पुढील दशकात वृत्तपत्रांची जागा ई - पेपर्स घेतील - सुनील ढेपे

वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवाने गरूड झेप घेतली आहे. नव-नविन शोध लागल्यामुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटच्या शोधानंतर झपाटयाने क्रांती होऊन सबंध जग माहिती जाळात गुंपले गेले. इंटरनेटचा वापर वाढला असून मागील काही वर्षापासून ई-पेपरची सुविधा अस्तिवात आली आहे. उस्मानाबादमध्ये २००० साली पहिले इंटरनेट कॅफे सुरू करणारे पत्रकार सुनिल ढेपे यांनी मागील ४ महिन्यापूर्वी स्वताच्या मालकिचा ‘उस्मानाबाद लाईव्ह’ हा ई-पेपर सुरू केला. या ई-पेपरची दखल घेत राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार श्री ढेपे यांना जाहिर झाला आहे. त्यानिमित्त ई-पेपरच्या संकल्पने विषयी बातचीत करताना २०२० साली दैनिकांची जागा ई-पेपरने घेतलेली असेल असे सांगत असतानाच जाहिर झालेला पुरस्कार जिल्ह्यातील पत्रकारीतेचा गौरव असल्याचे त्यांनी दैनिक यशवंतचे शहर प्रतिनिधी किशोर भावे यांच्याशी बातचीत करताना सांगितले.

* आपली ई-पेपर सुरू करण्यामागची संकल्पना काय होती?

-पत्रकारितेत बऱ्याच पदावर काम केल्यानंतर आलेल्या बऱ्या, वाईट अनुभवामुळे स्वत:च्या मालकीचे माध्यम सुरू करण्याचा विचार केला. दैनिक सुरू करण्यासाठी प्रचंड खर्च येत असल्यामुळे त्या ऐवजी नभोवाणी, मुद्रित माध्यम, आणि दुरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांचा संगम असणारा मिडीया अर्थात ई-पेपर सुरू करण्याचा विचार केला. ई-पेपर अनेक फायदे आहेत. जिल्ह्यातील अनेक विवाहित महिला लग्नानंतर पर जिल्ह्यात,राज्यात , परदेशात गेलेल्या आहेत. नौकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त जिल्हाभरातील लोक ठिकठिकाणी विखुरले आहेत. दैनिकांच्या प्रसिध्दीची व्याप्ती जिल्हा व विभागापूर्वीच राहिल्यामुळे आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासा अडचणी येतात. या अडणची दुर करण्यासाठी जगात कुठेही वाचता, पहाता व ऐकू येण्यासाठी उस्मानाबाद लाईव्हची निर्मीती केली. नफ्या-तोटयाचा विचार न करता काम सुरू आहे. ई-पेपरच्या सुविधेमुळे जिल्ह्यातील घटना सातासमुद्रापार जात आहेत. व त्याचा लाभही वाचक घेत आहेत.

* भविष्यात ई-पेपरची स्थिती काय असेल?

- आजवर जे-जे नविन आले. ते समजून घेण्याचा त्याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला . २००० साली पहिले नेट कॅफे मी सुरू केल्यानंतर लोक पिण्याची कॉफी मागत, १० वर्षात चित्र बदलले. पुढील १० वर्षात त्या आणखी बदल होईल.२०२० साली दैनिकांची जागा ई-पेपरने घेतलेली असेल. मोबाईल व संगणकावर इंटरनेटचा वापर वाढत आहे. आगामी काळात याचा वापर वाढून लोक छापील दैनिकांची वाट पहात बसण्या ऐवजी ई-पेपरचा वापर करतील व तेंव्हा ही सुविधा स्वस्त झालेली असेल.

* तुमचे आगामी काळातील नियोजन काय आहे ?

-महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारीता क्षेत्रात मी काम केलेले आहे. राज्यपातळीवरील १५ आणि विभागीय पातळीवरील १० असे एकूण २५ पुरस्कार मिळाले आहेत. आत्ताचे पत्रकार खास पुरस्कारासाठी बातम्या लिहीतात. मात्र कुठलीही बातमी मी पुरस्कारासाठी लिहीली नाही. मी लिहीत गेलो आणि पुरस्कार मिळत गेले. मागील ४ महिन्यापूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आणि अणदूरचा खंडोबा यांच्या आशिर्वादाने ‘उस्मानाबाद लाईव्हची‘ सुरूवात घटस्थापने दिवशी केली. अवघ्या ४ महिन्याच्या काळात वेब गटासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहेच. पण हा सन्मान केवळ माझा एकटयाचा नसुन उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारितेचा गौरव आहे.

( दै. यशवंत, लातूरवरून साभार )