छा आहे. त्याला आता पुण्यातील नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याची बहीण आता त्याची गुरु झाली आहे.माझे, दीपाचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत, आपल्या शुभेच्छा पाठीशी असू द्या...
-सुनील ढेपे

जे नवं, ते आम्हाला हवं !

जे नवं, ते आम्हाला हवं ! असं उस्मानाबाद लाइव्हचं धोरण आहे. त्यामुळेच उस्मानाबाद लाइव्हने पुन्हा एकदा आपल्या वेबसाईटचा लूक चेंज केला आहे. नवीन लूक युझर फ्रेंडली आहे. सध्याच्या स्मार्ट फोनच्या युगात मोबाईलवर वेबसाईट जलद गतीने हाताळता यावी, म्हणून हा बदल करण्यात आला आहे. नवा लूक आमच्या वाचकांना नक्कीच पसंद पडेल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाडयात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास. या मागास जिल्ह्यातून १० वर्षापूर्वी उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट सुरु केली. त्यावेळी इंटरनेटची 2G स्पीड होती आणि स्मार्ट फोन नव्हता. त्यामुळे वाचकांची संख्या मर्यदित होती. त्यानंतर 3G आला आणि वाचकांच्या संख्येत पाचपट वाढ झाली. तीन वर्षापूर्वी जसे 4G चे आगमन झाले आणि अत्याधुनिक स्मार्ट फोन आल्यामुळे मीडियात मोठा बदल झाला आहे. प्रिंट, टीव्ही मीडिया पाठोपाठ आता डिजिटल मीडिया उदयास आला आहे. छापील वृत्तपत्राची जागा ईपेपरने घेतली आहे. टीव्ही चॅनल्स मोबाईलवर पाहता येऊ लागले आहेत. डिजिटल मीडियाचे प्लँटफॉर्म (वेबसाईट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल,सोशल मीडिया ) ला सर्वाधिक पसंती आहे.
वाचकांना आजची बातमी आज नव्हे आताच हवी आहे. बातमी टेस्टबरोबर, फोटो, व्हिडीओमध्ये हवी आहे. फेसबुक, युट्युब लाइव्हमुळे वाचकांना लाइव्ह बातम्या पाहता येऊ लागल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर उस्मानाबाद लाइव्हने स्वतःला बदलेले आहे. उस्मानाबाद लाइव्हची आजमितीस वेबसाइट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल आणि सोशल मीडियाचे सर्व पेजेस आहेत.
उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईटला दिवसाला किमान १ लाख वाचक भेट देतात. ३५ हजार वाचकांनी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड केला आहे. युट्युब चॅनल्सचे ४५ हजार ३०० सब्सक्राइब आहेत. फेसबुक पेजचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. सर्व प्लँटफॉर्मवरून दिवसाला किमान पाच लाख वाचक उस्मानाबाद लाइव्हने मिळवले आहेत. डिजिटल मीडियात उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबाद जिल्ह्यात नंबर १ आहे. हे केवळ वाचकांच्या बळावर शक्य झाले आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड हा उस्मानाबाद लाइव्हचा बाणा आहे. येथे कोणतीही बातमी दाबली जात नाही. उस्मानाबाद लाइव्हने आजपर्यंत कोणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही .आमचे डिजिटल चॅनल कोणत्याही नेत्याचे मुखपत्र नाही. वाचक हाच आमचा मालक आहे. वाचकांशी कधीच गद्दारी आम्ही करणार नाही. दर दोन वर्षाला उस्मानाबाद लाइव्हने लूक चेंज केला आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपला लूक चेंज करून अधिक वेगवान आणि जलद केला आहे. डिजिटल मीडियात सर्वात अग्रेसर असलेले उस्मानाबाद लाइव्ह बदलत्या काळाबरोबर नक्कीच बदल करीत राहील.
एकीकडे पत्रकारितेवरील लोकांचा विश्वास उडत चाललेला असला तरी, उस्मानाबाद लाइव्हने उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रकारिता जिवंत ठेवली आहे. उस्मानाबाद लाइव्हवर सर्वात अगोदर बातमी तर प्रसिद्ध होतेच, पण ती सत्य असते. आम्ही अनेक प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. तसेच अनेक प्रकरणाचा पाठपुरावा करून वाचकांना न्याय मिळवून दिला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांना मदत देखील केलेली आहे.
असो, सध्या मोबाईल युग आहे. तुमच्या स्मार्ट फोनवर उस्मानाबाद लाइव्ह वेगवान, जलद गतीने वाचता यावे म्हणून नवीन बदल केला आहे. . आपल्या काही सूचना असतील तर त्याचे स्वागतच आहे.
तेव्हा वाचत राहा, उस्मानाबाद लाइव्ह...
www.osmanabadlive.com

सुनील ढेपे 
मुख्य संपादक,
उस्मानाबाद लाइव्ह
# 9420477111